महाराष्ट्र : सनातन संस्थेद्वारे राबवण्यात आलेल्या आदर्श नवरात्रोत्सव मोहिमेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची आदर्श नवरात्रोत्सव मोहीम

नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंमध्ये आदर्श नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी मंडळांमधून आणि वैयक्तिक स्तरावर देवीपूजनाचे शास्त्र समजावे यासाठी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिनी शाखेच्या वतीने मंडळांमधून स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी धर्मशिक्षण फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. संस्थेच्या या प्रबोधन मोहीमेला सर्वत्रच्या धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आज आपण भांडूप, सोलापूर आणि फलटण याठिकाणी केलेल्या अध्यात्मप्रसाराला मिळालेला प्रतिसाद पाहूया.

 

भांडुप येथील धर्माभिमानी फ्लेक्स प्रदर्शन पाहून कृतीशील होणे

भांडूप येथे फ्लेक्स प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

 

रायगड येथे सौ. नंदिनी सुर्वे यांचे मार्गदर्शन ऐकतांना महिला

भांडुप : शिवनेरी कम्पांऊड येथील समर्थ मित्र मंडळ आणि टेंभीपाडा येथील ज्वाला मित्र मंडळ येथे देवीच्या उपासनेच्या संदर्भातील धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. भांडुप येथील पराग शाळेचे संचालक श्री. बाळकृष्ण बने शेट, स्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष ब्रिद तसेच अन्य मान्यवर हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित होते.

 

विशेष सहकार्य

फ्लेक्स प्रदर्शन पाहून श्री. संतोष ब्रिद यांनी क्रांतिकारकांचे ५ फ्लेक्स प्रायोजित केले. तसेच २ दिवस ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी अनुमती दिली. आपल्या सहकार्‍यांनाही त्यांनी संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगितले असता त्या सर्वांनी सात्त्विक उत्पादने घेतली.

 

भांडुप आणि खारघर येथे प्रवचन

भांडुप येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. संजय गोठिवडेकर यांच्या घरी डॉ. लक्ष्मण जठार यांनी प्रवचन घेतले. प्रवचनाला श्री. गोठिवडेकरांचे १२ नातेवाईक उपस्थित होते. प्रवचनानंतर सर्वांनी नवरात्रीचे अध्यात्म शास्त्रीयज्ञान मिळाल्याने आनंद व्यक्त केला. तसेच सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने घेऊन आम्ही साप्ताहिक सनातनचे वाचक होणार असल्याचे सांगितले.

याप्रमाणे नवी मुंबईतील खारघर परिसरात ३ नवरात्रोत्सव मंडळात संस्थेच्या वतीने व्याख्याने घेऊन प्रसार करण्यात आला.

 

रायगड जिल्ह्यात रणरागिणी शाखेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचने आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर

हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या माध्यमातून पडघा, तळोजा मजकूर, खांदा वसाहत, कळंबोली गाव, कळंबोली वसाहत, खिडुकपाडा गाव या ठिकाणी  प्रवचने घेण्यात आली. तसेच काळानुसार आवश्यक असणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करून त्याची प्रत्यक्षिकेही दाखवण्यात आली. या प्रवचनांचा लाभ ६५० हून अधिक महिला आणि पुरुष जिज्ञासूंनी घेतला.

 

धर्माभिमान्यांचा धर्मप्रसार कार्यात सहभाग

१. श्री. विजय भोईर यांनी सनातन संस्थेने तयार केलेले धर्मशिक्षण देणारे २२ फ्लेक्स फलक प्रायोजित करून उत्सवाच्या ठिकाणी लावले.

२. श्री. संजय उगलेकर यांनी ‘शस्त्रपूजन’ कार्यक्रमाच्या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचनासाठी निमंत्रित केले. समितीच्या कार्याचे कौतुक करून प्रत्येक शनिवारी त्यांच्या विभागात प्रवचन घेण्याची मागणी केली.

३. नगरसेविका सौ. प्रिया भोईर यांनी ‘देवीपूजनाचे शास्त्र’ या लघुग्रंथाच्या २०० प्रति प्रायोजित केल्या.

४. श्री. बबन मुकादम यांनी १०० लघुग्रंथ प्रायोजित करून त्यांच्या विभागातील मंडळांमध्ये त्याचे वाटप केले.

५. नगरसेवक श्री. गोपाळ भगत यांनी ५० लघुग्रंथ प्रायोजित केले आणि प्रवचनाच्या आयोजनासाठी साहाय्य केले.

 

फलटण

कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयात व्याख्यान

फलटण (जिल्हा सातारा) : २७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मनीषा बोबडे आणि श्री. मंगेश खंदारे यांनी कृषी तंत्रनिकेतन या विद्यालयाच्या विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या वेळी सौ. बोबडे यांनी नवरात्रोत्सवातील अपप्रकार टाळून देवीची कृपा संपादन करण्याचे शास्त्र सांगितले. तसेच गरबा हा देवीचे गुणगाण करण्यासाठी खेळला जातो; परंतु सध्या तो चित्रपटाच्या गाण्यावर खेळला जातो. यामध्ये अनेक विकृती फोफावल्याने देवतांचे विडंबन होते. त्यामुळे देवीची एकप्रकारे अवकृपाच होते, असे सांगितले.

या वेळी कृषी तंत्रनिकेतनचे सर्वश्री प्राचार्य मानेे, जाधव, कापसे, शिक्षिका सौ. मनीषा गाडे यांसह ६० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

 

सोलापूर

जीवन संग्राम मंडळाच्या वतीनेे व्याख्यानाचा प्रसार होण्यासाठी फलकाच्या माध्यमातून आवाहन

सोलापूर : येथील जीवन संग्राम हनुमान मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी उपस्थितांना अवगत केले. या वेळी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी श्री भवानीदेवीचे पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. या वेळी ५० हून अधिक महिला आणि युवक उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी श्रीफळ आणि गुच्छ देऊ समितीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला.

 

क्षणचित्र

१. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी ‘आम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली’, असे सांगितले.

२. हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद सलगर यांनी समितीचे कार्य आणि उपक्रम यांचे कौतुक केले. तसेच ‘सर्वांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व समजून कृती करूया’, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

३. जीवन संग्राम मंडळाने व्याख्यानाचा प्रसार होण्यासाठी फलक लावला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment