सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन वास्तूंचे, तसेच संतांच्या मंदिरांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
श्री गणेश क्षेत्रांपैकी अतीप्राचीन असलेल्या विदर्भातील अदोष क्षेत्री साक्षात् श्रीवामनावताराने उपासना केली. अशा या परमपवित्र ठिकाणी वामनाने स्थापित केलेल्या (१) शमी विघ्नेश्वराची विलोभनीय मूर्ती आणि (२) श्री गणपति मंदिर
नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात अदासा नामक ऐतिहासिक गांव वसलेले आहे. वामनक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या या क्षेत्राला अदोष क्षेत्र म्हणूनही ओळखले जायचे. अदोष क्षेत्र अर्थात् ज्या क्षेत्री जाऊन आपण सर्व दोषांपासून मुक्त होऊन जाऊ, अशी १ सहस्र वर्षांपेक्षाही अधिक काळापासून हिंदूंची श्रद्धा आहे. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन अदासा या नावाने हे क्षेत्र प्रसिद्धीस पावले. अदासा येथील गणेश मंदिर हे शमी विघ्नेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. येथील श्री गणेशमूर्ती ही स्वयंभू असून तिची उंची १२ फूट, तर रुंदी ७ फूट आहे. हे मंदिर १ सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन असून विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे.
या मंदिराचे ऐतिहासिक नि आध्यत्मिक माहात्म्य आता पाहूया. बळीराजाने १०० यज्ञांचा संकल्प करून इंद्रपद प्राप्त होईल, एवढे सत्कार्य केले. अढळ भक्तीच्या बळावर त्याने प्रचंड सामर्थ्य धारण केले. त्याने आयोजिलेल्या यज्ञाचा विध्वंस करण्यास वामनरूपाने अवतीर्ण झालेल्या श्रीविष्णूंनी शक्ती प्राप्त करण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील अदोषक्षेत्री शमी विघ्नेशाची आराधना केली. पुढे त्यांच्या कृपेनेच वामनाने बलीयज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगान्वये सदरक्षेत्री वामनाने शमी विघ्नेश वक्रतुंड नावाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केली.
हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंडाचे क्षेत्र म्हणून पुराणात प्रसिद्ध आहे. हे देवस्थान अतिशय जागृत असल्याचे मानले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात