अनुक्रमणिका
- १. गुणसंवर्धन मुलांचे, दायित्व शिक्षक आणि पालक यांचे !
- २. गुणक्षय नव्हे, तर गुणवृद्धी करणारे आदर्श जोपासा !
- ३. गुणसंवर्धनाचे महत्त्व
- ४. मुलांना लहानपणापासून स्वभावदोषांची ओळख आणि जाणीव करून दिल्यास त्यांच्यात खऱ्या अर्थाने गुणसंवर्धन होते !
- ५. मुलांमध्ये सात्त्विक गुण वाढवून दुर्गुण न्यून करणार्या कथा मुलांना सांगाव्यात !
- ६. घराचे घरपण टिकून रहाण्यासाठी आणि एकमेकांमध्ये गुणवृद्धी होण्यासाठी उपयुक्त (कान)मंत्र !
- ७. मुलांमध्ये गुणसंवर्धन करणारे आदर्श पालक !
- ८. गुणसंवर्धनात अडथळा ठरणारा राग हा स्वभावदोष कसा घालवावा ?
- ९. गुणसंवर्धनाची महती सांगणारी संतवाणी !
- अ. काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !
- आ. ज्याप्रमाणे तेलाचा एक थेंब त्याच्या अंगभूत गुणधर्मभिन्नतेमुळे पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही, त्याप्रमाणे दोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्याविना साधकाला दोषविरहित अन् सर्वगुणसंपन्न ईश्वराशी एकरूप होत येत नाही.
- इ. प्रतिमा जपायची असेल, ती भगवंताची जपा आणि आरशात स्वतःची नव्हे, तर स्वतःतील भगवंताची प्रतिमा बघा !
- ई. ताण घेण्यापेक्षा संघर्ष करुन पुढे जा !
- १०. गुणसंवर्धन सारणी कशी लिहावी ?
- ११. सुसंस्कारांचे महत्त्व !
- १२. जीवन खऱ्या अर्थाने सत्यं, शिवं आणि सुंदरम् करणारे दैवी गुण !
सध्याच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकालाच स्वतःमध्ये काहीतरी विशेष किंवा टॅलेंट असावे, असे वाटत असते. हे टॅलेंट निर्माण करण्यासाठी काही जण बरेच प्रयत्न करतात. काही उत्सुक तर personality developmentच्या वर्गांना जाण्यास आरंभ करतात. अशा वर्गांना गेले की, स्वतःचे व्यक्तिमत्त्व वृद्धींगत होते, असे म्हटले जाते ! त्यामुळे तरुण वर्गामध्ये या वर्गांचे एकप्रकारे फॅडच निर्माण झाले आहे.
व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे स्वतःमध्ये गुणांचे संवर्धन करून जीवनात येणार्या प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाऊन आनंद मिळवणे होय. आज समाजामध्ये धर्माचे शिक्षण नसल्याने हा भाग कुणालाच ठाऊक नाही. प्रत्येक जण व्यावहारिक जीवनाची कास धरून त्याद्वारे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु याद्वारे मनुष्य आनंदी होतांना दिसत नाही.
व्यक्तिमत्त्व विकास करणे म्हणजे स्वतःत गुणांची वृद्धी करणे होय ! गुणांच्या विकासामुळे व्यक्ती सर्वगुणसंपन्न होऊन तिची ईश्वराकडे वाटचाल होऊ लागते. यामुळे सध्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा संकुचित अर्थ लक्षात न घेता सर्वांनी साधनेच्या बळावर गुणवृद्धी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
भौतिक सुखांनी युक्त असणार्या धकाधकीच्या युगात, तसेच विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये गुणांची वृद्धी करणे तुलनेने कठीण जरी असले, तरी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासह गुणवृद्धी करण्यासाठी अध्यात्म, साधना, धर्माचरण यांची जोड दिल्यास आपल्यात खर्या अर्थाने गुणसंवर्धन होईल. मनुष्यात ईश्वररूपी गुणांची वृद्धी झाल्यासच त्याचे जीवन खर्या अर्थाने आनंदी होणार आहे.
