जळगाव : चोपडा येथील पंकज विद्यालयात शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निमूर्लन प्रक्रिया कशी राबवावी ? याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे आयोजन पंकज विद्यालयाचे प्रधान अध्यापक डॉ. एम्.व्ही. पाटील यांनी केले होते. या वेळी डॉ. पाटील यांनी सनातनचे साधक श्री. यशवंत चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर शाळेचे प्राचार्य श्री. संभाजी देसाई यांनी सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांचे स्वागत केले. तर कु. जयश्री पाटील यांचे स्वागत उपमुख्याध्यापक श्री. योगेश चौधरी यांनी केले. कार्यशाळेला सुरुवात श्री गणेशाच्या श्लोकाने आणि प्रार्थनेने झाली. सनातन संस्थेचा परिचय कु. जयश्री पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्री. योगेश चौधरी यांनी केले. स्वभावदोष आणि अहं निमूर्लन या विषयावर सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी सांगितले की, मानवी जीवनाचा उद्देश आनंदप्राप्ती आहे. धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव निर्माण होत असतात. यासाठी कसे प्रयत्न करावे, दोष आणि अहं निर्मूलनाद्वारे व्यक्तिमत्व विकास होऊन जीवनात आनंदप्राप्ती करू शकतो, असे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेत ४५ शिक्षकांनी सहभाग घेतला.
वरील विषय समजून घेण्यासाठी सर्व शिक्षकांनी वही आणि लेखणी आणून सर्व सूत्रे लिहून घेतली. स्वत:मधील दोष लक्षात आल्यावर काही शिक्षकांनी सांगितले की, खरोखर अतिशय सोप्या आणि सुलभ अशा या प्रक्रियेने जीवन आनंदी बनेल यात शंकाच नाही. सर्वांनी हा विषय आम्हाला फार आवडला, असे सांगितले. आपण येऊन आम्हाला योग्य मार्गदर्शन केले याविषयी सनातन संस्थेचे आभार आणि आपले कार्य चांगले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक श्री. एम्.व्ही. पाटील म्हणाले, गणेशचतुर्थीच्या पावन पर्वावर अमूल्य अशी माहिती मिळाली. या वेळी चांगले शिकायला मिळाले, याप्रमाणे कृती करण्याचा आम्ही प्रयत्न करणार.