१४ व्या शतकातील महान गणेशभक्त मोरया गोसावी हे त्यांच्या उत्कट गणेशभक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मोरगांव येथे गणेशाची भक्ती केली. तसेच थेऊर येथेही एका खडकावर बसून गणेशोपासना केली. थेऊर हे गाव मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेले आहे.
गणपतीने मोरया गोसावी यांना असा साक्षात्कार दिला की ‘‘मी (गणपति) तुझ्या पूजेकरिता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.’’ त्यानंतर त्यांना कर्हा नदीच्या पात्रात श्री गणेशमूर्ती प्राप्त झाली. पुढे ते मोरगावहून चिंचवड येथे स्थायिक झाले. त्यांनी तेथे गणपति मंदिर उभारले. त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या श्री गणेशमूर्तीची स्थापना केली. काही कळाने मोरया गोसावी यांनी तेथेच संजीवन समाधी घेतली.
गणेशभक्त मोरया गोसावी यांनी थेऊरजवळ ज्या स्थानी बसून साधना केली, तो पवित्र खडक आणि स्थान ! मोरया गोसावी यांच्या उत्कट गणेशभक्तीची ग्वाही देणार्या या स्थानाला भावपूर्ण नमस्कार करूया !