चेन्नई : १७ सप्टेंबर २०१७ हा दिवस तमिळ पंचांगानुसार या दिवशी पुरट्टासी महिन्याचा पहिला दिवस होता. कलियुगात श्रीमन्नारायणाने चेन्नईजवळ असलेल्या तिरुपती येथे श्रीनिवास या नावाने अवतार घेतला. त्याला पुढे वेंकटेश्वर स्वामी आणि बालाजी या नावाने संबोधले गेले. श्रीनिवास अवताराचा जन्म झाल्याने पुरट्टासी महिन्याला विशेष मानले जाते. अशा शुभदिनी श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव असलेल्या चेन्नई येथील सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी ७१ टक्के पातळी गाठली असून त्या सनातनच्या सुवर्णमय इतिहासात ७० व्या समष्टी संत म्हणून विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा करण्यात आली. येथे झालेल्या एका सत्संगसोहळ्यात सनातनचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक श्री. विनायक शानभाग यांनी सौ. उमा रविचंद्रन् यांनी संतपद गाठल्याच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवल्यावर उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला. ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक श्री. पट्टाभिराम प्रभाकरन् यांनी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन, तर ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी पुष्पहार घालून सन्मान केला.
सत्संगसोहळ्याच्या प्रारंभी उपस्थितांना ८.९.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रमात सौ. उमा रविचंद्रन् यांनी सादर केलेल्या वीणावादनाची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर रामनाथी आश्रमातील साधक श्री. राम होनप यांना त्या वीणावादनाविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि त्यांना सूक्ष्मातून ईश्वराकडून मिळालेले ज्ञान वाचून दाखवण्यात आले. वीणावादनाप्रमाणेच बालकभावात राहून पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाची अत्यंत बोलकी आणि भावोत्कट चित्रे साधकांचा भाव जागृत करतात.
या चित्रांचे सनातन-निर्मित ग्रंथ बालकभावातील चित्रे भाग १ आणि भाग २ वर्ष २०१३ मध्ये प्रकाशित झाले आहेत. ठिकठिकाणच्या हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करून त्यांना हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी करून घेणे, कोणत्याही परिस्थितीत गुरुसेवेशी शतप्रतिशत एकरूप होऊन समष्टी सेवेत रहाणे, ही पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची काही वैशिष्ट्ये आहेत. व्यष्टी साधनेअंतर्गत अत्युच्च भाव आणि समष्टी साधनेअंतर्गत गुरुसेवेची तीव्र तळमळ असणे, असा व्यष्टी-समष्टीचा सुरेख संगम पू. (सौ.) उमाक्का यांच्या ठायी पहायला मिळतो.
बालक भावातील सुंदर चित्रे रेखाटून साधकांचा भाव जागृत करणार्या
आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये धर्मकार्याची तळमळ वाढवणार्या सौ. उमा रविचंद्रन् !
चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नसतांनाही कलात्मक दृष्टी आणि ईश्वराप्रती असलेला उत्कट अन् निरागस भाव यांमुळे सौ. उमा रविचंद्रन् यांनी बालक भावातील अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत. त्यांची ही चित्रे म्हणजे कृष्णभक्तीचा एक अनोखा आविष्कार आहे. त्यांनी सहजतेने रेखाटलेल्या सर्वच चित्रांत अत्यंत जिवंतपणा आला आहे. त्यांच्या सर्वांगस्पर्शी चित्रकलेचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील साधकांना आपल्या मनातील भाव या चित्रांतून व्यक्त होत आहे, अशी अनुभूती येते.
चित्रकलेसोबत त्यांना वीणावादन आणि गायनही येते. ते ऐकतांना आपण निराळ्या भावात जातो. नम्रता, वात्सल्यभाव, तत्त्वनिष्ठता आदी गुणांनी संपन्न असलेल्या सौ. उमा रविचंद्रन् यांच्यामध्ये धर्मकार्याप्रती तीव्र तळमळ आहे. त्यांच्यातील तळमळ आणि उत्तम नेतृत्वगुण यांमुळे त्यांनी तमिळनाडूतील अनेक हिंदुत्वनिष्ठ अन् धर्मप्रेमी व्यक्तींना धर्मकार्याशी जोडले आहे. यातील अनेक जणांमध्येे केवळ धर्मकार्याचीच ओढ वाढली आहे, असे नाही, तर सौ. उमा रविचंद्रन यांनी त्यांच्यात साधनेची गोडीही निर्माण केली आहे. या सर्वांसमवेत त्यांचे पारिवारिक संबंध निर्माण झाले आहेत. तमिळनाडूतील प्रसारकार्य हे सौ. उमा रविचंद्रन यांच्या तळमळीचे फलीत आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकात आणि कॅनडात त्यांच्या मुलींकडे गेल्यावर तेेथेही त्या धर्मप्रसाराचे कार्य करतात.
