काय आहे गोटिपुआ नृत्यप्रकार ?
गोटि या शब्दाचा अर्थ एक आणि पुआ या शब्दाचा अर्थ मुलगा आहे, म्हणजेच गोटिपुआ या शब्दाचा अर्थ एक मुलगा असा होतो. हिंदु संस्कृतीतील पारंपरिक नृत्यप्रकार ईश्वराशी अनुसंधान साधणारे आहेत. त्यापैकी गोटिपुआ हा एक दुर्मिळ नृत्यप्रकार आहे. या नृत्यामुळे व्यक्तीला कलासाधनेतील आनंद तर घेता येतोच; पण तो आध्यात्मिक उन्नतीलाही पूरक आहे. या नृत्यप्रकारात ६ ते १५ या वयोगटातील मुले नृत्य करतात. नृत्य करतांना ही सर्व मुले स्त्रीवेष धारण करतात. हेच या नृत्यप्रकाराचे ठळक वैशिष्ट्य आहे.
गोटिपुआ हा दुर्मिळ नृत्यप्रकार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी दशभूजा गोटिपुआ ओडिशी नृत्य परिषद या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था गोटिपुआ नृत्यप्रकाराला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नरत आहे.
गोटिपुआ नृत्याचा इतिहास
गोटिपुआ या नृत्याला पुष्कळ वर्षांचा इतिहास आहे. ओडिशा येथे भगवान जगन्नाथाचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. या भगवान जगन्नाथाची सेवा करण्यासाठी या नृत्याची निर्मिती करण्यात आली आहे. ही नृत्योपासना झाल्यानंतर भगवान जगन्नाथ विश्रांतीसाठी जातात, असा समज आहे. पूर्वी ही उपासना लहान मुली करत होत्या. कालांतराने त्यांची संख्या न्यून होऊ लागली. त्यानंतर मंदिरातील धर्माधिकार्यांनी सुचवल्यानुसार मुलांनी स्त्रीवेश धारण करून नृत्योपासना चालू ठेवली.
ओडिशातील नृत्यसमूहाकडून रामनाथी, गोवा येथील
सनातनच्या आश्रमात गोटिपुआ या वैशिष्ट्यपूर्ण नृत्याचे सादरीकरण
भगवंताशी अनुसंधान साधणार्या या
दुर्मिळ नृत्यप्रकारामुळे उपस्थित साधकांची भावजागृती
रामनाथी (गोवा) : आध्यात्मिक स्तरावरील नृत्यप्रकार सादर करणार्या ओडिशातील रघुराजपूर येथील नृत्यसमूहाने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गोटिपुआ हे नृत्य नुकतेच सादर केले. अनुमाने दीड घंटा चाललेल्या या कार्यक्रमात कलाकारांनी श्रीविष्णूचा दशावतार, श्रीकृष्ण-राधा, महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण आदी प्रसंगांवर आधारित नृत्याचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण केलेे. कार्यक्रमाच्या प्रारंभी कलाकारांनी नृत्याच्या माध्यमातून पुष्पांजली अर्पण करून विविध देवतांना वंदन केले. त्यानंतर श्रीविष्णूची विविध रूपे, दशावतार, राधा-कृष्ण, श्री जगन्नाथ देवतेचे पूजन यांवर आधारित नृत्य सादर केले. भगवंताशी अनुसंधान साधणार्या या दुर्मिळ कलाविष्कारामुळे उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला.