श्रीक्षेत्र काशी येथील दशाश्वमेध घाटावर श्री बंदीदेवीचे मंदिर आहे. ही देवी ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे. देवीच्या उजव्या बाजूला वेणीमाधव, डाव्या बाजूला दोन मारुति, अक्षत वड, वासुकी (नाग) आणि मध्यभागी प्रयागेश्वर यांच्या मूर्ती आहेत. ज्यांना प्रयागला जायला जमत नाही, ते भक्त येथे येऊन दर्शन घेतात.
या देवीला पाताळाची देवी मानले जाते; मात्र श्रीविष्णूंच्या आज्ञेने देवी दशाश्वमेध घाटावर वास करते. हिंदू श्री बंदीदेवीला कुलुप आणि किल्ली अर्पण करतात. कुलुप-किल्ली अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते, अशी देवीभक्तांची श्रद्धा आहे.
बंदीदेवीचा इतिहास
श्रीराम आणि लक्ष्मण यांना अहिरावण आणि महिरावण यांच्या बंदीवासातून सोडवण्यासाठी देवीने त्यांच्याशी युद्ध केले. अहिरावण आणि महिरावण यांना हरवून श्रीराम आणि लक्ष्मण यांना वाचवणारी देवी अर्थात् त्यांना बंदीवासातून मुक्त करणारी देवी म्हणजे बंदीदेवी ! त्यामुळे देवीला कुलुप-किल्ली अर्पण केली जाते. देवीचे मूळ नाव ‘श्री निगड भंजनी’ असे आहे. देवीच्या आशीर्वादाने न्यायालयीन प्रक्रियेत यश येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
(संदर्भ : ‘बनारस टाइम्स’ संकेतस्थळ)