१०० टक्के एकरूप होऊन सेवा करतांना त्या त्यांचे कौटुंबिक दायित्वही तेवढ्याच कुशलतेने पार पाडतात. प्रत्येक क्षणी त्यांना साधनेत आणि सेवेत सहकार्य करणारे त्यांचे पती श्री. रविचंद्रन् यांचेही कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. या सर्व गुणांमुळे सौ. उमा रविचंद्रन् यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली होती आणि आज ७१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून त्यांनी सनातनचे ७० वे समष्टी संतपद प्राप्त केले आहे.
त्यांंची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. (सौ.) उमा यांच्या साधनेमुळे मला दुर्धर आजारातून पुनर्जन्म लाभला ! – श्री. रविचंद्रन् (पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे पती)
मला आज पुष्कळ आनंद होत आहे की, उमा आज संत झाली आहे. ती लवकर संत होणार, याची थोडीफार कल्पना आली होती. उमा प्रत्येक कृती अपेक्षाविरहित करते. तिच्यामुळे (तिच्या साधनेमुळे) मला दुर्धर आजारातून पुनर्जन्म लाभला. प.पू. गुरुदेवांमुळे मला हे लक्षात आले. वर्ष २००३ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या साधनेला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत एकदाही ती साधनेत कमी पडली नाही. तिच्यामुळे मी साधना करू लागलो. आज भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती कमीच आहे. गुरुदेवांना माझा शिरसाष्टांग नमस्कार !
पू. (सौ.) उमाक्का सर्व हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ ! – श्री. जी. राधाकृष्णन् (६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले चेन्नई येथील हिंदुत्वनिष्ठ)
आज तमिळनाडूतील सर्व धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. उमाक्का लवकर संत होणार, असे वाटायचे; कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य जाणवते. अलीकडच्या काळात त्या अधिक बोलल्या नाहीत, तरी त्यांचे डोळेच बरेच काही बोलून जायचे. उमाक्का आम्हा सर्व हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ आहेत. त्या प.पू. गुरुदेवांचे प्रतिरूपच आहेत. उमाक्कांकडे पाहूनच आम्हाला आनंद मिळतो.
पू. उमाक्का यांच्यात संतांसारखे गुण लहानपणापासूनच आहेत ! – श्री. गणेश राधाकृष्णन् (पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे कनिष्ठ बंधू)
उमाक्का कधीही रागावत नाही. समोरचा जरी रागावला, तर त्याला योग्य प्रतिसाद कसा द्यायचा, ते कौशल्य तिच्यामध्ये लहानपणापासून आहे. उमाक्का लवकरात लवकर संतपद गाठणार, असे वाटायचे. गेल्या ५० वर्षांपासून उमाक्काला मी जवळून पाहिले आहे. ती लहानपणापासून वेगळीच होती. संतांसारखे गुण तिच्यात तेव्हापासून आहेत. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
श्री. रविचंद्रन् यांचा भाव जागृत झालेला पाहून पू. (सौ.) उमाक्का यांनी व्यक्त केलेले विचार
आज पतीच्या डोळ्यांत मी पहिल्यांदा अश्रू पाहिले. ते भावाश्रू होते. जीवनात भगवंताप्रतीच्या कृतज्ञतेने ते इतके भावविभोर होतील, असे कधीही वाटले नव्हते. आज त्यांची पुष्कळ भावजागृती होत होती. ते देवासाठी रडत आहेत, यापेक्षा माझ्यासाठी भाग्याची गोष्ट कोणती ? ही सर्व प.पू. गुरुदेवांची कृपाच आहे. यासाठी मी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. – (पू.) सौ. उमा रविचंद्रन्
क्षणचित्रे
१. आजचा सत्संगसोहळा पू. (सौ.) उमाक्का यांच्याच घरी आयोजित केला होता. त्याची सिद्धताही पू. उमाक्का यांनी भावपूर्णरित्या केली होती.
२. सोहळ्याच्या प्रारंभी सर्व साधकांना वेगळेच वातावरण जाणवत होते. एरव्ही चेन्नई येथे पुष्कळ उष्ण वातावरण असते. आज सकाळपासून मात्र वातावरण थंड जाणवत होते. दिवसभर गार वार्याची झुळूक वातावरण आल्हाददायी करत होती.
३. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिष्ट शक्तींमुळे तांत्रिक अडचणी आल्या; मात्र साधकांनी प्रार्थना आणि नामजप केल्यानंतर सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन सोहळा सुरळीत पार पडला.
४. सोहळा चालू असतांना सर्व साधकांना असे वाटत होते की, हा सोहळा पू. (सौ.) उमाक्कांच्या घरी होत नसून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होत आहे.
५. एरव्ही चेन्नईतील सत्संगसोहळ्याला अधिकाधिक २० साधक उपस्थित असतात. आजच्या सत्संगसोहळ्याला ३१ साधक उपस्थित होते. काही जणांना आज काही तरी वेगळे असणार आहे, असे वाटत होते. सकाळपासून सर्व साधकांना वेगळाच आनंद अनुभवत आहे, असे वाटत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात