पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांचा परिचय

पू. (डॉ.) जयंत करंदीकर

पू. (डॉ.) जयंत करंदीकर हे हृदयरोग विशेषज्ञ असून ते गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारदही झाले आहेत. भारतीय आकाशवाणीच्या पुणे केंद्रात सुगम संगीताचे ते अ श्रेणीचे गायकही होते. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा आवाज खराब झाला असता लोकांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारले, तू एवढा मोठा आधुनिक वैद्य (डॉक्टर) असून स्वतःच्या आवाजाला तू स्वतःच बरा करू शकत नाहीस का ? तेव्हा त्यांना वैद्यकशास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्या.

 

 संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा साक्षात्कार आणि ॐकार साधनेला प्रारंभ

डॉ. करंदीकर यांना साक्षात् ज्ञानेश्‍वर माऊलींचा साक्षात्कार झालेला असून त्यांच्या प्रेरणेने त्यांनी ज्ञानेश्‍वरीतील काही ओव्या संगीतबद्ध केल्या आणि ॐकार साधनेला प्रारंभ केला.

 

 वीस वर्षे सातत्याने ॐकार म्हणण्याच्या विविध पद्धतींवर
संशोधन करून दुर्धर रोगाने पीडित अनेक रुग्णांना बरे करणे

गेली २० वर्षे ते सातत्याने ॐकार म्हणण्याच्या विविध पद्धतींवर संशोधन करत आहेत. हे सखोल संशोधन आणि आध्यात्मिक साधना यांच्या माध्यमातून त्यांनी दुर्धर रोगाने पीडित अनेक रुग्णांना बरे केल्याची उदाहरणे आहेत. तोतरेपणापासून अगदी बेशुद्धावस्थेत (कोमात) गेलेल्या रुग्णांनासुद्धा डॉ. करंदीकर यांनी कोणतेही औषधोपचार न करता केवळ ॐकार नादाद्वारे बरे केले आहे. कोणत्याही रुग्णाला पडताळतांना सर्वकाही केवळ माऊलींच्या कृपेमुळेच होत आहे, असा त्यांचा आर्त भाव असतो.

पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) गीता करंदीकर आणि पू. (डॉ.) जयंत करंदीकर

 

कर्तेपणा भगवंताच्या चरणी अर्पण करणारे आणि
सतत भावावस्थेत असणारे नगर येथील पू. (डॉ.) जयंत करंदीकर !

पू. (डॉ.) जयंत करंदीकर हे हृदयरोग विशेषज्ञ आहेत. त्यांना आधुनिक वैद्य म्हणून कार्य करून पुष्कळ पैसे मिळवता आले असते; परंतु त्यांनी तसे न करता त्यांचे संपूर्ण आयुष्य ॐकार साधनेसाठी दिले आहे. एक ऋषीतुल्य विभूती असलेले पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांनी ॐकार साधनेविषयी पुष्कळ संशोधन केले आहेे. ३०.८.२०१७ या दिवशी त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. त्यांच्या भेटीच्या वेळी आणि त्यांचा सन्मान सोहळा झाल्यानंतर साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

 

पू. (डॉ.) करंदीकर यांनी सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ यांच्या प्रश्‍नाला ज्ञानेश्‍वरीतील ओवीद्वारे दिलेले उत्तर

सन्मान सोहळ्याच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांना विचारले, तुम्हाला संतपदी पोहोचल्याची जाणीव झाली होती का ? याविषयी पू. (डॉ.) करंदीकर म्हणाले, मला या वेळी उत्स्फूर्तपणे ज्ञानेश्‍वर माऊलींच्या ओळी स्फुरत आहेत.

पुढां स्नेह पाझरे । मागां चालती अक्षरें ॥

शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं ॥ – ज्ञानेश्‍वरी, अध्याय १३, ओवी २६३

अर्थ : प्रथम हृदयात प्रेमाचा पाझर फुटून मगच त्याच्या मुखातून अक्षरे निघत असतात. अगोदर त्याला कृपा उत्पन्न होऊन मागाहून शब्द निघतात.

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांचे राहणीमान साधे आहे.

१ आ. ते मायेपासून अलिप्त आहेत, असे मला जाणवले.

