सतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ !

श्रीनृसिंहाची मूर्ती ! श्री शारदादेवीची वीणा ऐकून श्री नृसिंह शांत झाले.
श्री शारदादेवीचे मंदिर
रामगिरी पर्वत ! याच डोंगरावर श्री शारदादेवीचे स्थान आहे.

 

१. श्री शारदादेवी मंदिराचा प्राचीन इतिहास

‘सतना, मध्यप्रदेश येथील रामगिरी पर्वतावर श्री शारदादेवीचे मंदिर आहे. श्रीविष्णूने शिवाच्या पाठीवर असलेल्या माता सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, तेथे शक्तीपीठ निर्माण झाले. या ठिकाणी सतीदेवीचा उजवा स्तन पडला होता. मैहर शहरातील ६०० फूट उंचीच्या डोंगरावर श्री दुर्गादेवीचे शारदीय रूप असलेले श्री शारदादेवीचे मंदिर आहे. मंदिराला १ सहस्र ६३ पायर्‍या आहेत. प्रसिद्ध योद्धे आल्ह आणि उदल हे श्री शारदादेवीचे निस्सिम भक्त होते. आद्य शंकराचार्यांनी या देवीचे दर्शन घेतले होते.

मंदिरात देवीच्या बाजूला नृसिंहाची मूर्ती आहे. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर नृसिंहअवताराने श्री शारदादेवीची वीणा ऐकली होती. त्यानंतर ते शांत झाले. त्यामुळे शंकराचार्यांनी मंदिरात श्री नृसिंहाची मूर्ती आणि बाजूला श्री शारदादेवीची छोटी मूर्ती स्थापन केली. मंदिराजवळ एक प्राचीन शिलालेख असून त्यावर मंदिर स्थापनेच्या काळाचा उल्लेख आहे. प्राचीन काळी मंदिरात बळी देण्याची प्रथा होती; मात्र सतनाचे राजा ब्रजनाथ यांनी ही प्रथा पूर्णपणे बंद केली. बाणभट्ट यांनी सम्राट हर्षवर्धन यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘हर्षचरित’ या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, श्री सरस्वतीदेवी शापातून मुक्त होण्यासाठी स्वर्गातून या ठिकाणी आली होती. सध्या येथे असलेली देवीची मूर्ती १० व्या शतकातील असावी. याच्या आधी येथील शक्तीपिठाचे स्थान पिंडीच्या स्वरूपात होते.

 

२. मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीची आख्यायिका !

अनुमाने २५० वर्षांपूर्वी मैहर किल्ल्यात हनुमानाची मूर्ती होती. त्या प्रदेशाच्या राजाने सांगितले की, ‘जो कोणी ही मूर्ती श्री शारदादेवीच्या मंदिरात नेऊन ठेवेल, त्याच ठिकाणी ही मूर्ती स्थापन केली जाईल आणि त्याचीच श्री शारदादेवीचे पुजारी म्हणून नियुक्ती केली जाईल.’ सध्या मंदिरात मुख्य पुजारी असलेले श्री. प्रवीण महाराज यांच्या पूर्वजांनी हनुमानाची मूर्ती आणली होती. यापूर्वीच्या पुजार्‍यांची समाधी मंदिरातील आवारात आहे.

 

३. वीर योद्धे आल्ह आणि उदल यांची ‘शारदा माई !’

आल्ह आणि उदल, असे २ भाऊ या देवीचे भक्त होते. ते विक्रमी होते. त्यांनी पृथ्वीराज चौहान यांच्याशीही युद्ध केले होते. या दोघांनीच प्रथम या मंदिराचा शोध घेतला होता. आल्हने पुढील १२ वर्षे तपश्‍चर्या केली आणि देवीसमोर स्वत:ची मान कापून ती देवीला अर्पण केली होती. तेव्हा देवीने प्रगट होऊन त्यास जिवंत केले आणि अमरत्व दिले. आल्ह श्री शारदादेवीला ‘शारदा माई’ या नावाने संबोधत. त्यावरून हे मंदिर ‘श्री शारदामाता’ या नावाने प्रसिद्ध झाले. आजही असे मानले जाते की, आल्ह आणि उदल प्रतिदिन सर्वांत आधी या मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिराच्या बाजूला असलेल्या डोंगरांमध्ये तलाव असून त्याचे नाव ‘आल्ह तलाव’, असे आहे. येथे आल्ह आणि उदल स्नान करून मग मंदिरात जातात. तलावापासून २ कि.मी. अंतरावर कुस्तीचा आखाडा आहे. पूर्वी या ठिकाणी आल्ह आणि उदक कुस्ती खेळत असत.’

(संदर्भ : ‘भारत डिस्कव्हरी’ संकेतस्थळ)

Leave a Comment