१. गुणसंवर्धन मुलांचे, दायित्व शिक्षक आणि पालक यांचे !
शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक ! शिक्षक पिढी घडवतात, तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते. पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे. सध्याच्या मुलांमध्ये फारसा पालट होत नाही; कारण यामध्ये मुख्य कारण इंग्रजी (मेकॉले) शिक्षणपद्धत ! यातून हृदयशून्य माणसेच सिद्ध होतात. शिक्षकांनीही साधना केल्यास त्यांच्या वाणीत चैतन्य येईल. साधनेच्या, म्हणजे भक्तीच्या बळावर आपण विद्यार्थ्यांत पालट घडवून आणू शकतो. आनंदी झालेला शिक्षक अनेक मुलांना आनंद देऊ शकतो.
जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागड्या शिकवणीवर्गाला पाठवले की, सध्याच्या पालकांचे कर्तव्य संपते. जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे, हाच पालकाचा धर्म आहे. आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात.
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल
२. गुणक्षय नव्हे, तर गुणवृद्धी करणारे आदर्श जोपासा !
राष्ट्रद्रोहासारख्या कृत्यांमध्ये सहभागी असणारे काही अभिनेते आणि खेळाडू हे आजच्या मुलांचे आदर्श आहेत. प्रत्यक्षात हे (आदर्श ?) असणारे अभिनेते आणि खेळाडू जीवनात कसे चुकीचे वागतात ? एका अभिनेत्याच्या घरी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अवैधरित्या ठेवलेली एके-४७ ही बंदूक सापडली. एका अभिनेत्याने वनातील हरिणाची अवैध शिकार केली होती. त्याने मद्यधुंद होऊन चारचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाला. एका क्रिकेटपटूने वाढदिवसाला भारताच्या राष्ट्रध्वजाचे चित्र असलेला केक कापला. हे आदर्श ठेवण्यापेक्षा मुलांनी गुणवृद्धी होईल, असे आदर्श ठेवणे आवश्यक आहे.
असह्य संकटे झेलूनही देवाचा नामजप न सोडणारा भक्त प्रल्हाद, तप करून अढळपद प्राप्त करून घेणारा ध्रुवबाळ, वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा जगन्मान्य धर्मग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्वर, मोगलांशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवायला हवा !
३. गुणसंवर्धनाचे महत्त्व
गुणसंवर्धन म्हणजे गुण वाढवणे. गुणसंवर्धन प्रक्रिया म्हणजे मनावर गुणांचा संस्कार करून स्वतःमध्ये त्यांचा विकास करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची एक विशिष्ट प्रक्रिया !
अ. गुणी बालकच देशाचे भावी आधारस्तंभ !
देशाची सध्याची झालेली दुर्दशा वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी यांवरून समजते. भ्रष्टाचार, चोर्या, स्त्रियांवर अत्याचार चालूच आहेत; कारण देशातील जनता स्वार्थी झाली असून तिच्यातील राष्ट्रप्रेम संपले आहे. माझा भारत महान अशी घोषणा देऊन किंवा शाळेत राष्ट्रगीत गाऊन भागणार नाही, तर राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान, देशासाठी निःस्वार्थीपणे कार्य करण्याची तळमळ हे गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा १६ व्या वर्षी घेतली. इंग्रजांच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला म्हणून चंद्रशेखर आझाद यांनी वेताच्या छड्या अंगावर घेतल्या, तेव्हा तेही १६ वर्षांचेच होते. खर्या अर्थाने सर्वगुणसंपन्न मुलेच राष्ट्राचा उत्कर्ष साधू शकतात. गुणांच्या संवर्धनाने युक्त असणारी मुलेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत !
आ. गुणसंवर्धनाचे प्रत्यक्ष प्रयत्न
या प्रक्रियेसाठी आरंभी दोन गुणांची निवड करावी. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेसाठी जे दोष निवडले असतील, त्यांच्या विरुद्ध असलेले गुण गुणसंवर्धन प्रक्रियेसाठी निवडावेत. राग हा स्वभावदोष निवडल्यास त्याच्या विरुद्ध असलेला प्रेमभाव गुण निवडावा. यामुळे स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेला बळकटी येते.
प्रतिदिन गुणसंवर्धन सारणी लिहावी. जे गुण वाढवण्यासाठी ठरवले असेल, त्यासाठी प्रयत्न करतांना किती ठिकाणी प्रयत्न करणे जमले आणि किती ठिकाणी जमले नाही, हे सारणीत लिहावे. जेथे जमले नाही, तेथे उपाययोजनाही लिहावी.
इ. साधनेसाठी आवश्यक गुण
व्यवस्थितपणा, आज्ञापालन, संयम, समाधानी वृत्ती, तत्परता, जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती, तळमळ, भाव, त्याग
राष्ट्रहितविषयक काही गुण
राष्ट्राभिमान, बलोपासना, संघटितपणा, संघटनकौशल्य, नेतृत्वगुण
धर्मनिष्ठा वाढण्यासाठी आवश्यक गुण
धर्मप्रेम, धर्माचरण, स्वकीय संस्कृतीचे पालन
४. मुलांना लहानपणापासून स्वभावदोषांची ओळख आणि
जाणीव करून दिल्यास त्यांच्यात खऱ्या अर्थाने गुणसंवर्धन होते !
पुणे येथील कु. नीरज कर्वे याने वयाच्या ८ व्या वर्षी स्वभावदोष सारणीत स्वतःकडून झालेल्या चुकांची केलेली नोंद !
१. मोेजे जागेवर ठेवले नाहीत.
२. कपड्यांच्या घड्या घातल्या नाहीत.
३. मी आईचे आज्ञापालन केले नाही.
४. शाळेतून घरी आल्यावर माझ्या हाताच्या धक्क्याने लोणी सांडले.
५. आईने मदत करतो का, असे विचारल्यावर मी नाही, असे उत्तर दिले.
६. फ्लॉवर, गवार, मेथी, कोथिंबीर या भाज्यांच्या संदर्भात माझ्या आवडीनिवडी असतात.
५. मुलांमध्ये सात्त्विक गुण वाढवून दुर्गुण न्यून करणार्या कथा मुलांना सांगाव्यात !
मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. ज्या गोष्टीमुळे मुलांमधील सात्त्विक गुण वाढतील अशा गोष्टी मुलांना सांगाव्यात. सर्वसाधारणपणे मुलांना पुराणे, रामायण-महाभारत, पंचतंत्र यांतील उद्बोधक गोष्टी; संताच्या गोष्टी अन् चरित्रे; विज्ञानातील संशोधनाच्या गोष्टी; क्षात्रगुण वाढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, राणा प्रताप यांच्या जीवनातील प्रसंग; तसेच क्रांतीकारक आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्या कथा सांगाव्यात.
६. घराचे घरपण टिकून रहाण्यासाठी आणि
एकमेकांमध्ये गुणवृद्धी होण्यासाठी उपयुक्त (कान)मंत्र !
१. सहा शब्दांचा मंत्र – माझी चूक झाली, हे खरे आहे.
२. पाच शब्दांचा मंत्र – हे तू फार छान केलेस !
३. चार शब्दांचा मंत्र – तुझे मत काय आहे ?
४. तीन शब्दांचा मंत्र – मी पाठीशी आहे.
५. दोन शब्दांचा मंत्र – आभारी आहे.
६. एका शब्दाचा मंत्र – आम्ही
७. कधी उच्चारू नये, असा मंत्र – मी
– चित्रकार श्री. राजा मराठे (संदर्भ : मासिक हितगुज, सप्टेंबर २०१५, मराठे प्रतिष्ठान, मुंबई)
७. मुलांमध्ये गुणसंवर्धन करणारे आदर्श पालक !
अ. मुलीला योग्य वळण लावून ती धर्माचरणी
होण्यासाठी प्रयत्न करणारे पू. सिरियाक आणि पू. (सौ.) योया वाले !
७ अ १. मुलगी साधिकेला अपशब्द बोलल्याचे समजल्यावर पू. सिरियाकदादा आणि पू. (सौ.) योयाताई यांनी कान पकडून स्वतः साधिकेची क्षमा मागणे आणि मुलीलाही कान पकडून क्षमा मागण्यास सांगणे
एकदा दिवशी आश्रमातील बालसाधिका कु. अनास्तासिया (वय ९ वर्षे) मला २-३ अपशब्द बोलली. याविषयी तिच्या वडिलांना (पू. सिरियाकदादा आणि पू. (सौ.) योयाताई यांना) समजले. तेव्हा मुलीकडून झालेल्या चुकीविषयी त्यांना पुष्कळ खंत वाटली आणि त्या दोघांनीही कान पकडून माझी क्षमा मागितली. (एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांमध्ये अहं किती अल्प असतो, हे यावरून लक्षात येते. स्वतः संत असूनही त्यांच्यातील अल्प अहंमुळेच त्यांनी साधिकेची क्षमा मागितली. त्यांच्या वागण्यातून त्यांनी सर्वच साधकांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे. – संकलक)
७ आ २. मुलीला धर्माचरणाचे महत्त्व सांगून तिच्या चुकीविषयी तिला क्षमा मागण्यास सांगणे
त्यांनी कु. अनास्तासियाला बोलवून त्याविषयी विचारणा केली. प्रथम तिने ते मान्य केले नाही; परंतु ती खोटे बोलत असल्याचे आणि अपशब्द बोलल्याविषयी तिला शिक्षा करणार असल्याचे त्यांनी तिला पुनःपुन्हा सांगितल्यावर एकच अपशब्द बोलल्याचे तिने मान्य केले. त्यानंतर पू. (सौ.) योयाताई तिला म्हणाल्या, खरे बोलणे आणि मोठ्यांचा आदर करणे हा धर्म आहे आणि आपल्याला धर्माचरण करायला हवे. त्यानंतर लगेचच कु. अनास्तासियाने चूक मान्य करून कान पकडून माझी क्षमा मागितली. त्यांनी तिला प्रायश्चित्तही घेण्यास सांगितले.
७ इ ३. पाल्यांवर धर्माचरणाचे संस्कार करून त्यांच्या अयोग्य कृतींना प्रतिबंध घालणे, हे पालकांचे कर्तव्यच असणे
थोड्या वेळाने माझ्या मनात पुढील विचार आले. किती हिंदू आपल्या पाल्यांना धर्माचरणाविषयी एवढ्या सुस्पष्ट शब्दांत सांगून धर्माचरण करण्यास उद्युक्त करतात ? पाल्यांच्या अयोग्य वर्तनाविषयी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर बर्याचदा त्यांना राग येतो. काही पालक तर ते गांभीर्याने न घेता चक्क त्याकडे दुर्लक्ष करतात. घरात पाल्यांवर सुसंस्कार केले जात नाहीत आणि समाजात पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यातच हिंदू धन्यता मानतात. त्यामुळे पाल्यांनाच नव्हे, तर पालकांनाही धर्माचरण आणि धर्मशिक्षण या शब्दांचा अर्थ ठाऊक नसतो.
– सौ. विजयालक्ष्मी आमाती, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०१३)
आ. छोट्या छोट्या कृतींतून मुलीवर साधनेचे संस्कार होण्यासाठी प्रयत्न करणार्या सौ. आर्या लोटलीकर !
१. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण वाढवण्यास साहाय्य करणे
माझी मुलगी पूर्ती हिला अगदी लहान असल्यापासून कपड्यांच्या घड्या घालायला आवडायचे. पूर्ती ३ वर्षे २ मासांची असतांना तिने घातलेल्या घडीकडे पाहून मामाला (श्रीकृष्णाला) कसे वाटते ? असे सांगत तिला घडी घालण्यास शिकवले. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि तिला त्या सेवेत आनंद मिळू लागला. तसेच तिच्यातील व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण वाढण्यास साहाय्य झाले.
२. पूर्तीतील इतरांना साहाय्य करणे हा गुण वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न !
पूर्ती अडीच वर्षांची असतांना जेव्हा ती नुकतीच चालू लागली, त्या वेळी मी तिला छोटी छोटी सेवा देत होते, उदा. मी तिला सांगायचे, पूर्ती, जरा मला दैनिक (सनातन प्रभात) आणून दे गं.
३. साधकांना सेवेसाठी लागणारे साहित्य आणून देणे
पूर्ती सव्वातीन वर्षांची असतांना पंचांग पालटाच्या सेवेला गेलो असतांना त्या सेवेसाठी लागणारे साहित्य ती त्वरित साधकांना आणून देत असे.
– सौ. आर्या लोटलीकर, डोंबिवली, ठाणे.
८. गुणसंवर्धनात अडथळा ठरणारा राग हा स्वभावदोष कसा घालवावा ?
राग येण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये ६० टक्के, तर स्त्रियांमध्ये ४० टक्के इतके असते.
अ. पुरुषांना अधिक राग का येतो ?
अ. पुरुषांमध्ये जन्मतः पुरुषी अहंकार (अभिमान) असतो.
आ. त्यांची वृत्ती स्वतंत्र असून ते आत्मकेंद्रित असतात.
इ. दायित्वाची जाणीव अल्प असते.
ई. त्यांच्यातील स्वार्थी वृत्ती स्त्रियांपेक्षा अधिक असते आणि त्यांच्या काही प्रमाणात अपेक्षाही असतात. या सर्वांमुळे त्यांच्या अंतर्मनात रागाचा संस्कार निर्माण होतो.
करावयाचे प्रयत्न
१. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरुषांनी अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करायला हवेत.
२. प्रेमभाव वाढवणे आणि दायित्व स्वीकारून ते पार पाडणे, यांसाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आ. स्त्रियांना राग का येतो ?
अ. स्त्रिया भावनाप्रधान असून त्यांच्यात अपेक्षा अधिक असतात.
आ. त्यांच्यात देहबुद्धीचे प्रमाण अधिक असते, तर स्वार्थीपणा अल्प असतो. त्या उत्तरदायित्वाने वागतात.
इ. स्त्रियांमध्ये शक्तीचा वास असल्याने त्यांना येणारा राग हा या शक्तीमुळेही असू शकतो.
करावयाचे प्रयत्न
अ. स्त्रियांनी त्यांच्यातील भावनाप्रधानता आणि भीती हे दोष स्वीकारून ते न्यून करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आ. अपेक्षा करणे हेच रागाचे मूळ कारण असल्याने तो दोष उणावण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करावेत.
– (पू.) सौ. योया वाले, युरोप
९. गुणसंवर्धनाची महती सांगणारी संतवाणी !
साधनेद्वारे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून गुणातीत अवस्था प्राप्त करायची आहे. नंतर गुणांना उपयोगात आणून मायेतील कार्य करायचे असते.
अ. काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !
आईच्या पोटात असतांना आपली काळजी कोण घेत होते ? सहा मासांचे (महिन्यांचे) असतांना दूध मिळेल का ? याची काळजी होती का ? मग आता का आहे ? आतापर्यंतचे आयुष्य एका क्षणात गेले. मग पुढील १० वर्षांची काळजी कशाला ? कोणत्याही प्रकारची काळजी करणे म्हणजे श्रीकृष्णावरील अश्रद्धा होय. काळजी आणि चिंता आपल्याला मागे खेचते. आजपर्यंत इतके दुःख आणि आपत्ती यांमध्ये भगवंताने निभावून आपल्याला जिवंत ठेवले. त्यामुळे भविष्यकाळाची काळजी करणे मूर्खपणाचे नव्हे काय ? – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
आ. ज्याप्रमाणे तेलाचा एक थेंब त्याच्या अंगभूत गुणधर्मभिन्नतेमुळे पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही, त्याप्रमाणे दोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्याविना साधकाला दोषविरहित अन् सर्वगुणसंपन्न ईश्वराशी एकरूप होत येत नाही.
गुणसंवर्धन करतांना आपण प्रयत्नांसाठी घेतलेले स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू ईश्वराच्या सहवासात नाहीसे होत आहेत, असा भाव ठेवा ! – (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ
इ. प्रतिमा जपायची असेल, ती भगवंताची जपा आणि आरशात स्वतःची नव्हे, तर स्वतःतील भगवंताची प्रतिमा बघा !
देवाची प्रतिमा जपणे हीच आपली खरी प्रतिमा आहे. प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट, असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. आपल्या प्रत्यक्ष दिसणार्या या देहात जो सूक्ष्मातीसूक्ष्म रूपात भगवंत राहिला आहे, त्याची प्रतिमा उत्कटच असणार नाही का ? बाह्य नेत्रांनी दिसतो, तो देहाचा जडपणा गळून गेला की, अंतरात्म्यात राहिलेल्या या भगवंताचे उत्कट स्वरूप आपल्यापुढे स्पष्ट होते. येथपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
ई. ताण घेण्यापेक्षा संघर्ष करुन पुढे जा !
ताण घेणे, या दोषामुळे व्यावहारिक जीवनात आणि साधनेत आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. ताण येतो, ही ढाल आपण पुढे करत राहिलो, तर संघर्ष करुन पुढे कधीच जाता येणार नाही आणि आपण साधनेत मागे राहू. ताण घेणे, या दोषामुळे साधना आणि सेवा यांच्या फलनिष्पत्तीवर परिणाम होऊन आध्यात्मिक घसरणही होऊ शकते. – (पू.) श्री. संदीप आळशी
१०. गुणसंवर्धन सारणी कशी लिहावी ?
गुण-संवर्धन सारणी लिहिणे : प्रतिदिन गुणसंवर्धन सारणी लिहावी. आठवड्याभरात जे गुण वाढवण्यासाठी ठरवले असेल, त्यासाठी प्रयत्न करतांना किती ठिकाणी प्रयत्न करणे जमले आणि किती ठिकाणी जमले नाही, हे सारणीत लिहावे. ज्या ठिकाणी जमले नाही, त्या ठिकाणी उपाययोजनाही लिहावी. पुढे दिलेल्या गुणसंवर्धन सारणी लिहिण्याच्या उदाहरणावरून हे लक्षात येईल.
११. सुसंस्कारांचे महत्त्व !
अ. सुसंस्कारित मन जिवाला भरकटू देत नसणेे
सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांंचे, हिंदु धर्माचरण करणार्या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. देवाने दिलेली ही समष्टी सेवा आहे; पण हे समाजाला कळत नाही आणि तो भरकटलेल्या तरुण युवकांप्रमाणे दूरदर्शनच्या, त्यातील अनावश्यक मालिका यांच्यात वहावत गेला आहे.
आ. कुसंस्कार होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वत्र फोफावलेला चंगळवाद
आम्हाला कोठे हे लहानपणी मिळाले ? आम्ही मोठ्यांच्या कह्यात राहून मन मारले. आता मिळतेय ते आधाशासारखे खाऊया. मनाप्रमाणेच करूया, हे विचार लोकांच्या मनात प्रबळ असतात. असे कुसंस्कारित मन पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार ? त्यामुळेच पुढची, म्हणजेच आताची पिढी पूर्ण भरकटली गेली आहे. त्यातच प्रसारमाध्यमे, रस्त्यावरही सहजपणे दिसणारी अयोग्य विज्ञापने, भ्रमणभाष, ई-मेल, फेसबूक अशी अनंत आधुनिक साधने सहजपणे उपलब्ध झाल्याने त्यात भरच पडली आहे. त्यातून योग्य ते शिकण्यापेक्षा नको त्या मार्गाला नवीन पिढी वहावत चालली आहे. प्रत्येक सुसंस्कार आपणास देवाकडे नेतो; पण कुसंस्कार असुरांच्या राज्यातच नेऊन सोडतो आणि अराजकही माजवतो. तेच आज आपणाला सर्वत्र दिसत आहे.
