अंधःकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळीत घराघरांमध्ये पणत्या लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून, म्हणजे त्रेतायुगात आरंभ झाली. लंकापती रावणावर विजय मिळवून प्रभु श्रीराम अयोध्येस परतले, तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत दिपोत्सव करून केले. सध्याच्या रज-तमप्रधान काळात विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या चिनी पणत्यांची पेठेत (बाजारात) रेलचेल दिसून येते. तसेच मेणाच्या पणत्या लावण्याची मानसिकताही आढळते. जुनीजाणती मंडळी मात्र तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून मातीच्या पारंपरिक पणत्या लावतात. तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेल्या मातीच्या पणत्यांचे सात्त्विकतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. हे महत्त्व समाजाला समजण्यासाठी विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासणे, हा या चाचणीचा उद्देश होता. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला. ही चाचणी ५.१०.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीचे स्वरूप, निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेली पारंपरिक मातीची पणती यांची ते दीप लावल्यावर (प्रज्वलित केल्यावर) त्या प्रत्येकाची यू.टी.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
२ अ. विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती
ही प्लास्टिकची पणती असून त्यामध्ये विद्युत् ऊर्जेवर पेटणारा विद्युत् दीप आहे. या पणत्या दिसायला आकर्षक असतात. यांची निर्मिती प्रामुख्याने चीन देशात केली जाते.
२ आ. मेणाची पणती
ही पणतीच्या आकारात मेणापासून बनवलेली मेणबत्ती आहे.
२ इ. पारंपरिक मातीची पणती
ही पेठेत मिळणारी मातीची सर्वसाधारण पणती आहे. त्यामध्ये तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून ती लावतात.
३. यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे
३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू
एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.
३ आ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख
या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.
(यू.टी.एस् उपकरणाविषयी अधिक माहितीसाठी पहा : http://www.vedicauraenergy.com/universal_scanner.html)
३ इ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण
३ इ १. नकारात्मक ऊर्जा
ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.
अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड)
यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात. त्यासाठी -IR हा नमुना ठेवतात.
आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट)
यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात. त्यासाठी -UV हा नमुना ठेवतात.
३ इ २. सकारात्मक ऊर्जा
ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.
३ इ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे
प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, शेंदूर आदी.
या चाचणीतील विद्युत् पणतीची प्रभावळ मोजण्यासाठी तिचा प्लास्टिकचा छोटा तुकडा, मेणाच्या पणतीची प्रभावळ मोजण्यासाठी त्यातील मेण आणि पारंपरिक मातीच्या पणतीची प्रभावळ मोजण्यासाठी त्यातील तिळाचे तेल यांचा नमुना म्हणून वापर केला.
३ ई. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत
चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) यू.टी.एस् या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ३ इ ३ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.
वस्तूतील किंवा वास्तूतील इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.
४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता
अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.
आ. उपकरण हाताळणार्या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.
५. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)
उपकरणाद्वारे ५.१०.२०१७ या दिवशी केलेली निरीक्षणे
टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.
६. निरीक्षणांचे विवेचन
६ अ. विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळणे
विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांची इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजा १२० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे या दोन्ही पणत्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात होती. मातीच्या पणतीत मात्र ती मुळीच आढळली नाही. चाचणीतील तिन्ही पणत्यांमध्ये अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
६ आ. तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या
पणतीत अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे; पण इतर दिव्यांमध्ये ती न आढळणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. मातीच्या पणतीच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे या पणतीमध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांमध्ये मात्र ती मुळीच आढळली नाही.
६ इ. विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांच्या प्रभावळींच्या तुलनेत मातीच्या पणतीची प्रभावळ अधिक असणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. विद्युत् पणती, मेणाची पणती आणि मातीची पणती यांची प्रभावळ अनुक्रमे १.०६ मीटर, १.२९ मीटर आणि २.१७ मीटर होती. यावरून लक्षात येते की, अन्य दोन्ही पणत्यांच्या तुलनेत मातीच्या पणतीची प्रभावळ अधिक होती.
या सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण सूत्र ८ मध्ये दिले आहे.
७. निष्कर्ष
विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांमध्ये नकारात्मक स्पंदने, तर तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून पेटवलेल्या मातीच्या पणतीमध्ये सकारात्मक स्पंदने होती, हे या चाचणीतून लक्षात येते.
८. निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र
विद्युत् दीप असलेली पणती आणि मेणाची पणती यांमधील मानवनिर्मित तमोगुणी घटकांमुळे त्यांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, तर तिळाचे तेल अन् कापसाची वात असलेली मातीची पणती या नैसर्गिक सत्त्वगुणी घटकांमुळे त्यांमधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
या चाचणीतील विद्युत् ऊर्जा, प्लास्टिक आणि मेण हे घटक मानवनिर्मित आहेत, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात. सात्त्विक घटकांमुळे मातीच्या पणतीमध्ये सात्त्विक (सकारात्मक) स्पंदने आढळली. याउलट मानवनिर्मित तमोगुणी घटकांमुळे विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांमध्ये असात्त्विक (नकारात्मक) स्पंदने आढळली. या तमोगुणी घटकांमुळे वातावरणात त्रासदायक स्पंदने पसरतात. यावरून लक्षात येते की, तिळाचे तेल आणि हाताने वळलेली कापसाची वात घालून मातीच्या पणत्या लावणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे.
९. दिवाळीनिमित्त बंधू-भगिनींना आवाहन !
बंधू आणि भगिनींनो, यंदाच्या दिवाळीत विद्युत् चिनी पणत्या आणि मेणाच्या पणत्या यांना दूर सारून, तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून मातीच्या पारंपारिक पणत्या लावून त्यांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.१०.२०१७)
ई-मेल : [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात