उज्जैन, मध्यप्रदेश येथील प्रमुख मंदिरांमध्ये श्री हरसिद्धीदेवी मंदिराची गणना होते. ही देवी राजा विक्रमादित्याची कुलदेवी होती. प्राचीन काळी देवी ‘मांगलचाण्डिकी’ या नावाने ओळखली जात असे. गढकालिका देवीप्रमाणेच येथील मंदिरात महालक्ष्मी आणि महासरस्वती देवीच्या मूर्तींच्या मध्यभागी श्री हरसिद्धीदेवीची सिंदुरलेपित मूर्ती आहे. तांत्रिक परंपरेत या स्थानाला सिद्धपीठ मानले जाते. शिवपुराणानुसार हे ५१ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असून हे मंदिर ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. सतीच्या हाताचा कोपरा या ठिकाणी पडला होता. स्कंदपुराणानुसार चण्ड आणि प्रचण्ड या दैत्यांचा संहार केल्याने देवी हरसिद्धी या नावाने प्रसिद्ध झाली. येथे म्हशीचा बळी देण्याची प्रथा आहे.
श्री हरसिद्धीमातेच्या चरणी ११ वेळा स्वत:चे शिर अर्पण करणारा राजा विक्रमादित्य !
उज्जैनचे सम्राट असलेला राजा विक्रमादित्य बुद्धी, पराक्रम आणि उदारता या गुणांसाठी ओळखला जात असे. याच राजा विक्रमादित्याच्या नावाने ‘विक्रम संवत’ चालू झाले. प्रत्येक अमावास्येला राजा विक्रमादित्य श्री हरसिद्धीदेवीच्या मंदिरात विशेष पूजा करत असे. राजाच्या मनामधील देवीप्रती प्रगाढ भक्ती असल्याने राजाने त्याचे शिर कापून मातेच्या चरणी अर्पण केले. तेव्हा देवीने विक्रमादित्यांचे शिर पुन्हा जोडले. अशाप्रकारे ११ वेळा राजा विक्रमादित्याने देवीच्या चरणी स्वत:चे शिर अर्पण केले होते.
मंदिराचा इतिहास
तेराव्या शतकातील काही ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे; मात्र सध्याचे मंदिर वर्ष १४४७ मध्ये मराठ्यांनी बांधलेले आहे. मंदिराच्या पूर्वेला महाकाल मंदिर आणि पश्चिमेला रामघाट आहे. मंदिराच्या आवारात मराठा शैलीमधील २ दीपस्तंभ आहेत. नवरात्रीच्या काळात येथे अनेक दीप लावले जातात. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघतो. मंदिरातील देवीच्या गर्भगृहाच्या समोरील सभामंडपामध्ये देवीचे यंत्र आहे. आवारात ८४ महादेवांपैकी कर्कोटेश्वर महादेवाचे मंदिर आणि अन्य काही देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या आतील घुमटावर महात्रिपुर सुन्दरी, शिवकामेश्वरी काल्था शिवा, षोडशी महानित्या या देवी आणि त्यांच्याशी संबंधित अन्य देवींची सुबक चित्रे रेखाटली आहेत. चैत्र आणि आश्विन मासातील नवरात्रीच्या कालावधीत मंदिरात उत्सव साजरा केला जातो.
संदर्भ : संकेतस्थळ – सिंहस्थ उज्जैन, पत्रिका
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !