धर्मशिक्षण मिळाल्याने जिज्ञासूंचे समाधान !
पुणे : गणेशोत्सव भक्तीभावाने आणि धर्मशास्त्रानुसार साजरा केला जावा, उत्सवात शिरलेले अपप्रकार दूर होऊन उत्सवाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रबोधन व्हावे, तसेच भाविकांनाही उत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी गणेशोत्सवाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारी प्रवचने आयोजित करण्यात आली होती. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी या काळात धार्मिक कृती कशा कराव्यात, नामजप कोणता करावा याच्या जोडीलाच ‘श्री गणेशाला लाल फूल आणि दुर्वा वहाण्यामागचे शास्त्र’, ‘धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे महत्त्व’ याविषयीचे धर्मशिक्षण प्रवचनांच्या माध्यमातून देण्यात आले. भाविकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अध्यात्मशास्त्रीय माहिती मिळाल्याने अनेक जणांनी समाधान व्यक्त केले, तर काही ठिकाणी नियमितपणे धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रवचन सेवेतील काही क्षणचित्रे
१. शांतीनगर मंडळात महिलांनी अथर्वशीर्ष म्हणण्याचे नियोजित केले होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अविनाश दिलीप चरवड यांनी सनातननिर्मित गणपति अथर्वशीर्ष हा लघुग्रंथ ५० भाविकांना दिला. सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे यांनी गणपतीची अध्यात्मविषयक माहिती थोडक्यात सांगितली. या वेळी ४० जण उपस्थित होते. या वेळी त्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी पुन्हा आमंत्रित केले.
२. वडगाव येथील विष्णुपुरम् वसाहतीमध्ये आयोजित केलेल्या प्रवचनामध्येही डॉ. ज्योती काळे यांनी गणेशाची मूर्ती, मूर्तीविज्ञान, विसर्जन यांविषयी माहिती देऊन भाविकांचे शंकानिरसन केले. वसाहतीचे श्री. संदीप जाधव यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी ६० जण उपस्थित होते.
३. शिरवळ (जिल्हा सातारा) येथे कमलानगर गणेश मित्र मंडळात समितीच्या सौ. छाया पवार यांनी उपस्थित ३५ महिलांना श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगितली. मंडळाच्या वतीने सौ. राधा बेलापूरकर यांनी सौ. पवार यांचा सत्कार केला. या प्रवचनांनंतर काही महिलांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
४. सांगवी येथील गणेशनगर मित्र मंडळ येथे ५० जिज्ञासूंनी प्रवचनाचा लाभ घेतला. श्री. संदीप चोपदार आणि श्री. भोईटे यांनी गणेशपूजा विधी आणि शास्त्र यांविषयी अवगत केले.
५. पिंपरीगाव येथील वाघेरे कॉलनी येथे आयोजित केलेल्या प्रवचनात शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीचे आणि विसर्जन वहात्या पाण्यात करण्यामागील शास्त्र सांगितल्यावर उपस्थित भाविकांनी शास्त्रानुसार नदीतच गणेशमूर्तीचे विसर्जन करणार असल्याचे सांगितले.
६. चिंचवड स्टेशन येथे मुलांच्या शाळा क्रमांक १ मध्ये, तसेच मोहननगर कन्या शाळेत प्रवचन घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगण्यात आली. उपस्थित शिक्षिकांनीही प्रवचनामुळे नामजप करण्याचे महत्त्व पटले, तसेच वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागील शास्त्र समजले, असा अभिप्राय व्यक्त केला.
७. जय भवानी शाळेत मुलांनी उत्सुकतेने गणेशमूर्ती कशी असावी, स्थापना आणि विसर्जन कसे करावे आणि कुठल्या दिवशी करावे’ असे सर्व प्रश्र विचारले. शाळेचे संस्थापक श्री. गणेश दातार पाटील यांनी समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रवचनात सांगितल्याप्रमाणेच कृती करण्याचे आवाहन केले.