प.पू. भगवानदास महाराज, त्यांच्या धर्मपत्नी प.पू. रुक्मिणीबाई आणि पुत्र प.पू. दास महाराज यांचा साधनाप्रवास !

प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीबाई

‘सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अनेक संतांची तपोभूमी ! कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज, पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, माणगावचे प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी, हे सर्व सिंधुदुर्गातील संत आहेत. सिंधुदुर्गातील बांदा हे गाव, म्हणजे ‘अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे !’ असा दिव्य मंत्र देणारे श्री संत सोहिरोबानाथ आंबिये यांची जन्मभूमी आहे. याच गावात प.पू. भगवानदास महाराजांनी घोर तपश्‍चर्या करून संतांच्या मालिकेत एक महत्त्वपूर्ण पुष्प गुंफले. थोर तपस्विनी प.पू. रुक्मिणीबाई या त्यांच्या अर्धांगिनी होत्या. त्या ‘प.पू. आई’ म्हणून सर्वांना परिचित होत्या. प.पू. भगवानदास महाराज, त्यांची धर्मपत्नी प.पू. रुक्मिणीबाई आणि पुत्र प.पू. दास महाराज यांच्या साधनाप्रवासाविषयीची माहिती पुढे दिली आहे.

श्रीमती शशिकला सरपोतदार

 

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक

१. कर्नाटक राज्यातील सीतेमनी या गावातील वास्तव्य

प.पू. भगवानदास महाराज कर्नाटक राज्यातील सीतेमनी या गावात वास्तव्य करायचे. तेथे त्यांनी एक भव्य श्रीराम मंदिर उभे केले. काही दिवसांनी तेथे आलमट्टी धरण बांधायचे असल्याने त्यांनी सीतेमनी गावातून स्थलांतर केले.

 

२. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पानवळ, बांदा येथे वास्तव्यास येणे

२ अ. हिंस्र श्‍वापदे असलेल्या पानवळ येथील घनदाट अरण्यात
तपश्‍चर्या करण्यासाठी जाणे आणि तेथेच एक पर्णकुटी बांधून साधनेला आरंभ करणे

त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य बांदा या गावाजवळील पानवळ या गावी रहायला गेले. पानवळचा परिसर पूर्वी अत्यंत घनदाट जंगलाने व्यापलेला होता. या जंगलात हिंस्र श्‍वापदे भक्ष्याच्या शोधात भटकत असत. त्यामुळे सहसा या परिसरात कुणीही जात नसे. अशा या भयंकर अरण्यात रहाण्याचा विचारसुद्धा कुणी करू शकणार नाही. वर्ष १९५९ मध्ये प.पू. भगवानदास महाराज, त्यांच्या धर्मपत्नी प.पू. रुक्मिणीआई आणि चि. रघुवीर (प.पू. दास महाराज) या अरण्यात उपासना करण्यासाठी पोहोचले. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि घनदाट अरण्य यांपैकी काहीही त्यांना दृढ निश्‍चयापासून रोखू शकले नाही. या ठिकाणी त्यांनी एका पर्णकुटीत साधनेला आरंभ केला. या घनघोर अरण्याला त्यांनी ‘गौतमारण्य’ असे नाव दिले. त्यांच्या समवेत होत्या केवळ श्रीराम पंचायतनाच्या संगमरवरी मूर्ती आणि अंतःकरणात अखंड रामनामाचा जप !

२ आ. ‘प.पू. भगवानदास आश्रम’ उभारणे आणि आश्रमात वास्तव्य करून उदरनिर्वाहासाठी शेती करणे

प.पू. भगवानदास महाराज यांनी ११ एकर भूमी विकत घेतली आणि त्यांच्या भक्तांनी दिलेल्या श्रीराम पंचायतनच्या मूर्ती घेऊन ते बांदा या गावी आले. येथे काही दिवस श्री. सुभेदार यांच्याकडे त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर प.पू. भगवानदास महाराज यांनी ११ एकर भूमीवर ‘प.पू. भगवानदास आश्रम’ उभा केला आणि ‘ऋषींची कृषी’ या तत्त्वानुसार त्यांनी उदरनिर्वाहासाठी येथेच शेती करण्यास आरंभ केला.

 

३. प.पू. भगवानदास महाराज आणि प.पू. रुक्मिणीआई यांनी केलेली कठोर तपःसाधना

३ अ. प.पू. भगवानदास महाराज यांनी १३ कोटी श्रीरामनामाची पूर्तता करणे

प.पू. भगवानदास महाराज यांनी लहानपणापासून कठोर साधना केली होती. प.पू. भगवानदास महाराज यांचे रूप विलक्षण होते. त्यांच्या नेत्रांत प्रखर तेज होते. त्यांची पांढरीशुभ्र दाढी, तसाच केशसंभार, पांढरी वस्त्रे आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेले यांचे दिव्य रूप पाहून हात आपोआप जोडले जायचे आणि ‘त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे’, असे वाटायचे. त्यांच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटायचे. त्यांनी १३ कोटी श्रीरामनामाची पूर्तता केली होती.

३ आ. संसारातील कर्तव्ये वैराग्यभावाने पार पाडणार्‍या प.पू. रुक्मिणीआई !

३ आ १. प.पू. रुक्मिणीआई म्हणजे वैराग्य, त्याग आणि प्रीती यांचे मूर्तीमंत रूप ! : प.पू. रुक्मिणीआई या कोकणच्या संत होत्या. ‘अखंड रामनामाचा जप करणे’, हीच त्यांची साधना होती. संसारातील कर्तव्ये त्यांनी वैराग्यभावाने पार पाडली. त्यांनी षड्रिपूंचा त्याग केला. त्या सर्वांशी प्रेमाने वागत असत. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, या उक्तीप्रमाणे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा नंदादीप त्यांनी आपल्या जीवनामध्ये सतत तेवत ठेवला.

एका सधन कुटुंबात जन्माला आलेल्या प.पू. आई या प.पू. भगवानदास महाराज यांच्या समवेत गृहस्थाश्रमी जीवन जगत होत्या. त्यांचे जीवन म्हणजे वैराग्य, त्याग आणि सर्वांवर प्रीती यांचे मूर्तीमंत रूप ! त्यांचे जीवन श्रीरामस्वरूप झाले होते.

पानवळ येथील गौतमारण्यात त्यांनी झाडांवर प्रेम केले. दगड-धोंड्यांमध्ये देव पाहिला. ‘जीव-जंतू हे ईश्‍वराचे अंश आहेत’, असे मानले. आश्रमात येणार्‍या प्रत्येकाची प.पू. आई आपुलकीने विचारपूस करायच्या. भुकेलेल्या आणि तहानलेल्या प्रत्येकाला खाऊ-पिऊ घालायच्या. सर्वांत शेवटी स्वतः अन्न ग्रहण करायच्या.

३ आ २. व्रतस्थ राहून आध्यात्मिक जीवन जगणे : प.पू. आई नेहमी एकभुक्त असायच्या. घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत त्या उपवास करायच्या. सोमवार, गुरुवार, शनिवार, महाशिवरात्र आणि संकष्टी या दिवशी त्या उपवास करत असत. इतरांची आत्मीयतेने काळजी घेणार्‍या प.पू. आई स्वतःच्या देहाला कठोर साधनेत ठेवायच्या. त्या चुलीजवळ स्वयंपाक करतांना हातात जपमाळ घेऊन अखंड रामनामाचा जप करायच्या, तसेच रामायण आणि दासबोध यांचे वाचन करायच्या. त्यांच्या व्रतस्थ जीवनातून अनेकांना प्रेरणा मिळाली.

 

४. देवाशी विलक्षण नाते असलेला रघुवीर !

प.पू. आईंचे सुपुत्र रघुवीर याचा बालहट्ट होता, ‘उभे राहून श्रीरामाचे पाय दुखत असतील. त्यांना कधी बसवणार ?’ त्यांना श्रीरामाचे कष्ट पाहून रडू यायचे. येथील मंदिरात श्रीराम आणि सीतामाई यांच्या सिंहासनावर बसलेल्या मूर्ती आहेत. असे देवाशी विलक्षण नाते असलेली विलक्षण विभूती, म्हणजे प.पू. रघुवीर महाराज (प.पू. दास महाराज) !

 

५. श्रीराम मंदिराची उभारणी

माझे वडील श्री. अण्णा डेगवेकर आणि श्री. काका पेटकर यांनी छोट्या राममंदिराची उभारणी करतांना साहाय्य केले. आम्हाला मंदिर उभारणीच्या या पुण्यकर्मात साहाय्य करण्याची संधी मिळाली. हे आमचे पूर्वसुकृतच म्हणावे लागेल. प.पू. भगवानदास महाराज यांनी अनेक अडचणींवर मात करून श्रीराम मंदिराची वास्तू निर्माण होईपर्यंत पराकाष्ठेचे प्रयत्न केले.

 

६. प.पू. भगवानदास महाराज यांचे महानिर्वाण

प.पू. भगवानदास महाराज यांचे शरीर थकले होते. वाल्मीकि रामायण, दासबोधाचे वाचन आणि रामनामाची अखंड साधना करत असतांनाच श्रीराम मंदिराच्या स्थापनेचा ध्यास घेत वर्ष १९६५ मध्ये प.पू. भगवानदास महाराज यांचे महानिर्वाण झाले. त्यानंतर प.पू. आई आणि श्री रघुवीर महाराज (प.पू. दास महाराज) यांनी पुढे येथेच वास्तव्य केले. या परिस्थितीत रामरायाची साथ, प.पू. भगवानदास महाराज यांची कृपा आणि पुण्याई, यांमुळे त्यांच्या पुढील भविष्याने उभारी घेतली. श्रीरामाचे नाम, जपजाप्य अशी त्यांची नेहमीची उपासना चालू झाली.

७. प.पू. रुक्मिणीआईंनी पानवळ येथे वर्ष १९७२ मध्ये श्रीराम पंचायतनाची स्थापना करून प.पू. भगवानदास महाराज यांची शेवटची इच्छा पूर्ण केली.

 

८. पानवळ येथील गौतमारण्यातील प.पू. दास महाराज यांचे आश्रमजीवन

८ अ. उदरनिर्वाहासाठी शेती, पशूपालन आणि दुग्ध व्यवसाय करणे

दैनंदिन जीवन जगण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी प.पू. दास महाराज यांनी अपार कष्ट घेतले. त्यांनी शेती, पशूपालन आणि दुग्धव्यवसाय केला. त्यांनी प्राण्यांवर प्रेम केले. त्यांच्यासमवेत प.पू. आईही अपार कष्ट करत होत्या. त्यांनी कुणाकडे कधीच याचना केली नाही. लोकांनीही त्यांना साहाय्य केले. असे दिवस चालले होते.

८ आ. प.पू. रघुवीर महाराज यांचा गृहस्थाश्रमात प्रवेश

वर्ष १९७८ मध्ये प.पू. रघुवीर महाराजांचा (प.पू. दास महाराज यांचा) कु. कुंदा डेगवेकर (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) यांच्याशी विवाह झाला. त्यांनी मोठ्या मनाने गृहस्थाश्रम स्वीकारला. प.पू. आईंच्या प्रेमळ सहवासात आणि भक्तीमय वातावरणात दोघांचा संसार चालू झाला. श्रीरामाची सेवा चालूच होती.

८ इ. प.पू. आईंचे महानिर्वाण

आता आई थकल्या होत्या. वर्ष १९८६ मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे महानिर्वाण झाले. प.पू. रुक्मिणीआईंच्या महानिर्वाणानंतर मोठ्या धैर्याने रघुविरांनी (प.पू. दास महाराज यांनी) दु:खाचा डोंगर बाजूला सारला. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी प.पू. आईंच्या शिकवणीनुसार आपले कर्तव्य आणि भक्तीमार्ग पुढे चालू ठेवला.

 

९. प.पू. रघुवीर महाराज यांच्या दुचाकीला अपघात होणे आणि
श्रीरामराया अन् सद्गुरु यांनी त्यांना जीवनदान अन् पुनर्जीवनासाठी शक्ती देणे

वर्ष २००७ मध्ये प.पू. रघुवीर महाराज यांच्यावर एक संकट आले. दुचाकीने जात असतांना मार्गावर एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. जिवावरचे संकट पायावर निभावले. ट्रकचे चाक त्यांच्या पायावर आले. त्यांचा पाय दुभंगला. पुष्कळ रक्त वाहिले. या परिस्थितीत प.पू. दास महाराज मनाने स्थिर होते. केवढी ही अफाट सहनशक्ती ! तेथे श्रीरामराया आणि सद्गुरु यांनी त्यांना जीवनदान अन् पुनर्जीवनासाठी शक्ती दिली. लगेच त्यांना गोव्यातील रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्यांच्या पायावर मोठे शस्त्रकर्म करण्यात आले. दुभंगलेल्या पायाची हाडे जोडून आधुनिक वैद्यांनी पायाची पुन्हा जुळवणी केली. त्यानंतर पाच वर्षांनी प.पू. रघुवीर महाराज काठी घेऊन चालू लागले. हा एक चमत्कार होता.

 

१०. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने प.पू. दास महाराज पूर्ण बरे होणे

‘प.पू. दास महाराज यांचा पाय जोडला जाणे’, हा आधुनिक विज्ञानाचा चमत्कार नव्हता. आधुनिक वैद्यांनी त्यांना केवळ शारीरिक आणि मानसिक आधार दिला. खरा आधार होता तो सनातन संस्थेचा ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. दास महाराज यांना सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमात नेले. तेथे त्यांची रहाण्याची आणि उपचारांची सोय केली. मोठ्या आस्थेने आपल्या बंधूप्रमाणे त्यांचे प्रेमाने दायित्व घेतले. आश्रमातील साधकांनी त्यांची प्रेमाने सेवा केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादानेच आज ते पूर्ण बरे आहेत. या पुढील १० वर्षांच्या काळात त्यांनी मोठे कार्य केले. प.पू. दास महाराज यांच्या पत्नी (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) यांनीही या कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड दिले.

११. गौतमारण्यातील प.पू. भगवानदास आश्रमात
श्रीराम पंचायतनाच्या भव्य मंदिराचा जीर्णोद्धार होऊन
प.पू. दास महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाचे कार्य पूर्णत्वास जाणे

पानवळ, बांदा येथील श्रीराम मंदिरातील श्रीराम पंचायतनच्या मूर्ती

 

श्रीराममंदिर

आज गौतमारण्यातील प.पू. भगवानदास आश्रमात निसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयींनी युक्त असे छोटेसे घर आहे. तेथे देवघर असून त्यात फुलांची आरास केलेली असते. हे देवघर प्रत्यक्ष पहाणार्‍याला सुखद आणि दिव्य अनुभव येतो. वर्ष २०१५-१६ या कालावधीत येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झाला. श्रीराम पंचायतनाचे भव्य मंदिर उभारलेे. श्री सद्गुरु समर्थ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाशीर्वाद, सनातनच्या साधकांचा सक्रीय सहभाग आणि येथील स्थानिक लोकांचा सहभाग, यांमुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास गेले आणि प.पू. दास महाराज यांच्या जीवनाचे महत्त्वाचे कार्य पूर्णत्वास गेले. गेले वर्षभर (वर्ष २०१५-२०१६) प.पू. दास महाराज यांचे मौनव्रत होते. ते पू. (सौ.) माई यांच्या साथीने पूर्ण झाले.

 

१२. ५० वर्षांतील सर्व आठवणी एखाद्या चलचित्रपटासारख्या
आठवणेे आणि रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले
यांची भेट झाल्यावर त्यांनी या आठवणी लिहिण्याची प्रेरणा देणे

वर्ष १९७० मध्ये माझा विवाह झाला. त्या पूर्वीपासून मी आश्रमात आणि माझ्या माहेरी जाते. तेथे रहाते. गेल्या ५० वर्षांतील सर्व आठवणी एखाद्या चित्रपटासारख्या मला आठवतात. मे २०१७ मध्ये मी ८ दिवस गौतमारण्यातील ‘प.पू. भगवानदास महाराज आश्रमा’त राहिले होते. त्या वेळी मी माझ्या बहिणीसमवेत (पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांच्या समवेत) रामनाथी आश्रमात गेले होते. तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली. त्या वेळी त्यांचे मोलाचे आशीर्वाद मला मिळालेे. त्यांनीच मला या आठवणी लिहिण्याची प्रेरणा दिली; म्हणूनच या आठवणींचा सुगंधी पुष्पहार श्री सद्गुरु प.पू. भगवानदास महाराज यांच्या चरणी अर्पण करत आहे.

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः मन्त्रमूलं गुरोर्वाक्यम् ।

पूजामूलं गुरोः पादौ मोक्षमूलं गुरोः कृपा ॥

अर्थ : ‘गुरूंचे रूप सतत पहायला मिळावे’, हे माझ्या ध्यानाचे कारण आहे. गुरूंचे प्रत्येक वाक्य माझ्यासाठी मंत्राप्रमाणे आहे. गुरूंचे चरण हे माझ्यासाठी पूजेचे मूलस्थान आहे आणि गुरूंची कृपा हाच मोक्षाचा मार्ग आहे.

– श्रीमती शशिकला महादेव सरपोतदार (पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांची बहीण), पुणे (३१.५.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

 

Leave a Comment