अमरावती येथे शौर्य जागरण प्रात्यक्षिके, तर विविध विषयांवर प्रबोधन
- आयोजकांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक
- १ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंचा प्रतिसाद
- शौर्य जागरणाच्या प्रात्यक्षिकांच्या वेळी धर्मांधांचे पलायन


अमरावती : हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन् अन्य ठिकाणी नवरात्र आणि दसर्याचे महत्त्व, तर एका ठिकाणी नारी, तू अबला नाही, सबला हो याविषयी व्याख्यान, तर दोन ठिकाणी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले.
१ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी या उपक्रमांचा लाभ घेतला. ४ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांची मागणी करण्यात आली.
१. नवजवान दुर्गा मंदिर मंडळामध्ये आयोजक श्री. संदीप राठोड यांनी सक्रिय सहभाग घेऊन समितीला सांगितले, तुमचे सर्वच उपक्रम सादर करा. समितीचे कार्य चांगले आहे. समाजासाठी आवश्यक असे कार्य सेवाभावी वृत्तीने तुम्ही करता. पुढील वर्षीच्या दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेतच आम्ही समितीचे नाव घालून त्यांचे उपक्रम निश्चित करू. आयोजनात त्यांनी स्वतःहून सहभाग घेतला. मंडळाकडून मंडळाचे विश्वस्त श्री. जवंजाळ यांनी श्रीफळ देऊन समितीच्या कार्यकर्त्याचा सत्कार केला.
२. समितीचे श्री. मिलिंद साखरे यांनी नवरात्र आणि गरबा यांचे महत्त्व सांगतांना पारंपरिक वेशभूषेचे महत्त्व सांगितल्यावर कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेवरून जीन्स-टी शर्ट घालणार्यांना गरब्यासाठी मैदानात प्रवेश देण्यात येणार नाही, असे घोषित केले. या मंडळातील उपक्रम पाहून धर्माभिमानी श्री. निखिल फाटे यांनी दुसर्या मंडळामध्येही अशा प्रकारे उपक्रम घेण्याची मागणी केली आणि दुसर्या दिवशी स्वतःच त्याचे आयोजन केले.
३. उपक्रमांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी शौर्य जागरण प्रात्याक्षिके सादर केली, तर श्री. स्वराज शर्मा यांनी नवरात्रीचे महत्त्व याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. एका मंडळात रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी नारी, तू अबला नाही, सबला हो या विषयावर व्याख्यान घेतले.
क्षणचित्रे
१. एका मंडळात प्रारंभी काही धर्मांध तरुण उभे होते; परंतु शौर्य जागरणाची प्रात्याक्षिके चालू झाल्यावर ते निघून गेले. (हे आहे शौर्य जागरण उपक्रमाचे सामर्थ्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. नवजवान मंडळातील आयोजकांनी यावर्षी समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मजागृती सभेमध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगितले आणि सभेच्या प्रचाराला दुर्गादेवीच्या आशीर्वादाने वसाहतीतील मंदिरातूनच प्रारंभ करावा, अशी मागणी केली.
यवतमाळ येथे १०० हून अधिक सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांमध्ये प्रबोधन !

यवतमाळ : आदर्श नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यवतमाळ, वणी, पुसद येथील, तसेच दारव्हा तालुक्यात १०० हून अधिक सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांना संपर्क करण्यात आला. यात नवरात्रोत्सवातील अपप्रकार, गरब्याच्या नावावर होणारी तरुणींची छेडछाड, लव्ह जिहाद रोखण्यासाठी तरुणांचे प्रबोधन करण्यात आले. यासंदर्भात पोलीस प्रशासनालाही ३ ठिकाणी निवेदने देण्यात आली.
आदर्श नवरात्रोत्सव, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर समितीच्या वतीने १८ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. रामनगर दुर्गा उत्सव मंडळ आणि दुर्गा उत्सव मंदिर येथे स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. उपस्थितांनी प्रशिक्षणवर्गांची मागणी केली. हस्तपत्रके, भित्तीपत्रके यांच्या माध्यमातूनही जागृती करण्यात आली. मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागपूर येथे ७ ठिकाणी नवरात्रोत्सवाची माहिती आणि अपप्रकार यांविषयी प्रबोधन
नागपूर : येथे अनेक दुर्गा मंडळे आणि योग मंडळे यांना भेटून एकूण ७ मंडळांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. मंगला पागनीस आणि श्री. अतुल अर्वेन्ला यांनी नवरात्रोत्सवाची माहिती आणि अपप्रकार यांविषयी प्रबोधन केले. एकूण ४ ठिकाणी धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, तर जिल्ह्यात ५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. सर्व मंडळांनी पुढाकार घेऊन उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आणि अशा प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे सांगून सहकार्य केले. या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस उपआयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
क्षणचित्रे
१. एका मंडळाने धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.
२. तीन ठिकाणी दिवाळीची माहिती सांगण्यासाठी प्रवचनाची मागणी करण्यात आली.
समितीच्या वतीने नागपूर येथे आपट्याची पाने आणि सनातन प्रभात यांचे वाटप

नागपूर : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाही विजयादशमीनिमित्त आपट्याची पाने वाटप हा उपक्रम श्री दुर्गादेवी मंदिर, श्रीराम मंदिर, साईबाबा मंदिर आणि गजानन मंदिर या ठिकाणी घेण्यात आला. या वेळी सनातन प्रभातच्या अंकांचे वितरण करण्यात आले. समाजाकडूनही उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. श्री रेणुका माता मंदिरात येणार्या भाविकांनाही हा उपक्रम पुष्कळ आवडला.
विशेष : गजानन मंदिर, महालचे विश्वस्त श्री. खोडे यांचे या वेळी उत्तम सहकार्य लाभले.