१. कलियुगापूर्वीच्या युगांतील खरे गुरु !
सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत खरे गुरु होते. त्यांच्या वाणीत चैतन्य होते आणि संकल्पात शक्ती होती. त्यामुळे शिष्याने गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्यावर किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यावर त्याची प्रगती होत असे.
२. कलियुगातील बहुसंख्य गुरु भोंदू असल्यामुळे त्यांच्या भक्तांची होणारी अपरिमित हानी !
अ. आता कलियुगात खरे गुरु जेमतेम १,००० असतील. कलियुगात गुरु म्हणून मिरवणारे बहुतेक गुरु भोंदूच आहेत. त्यांच्या वाणीत चैतन्य नसल्याने आणि त्यांच्या संकल्पात शक्ती नसल्यामुळे शिष्याने अशा गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्यास त्याची साधनेत प्रगती होत नाही. साधनेत प्रगती न झाल्यामुळे शिष्याचा गुरु, गुरुमंत्र, साधना आणि अध्यात्म यांवरचा विश्वास उडतो अन् त्याची जन्मोजन्मी हानी होते. हानी केवळ त्याचीच होत नाही, तर तो इतरांना त्याचे अनुभव सांगतो; त्यामुळे इतरांचाही साधनेवरचा विश्वास उडतो. अशा रीतीने इतरांची दिशाभूल केल्याचे पातकही त्याला लागते.
आ. बहुतेक सर्व भोंदू गुरु गुरुमंत्रासाठी पैसे घेतात. काही जण गुरुमंत्राबद्दलची दक्षिणा १ – २ लाख रुपये असल्याचे त्यांच्या पत्रकात छापतात आणि तसे फलकही लावतात. वर्ष २०१६ मधील उज्जैन कुंभमेळ्यात असे बरेच फलक पहाण्यात आले होते. प्रत्यक्षात गुरुमंत्र अनमोल असतो. त्याची किंमत कधी करता येईल का ? मात्र अशा भोंदू गुरूंनी गुरुमंत्रासाठी पैशांची मागणी केल्यामुळे शिष्य होऊ इच्छिणारा गुरूंबद्दल विकल्प आल्याने चांगल्या गुरूंकडेही जात नाही. त्यामुळे त्याची जन्माची हानी होते.
इ. काही गुरु सिद्धींच्या आधारे चमत्कार करून दाखवतात. बहुतेक वेळा त्यामागे लोकेषणा किंवा वित्तेषणा (धनलोभ), हे कारण असते. असे सिद्धींमध्ये अडकलेले गुरु भक्तांना ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर पुढे पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत.
ई. काही गुरु दर्शनाला आलेल्या स्त्रियांशी असभ्य वर्तन करतात. बरेच गुरु प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्या मागे लागलेले असतात. त्यांच्यात अहंकारासह ईर्षा, राग, द्वेष आदी दोष प्रबळ असतात. असे तथाकथित गुरु त्यांच्या भक्तांसमोर चांगला आदर्श ठेवू शकत नाहीत, उलटपक्षी त्यांचे भक्त आपल्या तथाकथित गुरूंचे दुर्गुण घेण्याचीच शक्यता असते.
३. कलियुगात खरे गुरु फारच अल्प असल्याने गुरुकृपायोग महत्त्वाचा !
साधकाने आणि शिष्याने साधनेत प्रगती होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे गुरुकृपायोग शिकवतो.
३ अ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची आध्यात्मिक उन्नती वेगाने होणे
गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांपैकी कोणालाही गुरुमंत्र देण्यात येत नाही, तरीही ते साधक आध्यात्मिक उन्नती वेगाने करत आहेत. गुरुकृपायोगात साधनेच्या मूलभूत सिद्धांतांनुसार आणि काळानुसार आवश्यक अशी साधना (व्यष्टी आणि समष्टी साधना) सांगितली आहे. त्यानुसार साधक निष्काम भावाने साधना करत असल्यामुळे त्यांना गुरुतत्त्वाचा आशीर्वाद मिळून त्यांची शीघ्र उन्नती होत आहे.
३ आ. गुरूंच्या सहवासात नसतांनाही साधकांची आध्यात्मिक प्रगती होत असणे
गुरुकृपायोगात सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ, असे एक तत्त्व आहे. सगुणातील, म्हणजे देहधारी गुरूंपेक्षा निर्गुण गुरुतत्त्व जास्त महत्त्वाचे असते. गुरुकृपायोगानुसार साधना करणारे साधक गुरु म्हणजे देह नसून तत्त्व आहे, या भावाने साधना करत असल्याने त्यांचे गुरूंच्या देहात अडकणे होत नाही. यामुळे गुरूंच्या सहवासात नसतांनाही साधकांची आध्यात्मिक प्रगती होत रहाते. सनातनच्या अनेक साधकांनी घरी राहून साधना करून संतपदही प्राप्त केले आहे !
३ इ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांची मृत्यूनंतरही आध्यात्मिक प्रगती होत असणे
गुरुकृपायोगानुसार साधना करणारे साधक गुरु हे तत्त्व आहे, या भावाने आयुष्यभर साधना करत असल्यामुळे मृत्यूनंतर निर्गुण गुरुतत्त्व त्यांना मार्गदर्शन करते. त्यामुळे मृत्यूनंतरही त्यांची साधना आणि आध्यात्मिक प्रगती होत रहाते. ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांना मृत्यूनंतर महर्, जन आदी लोकांत स्थान मिळते. अशा मृत साधकांची आध्यात्मिक प्रगती पुढील लोकांतही चालू असते. अशा लोकांत स्थान मिळवलेले सनातनचे काही साधक आता संत झाले आहेत, तर काही साधक सद्गुरुपदी पोहोचले आहेत !
– (पू.) श्री. संदीप आळशी (११.७.२०१७)