साधी राहणी असणारे, जगाला नामस्मरणाची शिकवण देणारे आणि अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन झालेले नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज !

श्री. शशिकांत ठुसे

परम श्रद्धेय पूजनीय श्री काणे महाराज (गोळ्या वाटणारे बाबा) यांनी २२.१०.२०१७ या दिवशी पहाटे ५ वाजता देहत्याग केला. त्यानिमित्त प.पू. महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन, भजन आणि भंडारा ४.११.२०१७ या दिवशी वारुळवाडी (नारायणगाव, जिल्हा पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने प.पू. काणे महाराज यांचा अल्प परिचय, कार्य आणि शिकवण येथे देत आहोत.

प.पू. काणे महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. प.पू. महाराजांचा अल्प परिचय

अ. नाव : श्री रघुवीर रंगनाथ काणे

आ. जन्मदिनांक आणि जन्माचे ठिकाण : होळी पौर्णिमा (वर्ष १९३२), ठाणे

इ. शिक्षण : डॉक्टर (B.A.M.S.), पोतदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, मुंबई.

ई. नोकरी : आरोग्य अधिकारी (हेल्थ ऑफिसर) म्हणून काही काळ काम केले.

उ. संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक : ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. संघाचे आद्य सरसंघचालक पू. डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती.

 

२. प.पू. महाराजांची आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने झालेली वाटचाल

२ अ. अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे

त्यांनी आईला वाचून दाखवण्याच्या निमित्ताने अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यात त्यांचे मन रमू लागले. पुढे त्यांनी योगवासिष्ठ नंतर प्रस्थानत्रयी, म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे शांकरभाष्य + ब्रह्मसूत्रे + दश उपनिषदे यांचा सांगोपांग अभ्यास केला. नंतर त्यांचे एकच ठाम मत झाले की,

हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् ।

कलौ नास्त्यैव नास्त्यैव नास्त्यैव गतिरन्यथा ॥

अर्थ : कलियुगात भवसागर तरण्याचा (भगवंताच्या प्राप्तीचा) मार्ग म्हणजे नामस्मरण. याविना दुसरा तरणोपाय नाही.

त्यांना एकनाथी भागवत, पांडव प्रताप, हरिविजय, नामदेव गाथा, तुकाराम गाथा, भक्त विजय, दत्तप्रबोध इत्यादी ग्रंथ आवडत असत.

२ आ. अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन होणे

लग्नाची इच्छा असूनही केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी ते अखंड ब्रह्मचारी राहिले. वैराग्य आल्यावर ते ठाणे ते गाणगापूर पायी चालत गेले. तेथे ते निरिश्‍च अवस्थेत (भिकार्‍यावत्) रहात होते. त्यांना प्रत्यक्ष दत्तात्रेयाचे दर्शन झाले. नंतरच्या साधनेच्या काळातही त्यांना मच्छिंद्रनाथ, श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री समर्थ रामदासस्वामी आदींची दर्शने झाली.

२ इ. अनेक संतांची सेवा करणे

सज्जनगडावरील प.प. भगवान श्रीधरस्वामी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. नंतरच्या काळात ते नरसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे काही काळ कृष्ण मंदिरात राहिले. पुढे त्यांनी कोल्हापूरजवळील पैजारवाडीचे प.पू. दत्त चिले महाराज, पेणचे प.पू. अमलानंद महाराज, अमरावतीचे प.पू. अण्णा महाराज जोशी, आळंदीचे प.पू. आनंदाश्रम स्वामी, इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत भक्तराज महाराज अशा अनेक संतांची सेवा केली.

 

३. साधी राहणी

संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाच्या बारा अभंगापैकी १० व्या अभंगातील (ओवी क्र. ३ आणि ४) राहातो मूर्खवत जगामाजी । जगात पिशाच्च अंतरी शहाणा । सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो ॥, म्हणजे संत जगात मूर्खाप्रमाणे किंवा पिशाच्चाप्रमाणे भासत असले, तरी अंतरी तेच खरे शहाणे असतात, याप्रमाणे त्यांची साधी राहणी होती.

 

४. सामाजिक कार्य

अ. अनेक वर्षे ते स्वतः सर्वत्र फिरून शेकडो लहान मुलांना लक्षावधी रुपयांच्या लिमलेटच्या गोळ्या वाटत आणि ते त्यांना हरिपाठ आणि मनाचे श्‍लोक ही पुस्तकेही देत.

आ. रस्त्याच्या कडेला रहाणार्‍या दरिद्री लहान मुला-मुलींना ते नवे कपडे, दिवाळीच्या वेळी काही वस्तू स्वतः विकत घेऊन त्यांना प्रेमाने देत होते.

 

५. शिकवण

अ. सतत नामस्मरण करा. राहणीमान साधे ठेवा. जेवतांना, झोपतांना आदी प्रसंगी सतत नामस्मरण करा.

आ. प्रतिदिन हरिपाठ, मनाचे श्‍लोक आणि संत तुकारामांचे बारा अभंग म्हणावेत.

इ. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील कल्याण मासिकाचे आद्य संपादक श्री हनुमानप्रसाद पोद्दारभाईजी (जीवनकाल १८९६ ते १९७१) यांच्या चरित्राचे पारायण करत रहा. (चरित्राचे नाव एक अलौकिक विभूती भाईजी, श्री भाईजी यांना प्रत्यक्ष कृष्णदर्शन, राधाकृष्णाचे युगुल दर्शन, नारदमुनी आणि अंगिराऋषी यांची सदेह भेट झाली होती.)

ई. प्राणीमात्रांवर दया करावी. यानुसार प.पू. काणे महाराज स्वतः कुत्र्यांना शिरा, मांजरांना पेढा, बकर्‍यांना लेमन गोळ्या इत्यादी देत. ते आजारी कुत्र्यांचीही सेवा करत. त्यांच्या गादीवर भाटी (मांजर) झोपली असल्यास ते तिला न उठवता स्वतः भूमीवर चटई घालून बसत.

असे पूजनीय ब्रह्मविद्वरीष्ठ काणे महाराज ज्याला जसे समजेल, अशा भाषेत गोष्टींच्या रूपाने उद्बोध करत असत. त्यांच्या चरणी शतशः साष्टांग दंडवत !

॥ हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ॥

॥ हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

– श्री. शशिकांत ठुसे, पुणे (३०.१०.२०१७)

 

प.पू. काणे महाराज – एक अलौकिक विभूती !

मी राष्ट्रसंत स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार कोकणातून नारायणगाव येथे स्थलांतरित झालो. तेव्हा माझा संत भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. शशिकांत ठुसे यांच्याशी संपर्क आला. त्या वेळी मला त्यांच्याकडून प.पू. काणे महाराज यांच्याविषयी माहिती मिळाली. ठुसेकाकांनी मला सांगितले, परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. काणे महाराज यांच्याकडे शिकण्यासाठी येत होते. तेव्हापासून प.पू. काणे महाराज यांच्याविषयी मला फार आदर वाटू लागला.

१. प.पू. काणे महाराज यांचा लाभलेला सत्संग

मी ठुसेकाकांच्या घरी प.पू. काणे महाराज यांच्या दर्शनाला अधूनमधून जात असे. बंडी, लुंगी, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा, असा प.पू. काणे महाराज यांचा साधा वेश असायचा.

प.पू. काणे महाराज गावात फिरायला यायचे. ते गावातील लहान मुलांना लेमनच्या गोळ्या आणि ग्रंथ (गोरखपूर प्रेसचे) भेट द्यायचे. त्या वेळी त्यांना गावातून त्यांच्या आश्रमात (श्री. ठुसेकाकांच्या घरी) सोडण्याची सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने मला मिळत होती. मलाही ते अधूनमधून प्रसाद (लेमनच्या गोळ्या) आणि ग्रंथ भेट देत असत.

२. वैद्यकशास्त्राचे ज्ञान

ते बी.ए.एम्.एस्. होते; पण त्यांना आयुर्वेदासह अन्य वैद्यकशास्त्रांचेही ज्ञान होते. ते अ‍ॅलोपॅथीचे औषधोपचार न करण्यासाठी आग्रही असत. त्यांना मधुमेह होता; पण इतक्या वर्षांत त्यासाठी त्यांनी अ‍ॅलोपॅथीची एकही गोळी न घेता पथ्य पाळून आणि आयुर्वेदीय औषध घेऊन तो नियंत्रणात ठेवला.

३. श्री. शशिकांत ठुसे यांनी वर्णिलेली प.पू. काणे महाराज यांची थोरवी

३ अ. प.पू. काणे महाराज यांचे सतत ईश्‍वराशी अनुसंधान असल्यामुळे त्यांना भक्तांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देता येणे

प.पू. काणे महाराज हे पुष्कळ विद्वान होते. श्री. ठुसेकाका सांगत, प.पू. काणे महाराज यांना कुणी प्रश्‍न विचारला आणि त्याचे उत्तर त्याला कधी मिळाले नाही, असे कधी झाले नाही. एका भक्ताने प.पू. काणे महाराज यांना विचारले, तुम्हाला उत्तर देणे कसे जमते ? त्यावर प.पू. काणे महाराज यांंनी त्यांना व्यवहारातले उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, कापडाच्या दुकानात गेल्यावर तुम्हाला दुकानदार हवा तो कपडा काढून दाखवतो आणि नंतर जागेवर ठेवून देतो. तसेच हे आहे. तेव्हा मला वाटले, त्यांचे (प.पू. काणे महाराज यांचे) सतत ईश्‍वराशी अनुसंधान असल्यामुळे त्यांना हे शक्य होते.

३ आ. प.पू. काणे महाराज यांचा श्री गुरुदेवांविषयीचा (श्रीधरस्वामी महाराज (सज्जनगड) यांच्याविषयीचा) भाव !

शिष्याचा श्री गुरुदेवांविषयी भाव कसा असायला हवा ?, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प.पू. काणे महाराज !, असे ठुसेकाका सांगत. प.पू. काणे महाराज म्हणत, मी श्रीधरस्वामी महाराज (सज्जनगड) यांचा शिष्य म्हणवून घेण्यासाठी पात्र नाही. ते ऐकून खरेतर मलाच माझी लाज वाटली.

४. प.पू. काणे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

ठुसेकाका सांगतात, प.पू. काणे महाराज म्हणतात की, आदर्श शिष्याची सर्व लक्षणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. काणे महाराज यांच्याकडे शिकण्यासाठी येत. तेव्हा प.पू. काणे महाराज त्यांना सांगत, एकदा लिहिण्यासाठी बसल्यावर मी सांगितल्याविना थांबायचे नाही आणि उठायचे नाही. याची पूर्वसिद्धता म्हणून परात्पर गुरु डॉक्टर कागदाचा गठ्ठा, ८ ते १० लेखण्या आणि पाणी जवळ घेऊन बसत. प.पू. काणे महाराज यांच्या सांगण्यानुसार ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थांबता लिखाण करत असत.

५. प.पू. काणे महाराज यांच्या आवडी-निवडी

अ. त्यांना शीतकपाटातील थंड पाणी आवडायचे.

आ. त्यांना घरातील चक्क्याचे आंबट-गोड श्रीखंड आवडायचे.

इ. त्यांना भजीही आवडायची. त्यांना जास्त खारट आणि तिखट आवडत नसे.

ई. त्यांना गार हवेचा आणि थंडीचा त्रास व्हायचा.

उ. त्यांना तीव्र प्रकाशाचाही त्रास होत असे.

६. प.पू. काणे महाराज यांचे अध्यात्मावरील अमूल्य मार्गदर्शन

अ. श्री गुरुदेवांना अपेक्षित असे वागण्यासाठी आणि त्यांना अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी प्रयत्न करा. झटत रहा.

आ. सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांना कधीच जवळ करू नका. त्याने मस्ती (गर्व) येते.

इ. सतत नामस्मरण करा. तुमचे नामस्मरण कुठेही आणि कधीही चालू असले पाहिजे.

७. प.पू. काणे महाराज यांचा देहत्याग

७ अ. देहत्याग करण्याच्या दीड ते दोन मास (महिने) आधीपासून अल्प प्रमाणात अन्न ग्रहण करणे

प.पू. काणे महाराज यांना स्वतःच्या मृत्यूविषयी पूर्ण कल्पना होती. ते ठुसेकाकांच्या जुन्या घरी रहात असत. देहत्याग करण्याच्या दीड ते दोन मास (महिने) आधीपासून ते फारसे जेवत नसत.

७ आ. देहत्यागाच्या आधी पाच दिवस श्री. ठुसेकाका रहात असलेल्या घरात वास्तव्याला येणे

देहत्यागाच्या आधी पाच दिवस त्यांनी अकस्मात् श्री. शामदादा कोल्हे (श्री. शामदादा प.पू. काणे महाराज यांची मनोभावे सेवा करत.) यांना पठारावर (मनोहरबाग, नारायणगाव येथे श्री. ठुसेकाकांच्या घरी) जायचे, असे सांगितले. त्यांच्या इच्छेप्रमाणे शामदादा त्यांना मनोहर बागेत घेऊन आले. तेथेही त्यांनी अन्न-पाणी वर्ज्य केले.

७ इ. दिवाळी झाल्यावर ब्राह्ममुहुर्तावर देहत्याग करणे

१९.१०.२०१७ या अमावास्येच्या दिवशी ठुसेकाकांनी मला प.पू. काणे महाराज यांना तपासून जा, असे सांगितले. मी रात्री ८.१५ वाजता ठुसेकाकांच्या घरी गेलो आणि प.पू. काणे महाराज यांना तपासले. त्यांचा श्‍वास आणि रक्तदाब सर्व व्यवस्थित होते. त्यांना तपासून मी ठुसेकाकूंशी बोललो. त्यांनी सांगितले, प.पू. काणे महाराज यांनी अन्नत्याग केला आहे. त्या वेळी मी काकूंना सांगितले, त्यांनी सर्व नियोजन केले आहे. ते देह ठेवतील. नंतर मी ठुसेकाकांशी बोललो. आम्ही पंचांगात बघून अमावास्या कधी संपते ?, याचीही निश्‍चिती केली. याच वेळी प.पू. काणे महाराज २२ ऑक्टोबर या दिवशी देह ठेवतील, असा विचार माझ्या मनात आला; पण मी ठुसेकाकांना तसे सांगितले नाही. प.पू. काणे महाराज यांनी २२.१०.२०१७ या दिवशी दिवाळी झाल्यावर (इतरांना कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन) ब्राह्ममुहुर्तावर (पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान) देह ठेवला.

८. प.पू. काणे महाराज यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

डॉ. राहुल दवंडे

अ. प.पू. काणे महाराज यांनी देह ठेवल्यावर त्यांचा देह चैतन्यमय वाटत होता, तसेच त्यांची त्वचा तेजस्वी दिसत होती.

आ. माझा श्री गुरुदेव दत्त । हा नामजप अखंड होत होता.

इ. वातावरणात दाब जाणवत नव्हता.

ई. तेथील वातावरण चैतन्यमय होते. येथे कुणीतरी देह ठेवला आहे, असे जाणवत नव्हते.

उ. माझे मन निर्विचार होते.

ऊ. मला शांतीची अनुभूती आली.

– डॉ. राहुल दवंडे, नारायणगाव, पुणे. (२२.१०.२०१७)

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment