शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र
गोंडा, उत्तरप्रदेश येथील मुकुंदनगर गावात श्री वाराहीदेवीचे मंदिर आहे. मंदिरात अतीप्राचीन वटवृक्ष असून त्याच्या फांद्या मंदिर परिसरात विस्तारलेल्या आहेत. श्री वाराहीदेवी उत्तरी भवानीदेवी या नावानेही ओळखली जाते. या ठिकाणी सतीच्या हनुवटीचा खालचा भाग पडला. ५१ शक्तीपिठांपैकी हे ३४ वे पीठ आहे. श्री वाराहीदेवी वराह देवाची शक्ती आहे. या ठिकाणी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी, तसेच आषाढ मासात जत्रा भरते.
मंदिरात देवीची मूर्ती नसून गुहेप्रमाणे एक लहान वाट आहे. त्याच ठिकाणी देवीचा वास आहे, असे मानले जाते. त्याच्या भोवतीने मंदिर बांधलेले आहे. मंदिरात वराहदेवाची मूर्ती आहे. मंदिर परिसरात एक विस्तीर्ण आणि प्राचीन वडाचे झाड आहे. हा वटवृक्ष जवळजवळ १८०० वर्षे जुना असून आशिया खंडातील दुसरा सर्वांत मोठा वृक्ष आहे. वटवृक्षाच्या पारंब्या आणि फांद्या यांनी मंदिराला पूर्णपणे वेढलेले असून वटवृक्षाची मुळे १ कि.मी. पर्यंत पसरलेली आहेत. देवीला डोळ्यांची पितळी किंवा दगडी प्रतिकृती अर्पण करण्याची प्रथा आहे. ‘एखाद्या व्यक्तीला डोळ्यांशी संबंधित काही आजार असल्यास तो बरा होतो’, असे मानले जाते.
मंदिर स्थापनेमागील कथा
मंदिर स्थापनेची कथा श्री विष्णुचा अवतार भगवान वराह यांच्याशी संबंधित आहे. भगवान वराह यांचे स्थान जिल्ह्यातील सूकरखेत पासका येथे आहे. असे मानले जाते की, हिरण्यकश्यपुचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध करण्यासाठी भगवान श्री विष्णुने वराह अवतार धारण केला. हिरण्याक्षला शोधण्यासाठी भगवान वराह यांना पाताळात जावे लागणार होते. त्या वेळी त्यांनी देवीची स्तुती केली. ती मुकुंदनगर येथील जंगलात प्रगट झाली आणि तिने पाताळात जाण्यासाठी वराह देवांना भूमीतून वाट करून दिली. त्या वाटेने पाताळात जाऊन भगवान वराहांनी हिरण्याक्षचा वध केला. तेव्हापासून या ठिकाणी देवीचे मंदिर अस्तित्वात आले. मंदिरात आजही गुहेसारखी वाट आहे. एका इंग्रज अधिकार्याने ही वाट मोजण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला ती मोजता आली नाही. आजही येथे तुपाचा दिवा अखंड चालू असतो.
(संदर्भ : ‘दैनिक जागरण’ आणि ‘दैनिक भास्कर’ यांचे संकेतस्थळ)
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला वरील छायाचित्रांद्वारे वाराहीदेवीचे स्थान आणि त्याच्या परिसरातील वटवृक्ष यांचे दर्शन होऊ शकले. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !