वाई (जिल्हा सातारा) येथे यंदाही श्री गणेशमूर्ती दान आणि कृत्रिम तलाव करण्याचा प्रशासनाचा निर्णय
- वाई (जिल्हा सातारा) येथील शांतता समिती बैठक
- श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यावर हिंदुत्वनिष्ठ ठाम !
सातारा – वाई (जिल्हा सातारा) येथे नुकतीच शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस आणि प्रशासन यांनी श्री गणेशमूर्ती दान आणि कृत्रिम तलाव या संकल्पनांना प्रशासनाने मान्यता दिली; मात्र स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी कृष्णामाईच्या पात्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार असल्याचे पोलीस आणि प्रशासनाला ठामपणे ठणकावून सांगितले.
लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात पार पडलेल्या शांतता समितीच्या या बैठकीस जिल्हा पोलीसप्रमुख श्री. संदीप पाटील, प्रांताधिकारी सौ. अस्मिता मोरे, तहसिलदार श्री. म्हेत्रे, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील वर्षी शेततळी खोदून त्यामध्ये आमोनियम-बाय-कार्बोनेट सोडण्यात आले होते. त्यामध्ये श्री गणेशमूर्तींचे विघटन करण्यात आले होते. मागील वर्षी आमोनियम-बाय-कार्बोनेट केवळ ५ टन आणल्याने श्री गणेशमूर्ती पूर्णत: विघटीत झाल्या नाहीत. यामुळे वाईकरांच्या भावना दु:खावल्या गेल्या हे प्रशासनाने मान्य केले; मात्र या वर्षी १५ टन आमोनियम-बाय-कार्बोनेट मागवले असल्याने मागील वर्षीप्रमाणे होणार नाही. सध्या पर्जन्यमान चांगले नाही. धरणांमध्ये मर्यादीत पाणीसाठा असल्याने नदीला पाणी सोडणे प्रशासनाला शक्य नाही, असे सौ. अस्मिता मोरे यांनी स्पष्ट केले. जिल्हा पोलीसप्रमुख श्री. संदीप पाटील यांनी प्रत्येक वेळी आमचे सण आले की आमच्यावर अन्याय होतो, असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक चांगल्या गोष्टीचा प्रारंभ आमच्यापासूनच का नको ? असे सांगितले. (धर्मशास्त्रानुसार सण साजरा व्हावा, अशी हिंदूंनी अपेक्षा व्यक्त केली की, प्रशासन आणि पोलीस पाठिंबा आणि तशा सुविधा का देत नाहीत ? साहजिकच हिंदूंना अन्याय होतो, असे वाटल्यास नवल ते काय ! – संपादक)
गणेशोत्सवाच्या कालावधीत २ सप्टेंबर या दिवशी बकरी ईद येत आहे. वाई नगरपालिकेतील मुसलमान नगरसेवक इनामदार यांनी शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाला सांगितले की, वाईतील मुसलमान बांधव पारंपरिक पद्धतीनुसारच बकरी ईद साजरी करणार आहेत. प्रशासनाने हिंदूंनाही त्यांच्या पारंपरिक पद्धतीनुसारच गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती द्यावी.
शांतता समितीचे सदस्य, नगरसेवक, वाई येथील प्रतिष्ठीत नागरीक, पुरोगामी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
श्री गणेशमूर्ती दान करणे हे
आध्यात्मिकदृष्ट्या अशास्त्रीयच ! – सौ. स्मिता भोज, सनातन संस्था
वाई पालिका प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणार्या श्री गणेशमूर्ती दान आणि कृत्रिम तलाव या संकल्पना आध्यात्मिकदृष्ट्या अशास्त्रीयच आहेत. याविषयी सनातन संस्था अनेक वर्षे प्रबोधन करत आहे; मात्र याही पुढे जाऊन वाई पालिका प्रशासनाने आमोनियम-बाय-कार्बोनेटमध्ये मूर्ती विघटनाचा घेतलेला निर्णय चुकीचाच म्हणावा लागेल. पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दु:खावल्या गेल्या आहेत.
सोडियम-बाय-कार्बोनेटमुळे प्रदूषण होत नाही,
हे प्रशासनाने सप्रमाण सिद्ध करावे ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती
पर्यावरणीय अभ्यास करणार्या संस्थांनी गपणती विसर्जनामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, असा दाखला दिला आहे. त्यातील रासायनिक रंगांमुळे प्रदूषण होते. पालिकेने याविषयी समाज, मूर्ती विक्रेते, कुंभार आदींचे प्रबोधन करावे. तसेच सोडियम-बाय-कार्बोनेटमुळे प्रदूषण होत नाही, हे प्रशासनाने सप्रमाण सिद्ध करावे, असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले.
क्षणचित्रे
१. शांतता समितीची बैठक सायंकाळी ४ वाजता आयोजित केली होती; मात्र केवळ जिल्हा पोलीस अधीक्षक आले नाहीत म्हणून सायंकाळी ४ वाजताची बैठक सायंकाळी ६ वाजता चालू केली.
२. बैठकीला अंनिसचा एक कार्यकर्ता उपस्थित होता. व्यासपिठावरील मान्यवरांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काही सूत्रे मांडली की, या कार्यकर्त्याकडून हात उंचावणे, विजयाचा आंगठा दाखवणे, असे प्रकार होत होते. यामुळे व्यासपिठावरील मान्यवरांचे लक्ष विचलीत होत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात