हिमाचल प्रदेश येथील श्री ज्वालादेवीचे मंदिर देशातील महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळांपैकी आणि ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे ! हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात देवीचे मंदिर आहे. दक्ष राजाने आपल्या पतीचा केलेला अपमान सहन न होऊन सतीने यज्ञात स्वत:ची आहुती दिली होती. त्यानंतर शिवाला अत्यंत शोक झाला आणि शिव सतीचा देह पाठीवर घेऊन भ्रमण करू लागले. तेव्हा विष्णूने शिवाच्या पाठीवरील सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले तेथे शक्तीपीठ निर्माण झाले. या ठिकाणी देवी सतीची जीभ पडली होती.
वैज्ञानिकांना निरुत्तर करणार्या मंदिरातील ९ ज्वाळा आणि गोरख डिब्बी कुंड !
या ठिकाणी नैसर्गिकरित्या ९ ज्वाळा तेवत असतात. ९ ज्वाळांमधील प्रमुख ज्वाळा महाकाली देवीची आहे. अन्य ८ ज्वाळा अन्नपूर्णा, चंडी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजना या देवींच्या आहेत. या मंदिरात देवींच्या मूर्ती नसून ज्योतिच्या रूपातील मातेचीच पूजा केली जाते. कुठल्याही प्रकारचे तेल किंवा वाती यांचा वापर न होता या ज्वाळा पेटलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील वातावरणही अत्यंत थंड आहे, तरीही येथील ज्वाळा कधीच शांत होत नाहीत. वैज्ञानिकांनाही यामागील नेमके कारण ज्ञात नाही. त्यामुळे हे एक आश्चर्य आहे.
येथील आणखी एक आश्चर्य म्हणजे मंदिराच्या शेजारी ‘गोरख डिब्बी’ नावाचे कुंड आहे. याकडे पाहिल्यावर कुंडातील पाणी उकळत असल्याचे दिसते; मात्र प्रत्यक्षात कुंडातील पाण्याला स्पर्श केल्यास ते थंड लागते.
अकबराच्या अहंकाराचे हरण करणारी ज्वालादेवी !
भारतात मोगल राजा अकबराचे राज्य होते. त्या वेळी घडलेली घटना अशी की, नदौन या गावातील मातेचा भक्त १ सहस्र यात्रेकरूंसह श्री ज्वालादेवीचे दर्शन घेण्यास निघाला होता. त्या वेळी अकबराच्या सैनिकांनी त्यांना रोखले आणि दरबारात सादर केले. दरबारात अकबराने यात्रेकरूंची चौकशी केली. तेव्हा भक्तांकडून देवीची स्तुती ऐकल्यावर भक्तांकडील एका घोड्याची मान धडावेगळी केली आणि ‘तुमच्या देवीत एवढी शक्ती आहे, तर या घोड्याचे शिर पुन्हा लावून दाखवा’, असे अकबराने भक्तांना सांगितले. भक्तांची देवीवर श्रद्धा असल्याने त्यांनी देवीला शरणागतीने प्रार्थना केल्यावर खरोखरच घोडा जिवंत झाला.
त्यानंतर अकबर या ठिकाणी आला असता नैसर्गिकरित्या जळणार्या ज्वाळा पाहून त्याला पुष्कळ आश्चर्य वाटले. त्याने या ज्वाळा विझवण्यासाठी पाणी आणि लोखंडी पत्रा वापरण्यासह अन्य बरेच प्रयत्न केले; मात्र ते निष्फळ ठरले. त्यानंतर अकबराने यमुना नदीचा एक प्रवाह मंदिराच्या दिशेने वळवला, तरीही ज्वाळा विझल्या नाहीत. तेव्हा अकबराला त्याची चूक लक्षात आली. त्यानंतर त्याने मंदिराला सोन्याचे छत्र बसवले. देवीला छत्र देतांना ‘मी सोन्याचे छत्र देवीला देत आहे’ असा अहंकारी विचार अकबराच्या मनात असल्याने छत्र खाली पडून तुटले आणि देवीने तिच्या शक्तीने सोन्याचे एका वेगळ्याच धातूत रूपांतर केले. तांबे, पितळ, लोखंड यांपैकी कोणताच हा धातू नाही. अद्यापपर्यंत ‘हा धातू कोणता ?’, हे कुणालाही समजलेले नाही.
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला वरील छायाचित्रांद्वारे श्री ज्वालादेवीची मूर्ती आणि तिचे मंदिर यांचे दर्शन होऊ शकले. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया ! |
(संदर्भ : आज तक संकेतस्थळ आणि jawalaji.in संकेतस्थळ)