इ. समाजाला आज सुराज्याची आवश्यकता असणे
समाजाला आज पाहिजे आहे एक सुराज्य ! त्यात असेल धर्माचरण ! राष्ट्र, धर्म, देव यांना मानणारा आदरणीय समाज ! तोच या युवा पिढीला सन्मार्ग दाखवतील. यासाठीच सनातन संस्था आणि काही हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यासाठी सतत कार्यरत आहेत. त्याच समवेत पाहिजे देवाचे अधिष्ठान. समर्थ रामदासस्वामींनी म्हटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥ तेच सात्त्विक काम सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले करत आहेत. त्याला अनेक संत आणि साधक हातभार लावत आहेत.
ई. पुढची पिढी सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी सत्सेवा !
नागरिकांनो, हिंदु राज्य येणारच आहे; पण त्यासाठी पुढची पिढी सुसंस्कारित व्हायला हवी; म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जसे श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचललाच होता; पण त्यात स्थुलातून प्रत्येक गोप-गोपी काठी लावून सहभागी झाले होते, तशीच स्थिती आजही आहे. आपल्यालाही तेच कार्य करून केवळ हातभार लावण्यास सज्ज व्हायचे आहे. चला सिद्ध होऊया पुढची पिढी सुसंस्कारित करायला ! तीच आपली सत्सेवा आहे. हे लक्षात घेऊया.
कृष्णानेे मला हे विचार सुचवले. ते त्याच्या चरणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करते. प.पू. डॉक्टर, विचार देणारे तुम्हीच आणि प्रत्यक्षात कोणाच्याही माध्यमातून उतरवून घेणारे तुम्हीच ! तुमच्या चरणी अपार कृतज्ञता व्यक्त करते.
– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१२. जीवन खऱ्या अर्थाने सत्यं, शिवं आणि सुंदरम् करणारे दैवी गुण !
अ. खरे बोलणे
खरे बोलणार्यांचा जय होतो; कारण त्यांच्या पाठीशी नेहमी ईश्वर असतो.
आ. प्रामाणिकपणा
प्रामाणिकपणा हा गुण मनाचा साधेपणा दर्शवतो. प्रामाणिक व्यक्ती सर्वांनाच आवडते. देवालाही प्रामाणिकपणा आवडतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःशी आणि इतरांशीही प्रामाणिक रहायला हवे.
इ. समाधानी वृत्ती
आवश्यकता नसलेल्या गोेष्टीही विकत घेणे, दुसर्याकडे असलेली वस्तू स्वतःकडेही असावी, असे वाटणे आदी दुर्गुणांमुळे वृत्ती असमाधानी रहाते. त्यामुळे मन दुःखी होते.
ई. तत्परता
हा गुण वाढल्यामुळे आळस या शत्रूचा नाश होईल.
उ. स्वावलंबन
या गुणामुळे आपल्यात नियोजनकौशल्य, चपळता या गुणांची वाढ होते. आत्मविश्वासही वाढतो.
ऊ. वेळेचे नियोजन करणे
दिवसभरातील कामे आणि सेवा यांचे चिंतन होते. कोणते काम किती वेळेत पूर्ण करणार, हे ओळखता येऊन स्वतःची क्षमता वाढते. क्षमतेचा पूर्ण वापरही होतो.
ए. प्रेमळपणा
प्रेमाने सर्व जग जिंकता येते. प्रेम हे अत्तरासारखे असते. दुसर्याला प्रेम दिल्याने ते आपल्यालाही मिळते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात