
मे २०१७ मध्ये मला मंगळुुरू (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्याकडे जाऊन संगीत ही साधना म्हणून शिकण्याची संधी मिळाली. त्या वेळी प.पू. देवबाबा यांनी सांगितले, संगीतातून अंतरंगात साधनेच्या प्रवासाकरता प्रतिदिन स्वतःला विसरून आर्तभावाने भगवंतासाठी गात आहोत, या भावाने संगीताचा सराव कर. त्याप्रमाणे साधना म्हणून संगीताचा सराव करतांना मला आलेल्या विविध अनुभूती येथे देत आहे.
१. नामजप करतांना संगीतातील सप्तस्वरांनी देहात प्रवेश केल्याचे जाणवून
भावजागृती होणे आणि देवाने जणू संगीत साधनेचा संकेत दिला, असे जाणवणे
२५.४.२०१७ या दिवशी नामजप करतांना मला संगीतातील सप्तस्वर आकाशात दिसले. त्यानंतर सातही स्वरांनी माझ्या देहात प्रवेश केला. तेव्हा माझे मन एकाग्र होऊन माझी भावजागृती झाली. ही अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीताच्या माध्यमातून साधना करण्यास सांगण्याच्या आधीची आहे. देवाने जणू आधीच संगीत साधनेचा संकेत दिला, असे मला जाणवले.
२. संगीतातील रागांचा सराव करतांना सप्तचक्रांची शुद्धी होत असल्याचे जाणवणे
मे २०१७ मध्ये संगीतातील रागांचा सराव करतांना माझ्या लक्षात आले, माझ्या शरिरातील सप्तचक्रांची शुद्धी होत आहे. काही कालावधीनंतर माझे संपूर्ण शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.
३. श्रीरामाचे भक्तीगीत म्हणतांना एक खार शिवमंदिराच्या गाभार्यातील
नंदीजवळ येणे आणि ती श्रीरामाचे गुणगान ऐकण्यासाठी आल्याचे जाणवणे
मे २०१७ पासून मी प्रतिदिन देवद आश्रमाच्या जवळच असलेल्या शिवमंदिरात संगीताचा सराव करते. सरावाच्या वेळी रामा रघुनंदना… हे भक्तीगीत म्हणतांना एक खार गाभार्यातील नंदीजवळ आली. तेव्हा मला जाणवले, खार भजनाच्या माध्यमातून श्रीरामाचे गुणगान ऐकत आहेे. गाण्याच्या सरावाच्या वेळी १५ मिनिटे ती खार तेथेच थांबून होती.
४. भजन म्हणतांना ते थांबले जाऊन
मन एकाग्र होणे आणि आजूबाजूची जाणीव नसणे
मे २०१७ मध्ये भजनाचा सराव करतांना काही वेळा मी अनुभवले, भजन म्हणतांना ते थांबले जाऊन माझे मन एकाग्र झाले आहे आणि मला आजूबाजूची काहीच जाणीव नाही.
५. रागांच्या सरावाच्या वेळी षड्ज म्हणतांना आणि स्वरांचा
विस्तार करतांना भाव जागृत होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण येणे
२६.७.२०१७ या दिवशी संगीतातील रागांच्या सरावाच्या वेळी आरंभी षड्ज लावावा लागतो. तो म्हणतांना आणि स्वरांचा विस्तार करतांनाही माझा भाव जागृत झाला. स्वर आत जात आहेत, असे मला जाणवले. मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आली.
६. संगीताचा सराव करतांना ॐच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
६ अ. नदीतील पाण्यात ॐ दिसणे आणि तो संपूर्ण निसर्गात जात असल्याचे जाणवणे
५.८.२०१७ या दिवशी सायंकाळी संगीताचा सराव करतांना मी खोलीत गेले. तेव्हा देवद आश्रमाच्या जवळ असलेल्या नदीकडे माझे लक्ष गेले. नदीतील पाण्यात मला ॐ दिसला. तेव्हा मी एक भक्तीगीत म्हटले. त्या वेळी मला ॐ संपूर्ण निसर्गात जात आहेे, असे जाणवले.
६ आ. केदार रागाचे स्वर म्हणतांना भावजागृती होणे, परात्पर गुरु डॉक्टर
श्रीकृष्णाच्या रूपात दिसणे आणि ध्यानस्थ बसलेल्या प.पू. देवबाबांच्या आज्ञाचक्राजवळ प्रकाश दिसणे
त्यानंतर मी खोलीत सरावाला बसले. मी केदार रागाचे स्वर म्हणतांना माझी भावजागृती झाली. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले, परात्पर गुरु डॉक्टर श्रीकृष्णाच्या रूपात असून ते पाना-फुलांच्या एका फांदीला धरून उभे आहेत. मी ही त्या दिशेने झेप घेतली आहे. श्री गुरु आणि मी दोघेही त्या फांदीला धरून आहोत. चरणांवर डोके टेकवल्याप्रमाणे मी सूरपेटीवर आपोआप डोके टेकवले आहे. नंतर प.पू. देवबाबा ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यांच्या आज्ञाचक्राजवळ प्रकाश दिसत आहे, असे जाणवले.
६ इ. संपूर्ण शरीर प्रकाशमान झाल्याचे दिसणे आणि
शरिरात ॐ असून स्वतःचे अस्तित्व नष्ट झाल्याचे जाणवणे
काही वेळाने मला जाणवले, प्रकाश माझ्या आत येत आहे आणि तो वाढत जाऊन मी संपूर्ण प्रकाशमान झाले आहे. त्यानंतर शरिरात ॐ असून माझे अस्तित्व नष्ट झाले आहे. माझी ही अवस्था अर्धा घंटा होती. त्या वेळी प.पू. देवबाबा मला काही सांगत असल्याचे जाणवले; पण ते काय म्हणत आहेत ?, हे मला कळत नव्हते.
७. सरावाच्या वेळी विठ्ठलाचे भजन म्हटल्यावर
रात्री विठोबाने मूर्तीरूपात येऊन दर्शन दिल्याचे जाणवणे
५.८.२०१७ या दिवशी सायंकाळी मी देव माझा विठू सावळा… हे भजन म्हटले. त्या रात्री झोपतांना श्री एकनाथ महाराजांच्या देवघरातील विजयी पांडुरंगाची एक हात खाली आणि एक हात कमरेवर असलेली मूर्ती बराच वेळ माझ्या डोळ्यांसमोर येत होती. असे का झाले ?, हे मला कळले नाही. नंतर माझ्या लक्षात आले, मी देव माझा विठू सावळा… हे भजन म्हटल्याने खरेच देवाने ते ऐकले आणि त्याने पांडुरंगाच्या मूर्तीच्या रूपात मला दर्शन दिले. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझा भाव जागृत झाला.
८. तिलंग रागाचा सराव करतांना आनंद आणि चैतन्य जाणवणे, नंतर पुरिया धनश्रीची
चीज म्हणत असल्याचे जाणवणे आणि एक देवता घुंगरू बांधून नृत्य करत असल्याचे जाणवणे,
त्यानंतर राग म्हणणे बंद होऊन मन निर्विचार होणे अन् स्वतःचे अस्तित्व नसल्यासारखे वाटणे
६.८.२०१७ या दिवशी सायंकाळी संगीताचा सराव करतांना मी तिलंग राग म्हणत होते. तेव्हा अतिशय आनंद होऊन मला चैतन्य जाणवत होते. त्यानंतर मला जाणवले, मी पुरिया धनश्रीची चीज म्हणत असून एक देवता घुंगरू बांधून नृत्य करत आहे आणि मलाही त्याचा आनंद जाणवत आहे. (कोण होते ?, ते मला कळले नाही. गीताचा परिणाम म्हणून देवतांपर्यंत स्वरांची स्पंदने पोहोचून देवता आकृष्ट होतात, असा विचार माझ्या मनात आला. – सौ. अनघा जोशी) त्यानंतर राग म्हणणे बंद होऊन माझे मन निर्विचार झाले.
त्यानंतर मला दिसले, आत पुन्हा ॐ असून त्याचा प्रकाश माझ्या शरिरात पसरला आहे आणि संपूर्ण शरीर प्रकाशमय झाले आहे. तेव्हा माझे अस्तित्व नसल्याचे मला जाणवले. ही अवस्था पाऊण घंटा होती. या अवस्थेतून बाहेर येऊच नये, असे मला वाटत होते. पाऊण घंट्यानंतर मला जाणवले, माझ्या हृदयात प.पू. देवबाबा बसले आहेत.
९. शंकरा रागाची चीज म्हणतांना शिवाचे अंधुक दर्शन
होऊन पुष्कळ चैतन्य जाणवणे आणि संगीत थांबवूच नये, असे वाटणे
त्यानंतर मी शंकरा रागाची चीज म्हणत होते. तेव्हा शिवाचे अंधुक दर्शन होऊन मला पुष्कळ चैतन्य जाणवले. संगीत थांबवूच नये, असे मला वाटत होते. मला एकेक स्वर प्रकाशमान वाटत होता. तेव्हा माझ्या लक्षात आले, केवळ श्री गुरूंच्या संकल्पाने कार्य कसे होते, हे संगीत सेवेच्या माध्यमातून देव मला शिकवत आहे.
– सौ. अनघा जोशी, देवद आश्रम, पनवेल. (७.८.२०१७)