– श्री. दिवाकर आगावणे, नगर

१ इ. वैज्ञानिक परिभाषेत उत्तरे देणे : पू. (डॉ.) करंदीकर यांनी सगळ्याच प्रश्‍नांना वैज्ञानिक परिभाषेत उत्तरे दिली. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले जसे वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म सांगतात, तसे पू. (डॉ.) करंदीकर सांगत आहेत, असे मला जाणवले.

१ ई. कर्तेपणा भगवंताच्या चरणी अर्पण करणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांचे कौतुक केल्यावर त्यांनी मी काही केले नाही, असे सांगितले. त्यांनी सगळा कर्तेपणा भगवंताच्या चरणी अर्पण केला.

– श्री. अनिमिष नाफडे, नगर

१ उ. पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांच्या बोलण्यावरून त्यांनी त्यांचे कार्य देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून केले आहे, असे मला जाणवले.

– श्री. दिलीप केंगे, नगर

१ ऊ. सतत अनुसंधानात असणे

३०.८.२०१७ या दिवशी पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांना भेटल्यावर ते देहाने येथे आहेत; पण प्रत्यक्षात येथे नाहीत, असे मला वाटले आणि ते सतत अनुसंधानात आहेत, असे मला जाणवत होते.

१ ए. सतत भावावस्थेत असणे 

पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू मुलाखत घेत असतांना त्यांचा भाव पुष्कळ वेळा जागृत होत असे. सद्गुरु गाडगीळकाकू यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देतांना ते पुष्कळ वेळा एका वेगळ्याच भावस्थितीत राहून उत्तरे देत आहेत, असे मला जाणवत होते.

– श्री. अनिमिष नाफडे

२. अनुभूती

अ. त्यांचे डोळे पाहिल्यावर ते मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नेत्रांप्रमाणेच वाटले.

आ. त्यांच्याकडे पाहून माझा भाव जागृत होत होता.

– सौ. शैलजा केदारी, नगर

इ. पू. (डॉ.) करंदीकर यांच्याकडे गेल्यावर आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.

ई. काल सोहळ्याच्या वेळी माझा भाव जागृत झाला होता. तीच स्थिती आजही आहे. कालचा संत सन्मान सोहळा अजूनही डोळ्यांसमोर येऊन मला आनंद जाणवत आहे.

– सौ. मानसी मेंढुलकर, नगर

 

 

सन्मानानंतर पू. (डॉ.) जयंत करंदीकर यांनी व्यक्त केलेले मनोगत

१. मला मायेतून अलिप्त आणि निरिच्छ झाल्याची जाणीव होत आहे !

मला संतत्वाच्या जाणिवेविषयी लक्षात येत नाही; परंतु सात्त्विकतेचा अनुभव येतो. आता मन जगातील कारभारामध्ये गुंतत नाही. मला मायेच्या या पसार्‍यातून अलिप्तता येत असल्याचेही वाटते. मी प.पू. मेहेरबाबा यांच्याकडे सेवेसाठी जात होतो. त्या वेळी बाबा म्हणायचे, दुसर्‍यांचा राग करण्यापेक्षा स्वतःतील स्वभावदोषांचा राग करा. दुसर्‍याची घृणा करण्यापेक्षा स्वतःच्या कामांधतेची घृणा करा आणि निरिच्छ होण्यापेक्षा दुसरी कोणतीही इच्छा करू नका. याच प्रकारे मी निरिच्छ झाल्याची जाणीव मला होत आहे. बाह्य जगतामध्ये कुठे काही होत असेल, तर त्याविषयी मला काहीही वाटत नाही. स्वतःतील षड्रिपूंचे प्रमाणसुद्धा अत्यल्प झाल्याचे जाणवते.

२. ॐकाराची दैनंदिन साधना करतांना प्रत्येक दिवशी
नवनवीन माहिती स्फुरल्यामुळे सृष्टीतील बुद्धीचा प्रकाश वाढल्याचे मला जाणवते !

माऊलींनी प्रत्येक ॐकाराला श्री गणेशाचे रूप आणि सगळ्या बुद्धींचा प्रकाशसुद्धा श्री गणेशच आहे, असे म्हटले आहे. ही ओवी मी प्रतिदिन अनुभवतो. अर्थात् ॐकाराची दैनंदिन साधना करतांना प्रत्येक दिवशी नवनवीन माहिती मला स्फुरते. त्यामुळे सृष्टीतील बुद्धीचा प्रकाश वाढल्याचे मला जाणवते. या स्फुरणातूनच माझे प्रतिदिनचे लिखाणसुद्धा नियमितपणे चालू आहे.

३. विश्‍वाशी आपली होणारी सात्त्विक समरसता, म्हणजे आध्यात्मिक उन्नती होत असल्याचे द्योतक आहे !

एका शिबिरामध्ये एका विद्यार्थ्याने मला आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय ?, असा प्रश्‍न विचारला. त्याला उत्तर देतांना मी म्हटले, आधी आपल्यात सात्त्विकता यायला हवी. आपण निरिच्छ व्हायला हवे. याचा अर्थ जगामध्ये कुठे जायचे नाही, असा नसून त्यातून अलिप्तता येणे, ही पहिली पायरी आहे. इतकेच नव्हे, तर मरणाचीसुद्धा भीती जाणे आवश्यक आहे. थोडक्यात विश्‍वाशी आपली होणारी सात्त्विक समरसता, म्हणजे आध्यात्मिक उन्नती होत असल्याचे द्योतक आहे. अशी माझी स्वतःची स्थिती असून ती वाढत आहे.

४. आता मला विज्ञान ही दुय्यम गोष्ट वाटू लागली आहे !

विज्ञाननिष्ठ ॐकार साधना करतांना याद्वारे पहिल्या रुग्णाला बरे वाटल्यानंतर मला झालेला आनंद काही निराळाच होता. संशोधनात्मक कार्य करत केलेली आध्यात्मिक साधना आणि त्यातून बरा झालेला रुग्ण, याचा आनंद अविस्मरणीय आहे. त्यानंतर असे अनेक प्रसंग आले; परंतु आता यामध्ये संशोधन करण्यासारखे काही राहिले नाही. त्यामुळे आता यामध्ये विज्ञान म्हणून पहाण्याचे प्रमाण पुष्कळ उणावले असून मला विज्ञान ही दुय्यम गोष्ट वाटू लागली आहे. आता पुढील प्रवास माऊलीच करवून घेतील आणि तो प्रवास आता व्हावा, अशी इच्छा माझ्या मनामध्ये येते.

५. ॐच्या साधनेतून साधक ऐहिक जीवनात शुद्ध होऊन
त्याची पारमार्थिक वाटचाल निर्गुणाकडे होण्यास आरंभ होतो !

चरितार्थ चालवण्यासाठी म्हणून रुग्णालय काढणे इत्यादी सर्वकाही केले. त्याचा लोभ माझ्या मनाला कधीही नव्हता. तसे असते, तर आजपर्यंत मी कोट्यवधी रुपये कमवू शकलो असतो; परंतु माझी वृत्ती मुळातच तशी नव्हती. विज्ञानाकडून अध्यात्माकडे वळू, असे आधी मला वाटले होते; कारण ॐकार हा शक्तीकडून शांतीकडे आणि व्यक्ताकडून अव्यक्ताकडे नेणारा मार्ग आहे. इतकेच नव्हे, तर तो साधकाला सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जातो. ॐकार हे परमेश्‍वराचे परम शुद्ध रूप आहे. ॐच्या साधनेतून साधक ऐहिक जीवनात तर शुद्ध होतोच आणि त्याची पारमार्थिक वाटचालसुद्धा निर्गुणाकडे होण्यास आरंभ होतो. त्यामुळे साडेतीन मात्रांच्या पलीकडे सर्वकाही शून्य आहे. ते स्थुलातून दर्शवता येत नाही. परमेश्‍वर त्या शून्यरूपात असल्यामुळे सर्वकाही चालू आहे. त्यामुळे आपण त्याला विसरून चालणार नाही.

६. आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये पत्नीने केलेले साहाय्य

आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये माझी पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) गीता यांनी मला सतत साथ दिली असून त्यांच्याविना हे सर्व करणे मला शक्य झाले नसते. मी करत असलेल्या प्रयोगाचा प्रत्येक टप्पा सौ. गीता यांना ऐकवला. त्यांनी नेहमी संयमाने सर्वकाही ऐकून घेतले आणि मला प्रोत्साहित केले.

७. ॐकाराद्वारे रुग्णांना बरे करतांना सहकारी वैद्य आणि लोक यांचे आलेले कटू अनुभव

या सगळ्या प्रवासामध्ये मार्गक्रमण करतांना सहकारी वैद्य आणि लोकांनी माझी टिंगलसुद्धा केली.

१. तुम्ही हे काहीतरी काय सांगता ? ॐमधून काही होते का ?, असे लोक म्हणत असत.

२. अगदी प्रसिद्ध गायकांनीसुद्धा ॐ म्हणण्याने आवाज चांगला होतो का कधी ?, असे म्हणत मला हिणवले.

३. वैद्यांमध्ये चर्चासुद्धा होती. त्यांच्याकडे येणार्‍यांना ते म्हणत असत, डॉ. करंदीकर लोकांना सांगतात, ॐच्या उच्चारणाने रोग बरे होतात ! असे कधी होते का ? प्रत्यक्षात कोणतीही औषधे, उपचार किंवा शस्त्रकर्म यांच्याविना केवळ ॐच्या उच्चाराने व्याधी बर्‍या होतात. असे केल्यामुळे व्यावहारिक जीवनातील माया (पैसा) इतर वैद्यांच्या हातातून सुटत असे. त्यामुळे बरेच वैद्य माझ्यावर डूख धरूनसुद्धा होते.

८. आता आधुनिक वैद्यांनी रुग्णांना उपचारातील एक भाग म्हणून ॐ म्हणण्यास
सांगणे, हा माऊलींनी माझ्याकडून करवून घेतलेल्या ॐकाराच्या संशोधनाचा विजयच !

माझे नाव अपकीर्त करण्याचे प्रकार घडत होते. असे असले, तरी आजच्या युगामध्ये आता आधुनिक वैद्य त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांना जसे योगासने, प्राणायाम इत्यादी करण्याचा समादेश देतात, तसेच आता काही वेळ उपचारातील एक भाग म्हणून ॐ म्हणण्यासही सांगतात. हा माऊलींनी माझ्याकडून करवून घेतलेल्या ॐकाराच्या संशोधनाचा विजयच असल्याचे मी मानतो.

९. कुष्ठरोग्यांची सेवा करणे आणि अवतार मेहेरबाबांशी संपर्क होणे

वर्ष १९७५ मध्ये मी माझ्या वैद्यकीय व्यवसायासह कुष्ठरोग्यांची सेवा करण्यास आरंभ केला. तेव्हा माझ्याकडे आलेल्या एका रोग्याला येण्यास विलंब का झाला ?, असे मी विचारले. तेव्हा त्याने बसमधून येतांना मला कुणीही आत घेतले नाही. त्यामुळे मला चालत तुमच्याकडे यावे लागले, असे सांगितले. हे ऐकून मला माझी चूक लक्षात आली आणि कुष्ठरोग्यांच्या सेवेमध्ये मी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे माझा संपर्क अवतार मेहेरबाबांशी झाला. मला अध्यात्माची पुढील दिशा मिळाली आणि माझी अध्यात्मातील वाटचाल चालू झाली.

१०. ॐकाराची साधना करतांना आलेल्या विविध प्रकारच्या आध्यात्मिक अनुभूती

या प्रवासामध्ये मला ॐकार साधना करतांना विविध प्रकारच्या आध्यात्मिक अनुभूतीसुद्धा आल्या

१० अ. सूर्याकडे न पहाताही वलय दिसणे

सूर्याकडे काही वेळ पाहिल्यानंतर डोळे मिटल्यास आपल्याला ज्या प्रकारे वलय दिसते, तसे वलय मला सूर्याकडे न पहातासुद्धा दिसत असे. थोडक्यात ॐकारच दिसत होता.

१० आ. ॐ दिसणे

काही वेळा पांढराशुभ्र ॐकार, तसेच ज्याकडे पहातच रहावे, असाही ॐ दिसला.

१० इ. ॐचे उच्चारण ऐकतांना सुमधुर आवाजातील बासरीचा नाद ऐकू येणे आणि तो नाद श्रीकृष्णाच्याच बासरीचा असल्याची ठाम श्रद्धा असणे

काही वेळा नादाच्या अनुभूतीही आल्या. सिंगापूर येथील एक अभ्यासवर्गामध्ये शिकवलेल्या ॐचे उच्चारण तेथे उपस्थित असलेले करत होते. त्यांच्या उच्चारणातून मला सुमधूर आवाजातील बासरीचा नाद ऐकू आला. प्रत्यक्षात तेथे कुणीही बासरीवादन करत नव्हते. तो नाद श्रीकृष्णाच्याच बासरीचा होता, अशी माझी ठाम श्रद्धा आहे. ही मला आलेली नादाची प्रथम अनुभूती होती.

११ . ॐकाराचे महत्त्व

साधकांनीसुद्धा प्रतिदिन न्यूनतम २० मिनिटे ॐकार म्हटल्यास त्यांना त्याचा आध्यात्मिक लाभ होईल, यात शंका नाही.

१२. ॐ आणि श्रीगणपति यांच्यातील संबंध

ॐ आणि श्री गणपति यांच्यातील संबंध याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. ॐच्या अ, उ, म आणि  ँ या साडेतीन मात्रा आहेत. याचे सगुण रूप श्री गणपति आहे. ज्ञानेश्‍वर माऊलींनी याविषयी म्हटले आहे,

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
– ज्ञानेश्‍वरी, अध्याय १, ओवी १९ आणि २०

अर्थ : ॐकारातील अकार हे श्री गणपतीचे दोन्ही चरणस्वरूप आहे. उकार त्याचे विशाल उदर (पोट) आहे. मकार श्री गणपतीचे महामस्तक असून त्यावरील बिंदू ही अर्धमात्रा होय.

अशा प्रकारे ॐकाराच्या वैज्ञानिक संशोधनातून आध्यात्मिक वाटचाल साध्य करत आज डॉ. जयंत करंदीकर हे पू. (डॉ.) जयंत करंदीकर झाले आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या दर्शनाचीही ओढ त्यांना लागली असून हा योग लवकरच यावा, अशी पू. (डॉ.) करंदीकर यांनी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.

१३. साधकांना आलेल्या अनुभूती

अ. डॉ. जयंत करंदीकर यांच्या प्रथम भेटीच्या वेळी हे संतच आहेत, असा विचार देवाने सुचवणे आणि त्यांच्याशी बोलतांना भावजागृती होऊन मन निर्विचार होणे

डॉ. जयंत करंदीकर यांच्या प्रथम भेटीच्या वेळीच देवाने विचार दिला होता, डॉ. करंदीकर हे संतच आहेत. त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक संभाषणाच्या वेळी त्यांच्याकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असल्याची मला अनुभूती येत असे. ते बोलतांना त्यांच्या शब्दांकडे लक्ष न रहाता बोलण्यातील आनंद आणि त्यामुळे मनाला होणारा आनंद यांकडे माझे लक्ष जात असे. त्यांच्याशी होणार्‍या वार्तालापाच्या वेळी माझी भावजागृती होऊन माझे मन निर्विचार होत असे. ही अवस्था पुढे अनेक घंटे टिकून रहात असे.

– श्री. सत्यकाम कणगलेकर, नगर

आ. सोहळ्याच्या वेळी मला शांत वाटले आणि माझे मन निर्विचार झाले.

– सौ. अरुंधती कृष्णा केंगे, नगर

इ. पू. (डॉ.) करंदीकर यांच्या सेवाभावाविषयी ऐकून भाव जागृत होणे

पू. (डॉ.) करंदीकर यांच्या सेवाभावाविषयी ऐकून माझा भाव जागृत झाला. त्यांच्यात कर्तेपणा अत्यल्प असल्याचे मला जाणवले. त्यांच्यातील रागीटपणा हा स्वभावदोष अजूनसुद्धा काही प्रमाणात असल्याचे त्यांनी मोकळेपणाने स्वीकारल्याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटले.

– सौ. सुचित्रा दिलीप केंगे, नगर

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 

Leave a Comment