जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका ! तालुक्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मालय या पवित्र क्षेत्री असलेले श्री गणेशमंदिर सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील मूर्ती १०० हून अधिक वर्षांपूर्वी मंदिराजवळ असलेल्या तळ्यात मिळाल्या.
श्री गणेशपुराणाच्या उपासना खंडातील ७३, ७४, ९० आणि ९१ व्या अध्यायात श्रीक्षेत्र पद्मालय संस्थानातील स्वयंभू श्री गणेशमूर्तीचा उल्लेख आढळतो. साडेतीन सिद्धीविनायकांपैकी (पिठांपैकी) श्रीक्षेत्र पद्मालय पूर्ण पीठ आहे. मोरगांव, राजूर, पद्मालय हे पूर्ण, तर चिंचवड हे अर्धपीठ असल्याचा उल्लेख आढळतो.
थोर संत सद्गुरु श्री गोविंद महाराज शास्त्री बर्वे यांनी शके १८२५ (वर्ष १९०३) मध्ये पद्मालय येथील मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर पूर्वीच्या काशी विश्वेश्वरांच्या मंदिराची प्रतिकृती आहे. या मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेच्या अशा दोन श्री गणेशमूर्ती आहेत. त्या कशा अवतरल्या त्यासंदर्भातील माहिती पुराणांमध्ये आढळते.
आरंभी डाव्या सोंडेच्या गणपतीसंदर्भात जाणून घेऊया. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष शंकरांनी प्राशन केल्यावर त्यांच्या शरिराची आग होऊ लागली. त्यावेळी गळ्यात शेषनागाला धारण केल्याने महादेवांच्या शरिराची आग शांत झाली; परंतु शेषनागास गर्व झाला की, ‘माझ्या सान्निध्यामुळे महादेवांना बरे वाटू लागले.’ महादेवांना हे समजले. त्यांनी शेषाला जमिनीवर फेकले. त्यावेळी शेष पद्मालयक्षेत्री येऊन पडले. शेषनाग दु:खाने फुत्कारू लागले. त्यांचा आवाज ऐकून नारदमुनी त्यांच्याजवळ आले. त्यांनी शेषाला पंचाक्षरी श्री गणेशाचा मंत्र दिला. त्यांच्या तपोबळाने १२ वर्षांनंतर डाव्या सोंडेच्या आकारात प्रवाळयुक्त गजाननांनी शेषनागाला दर्शन दिले आणि पृथ्वीचा भार चांगल्या रीतीने सांभाळता यावा, अशी शक्ती दिली. आपल्या पिताश्रींना (अर्थात् महादेवाला) पुन्हा शेषाला गळ्यात धारण करण्याची विनंती केली. ‘माझी मनोकामना जशी पूर्ण केली, तसेच येथे येणार्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण येथे थांबावे’, अशी शेषनागांनी गणेशाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आजही डाव्या सोंडेचा गणपती पद्मालय येथे वास्तव्य करून आहे.
उजव्या सोंडेच्या गणपतीचा इतिहास आता पाहूया. परशुराम अवताराच्या काळात या प्रदेशात ‘कृतवीर्य’ नावाचा राजा होऊन गेला. त्याला मूल नव्हते. तो दत्तात्रेयांचा भक्त होता. श्री दत्तांनी पुत्रप्राप्तीसाठी त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. एका चतुर्थीस कृतवीर्य पूजा करत असतांना त्याला जांभई आली. त्यावेळी त्याने आचमन न करता पूजाविधी तसाच चालू ठेवला. या चुकीमुळे राणीला हात-पाय नसलेला मुलगा झाला. त्याचे नांव ‘कार्तवीर्य’ ठेवले. त्या मुलाला १२ वर्षे सांभाळले. पुढे कार्तवीर्याला गुरुदत्तांनी १२ वर्षे गणेशाचा बीजमंत्राचा जप करण्यास सांगितले. पद्मालयाच्या याच तलावासमोर कार्तवीर्याने तपश्चर्या केली. या तलावातून प्रवाळयुक्त गजाननांनी दर्शन दिले. गजाननांनी कार्तवीर्याला स्पर्श केल्यावर त्याचे सहस्र हात आणि दोन पाय तयार झाले. त्याचे नाव ‘सहस्रार्जुन’ ठेवले. त्याने सहस्र हातांनी श्रींना येथेच थांबण्याची विनंती केली. विनंतीला मान देऊन उजव्या सोंडेचे श्री गणपती त्याच स्थितीत येथे थांबलेले आहेत.
मंदिरातील उंदराच्या २ हातांना असलेली १४ बोटे हे १४ सिद्धींचे प्रतीक आहे.
पद्मालय येथील अतिप्राचीन डाव्या आणि उजव्या सोंडेच्या स्वयंभू श्री गणेशमूर्ती ! या श्री गणरायांनी ज्याप्रकारे शेषनाग आणि कार्तवीर्य यांच्या मनोकामना पूर्ण केल्या, त्याचप्रकारे भारतातील सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या मनातील ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या तळमळीला त्यांनी मूर्त रूप द्यावे, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करूया.
पद्मालय, तालुका एरंड, जिल्हा जळगाव येथील श्री गणेश मंदिर आणि त्याच्या परिसरातील निसर्गरम्य तळे ! या तळ्यातच १०० हून अधिक वर्षांपूर्वी श्री गणेशाच्या दोन्ही मूर्ती सापडल्या आणि सद्गुरु श्री गोविंद महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या तळ्याचे वैशिष्ट्य असे की, येथे कमळ आपोआप फुलतात.
मंदिराच्या परिसरात असलेल्या गणेशाचे वाहन उंदीर ! या उंदराचे वैशिष्ट्य असे की, त्याच्या दोन्ही हातांना ७-७ म्हणजेच एकूण १४ बोटे आहेत. ही १४ बोटे म्हणजे १४ सिद्धींची प्रतीकं आहेत.