साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी त्यांना नामजप, मुद्रा, न्यास शोधून देणे अशा स्वरूपाची सेवा पू. मुकुल गाडगीळकाका करतात.
पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांची शिकवण
इच्छा दाबून ठेवू नका, तर इच्छेचा त्याग करा !
‘एका साधिकेने मला विचारले, ‘‘एखादी कृती मला करावीशी वाटते; पण ‘ती साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे’, असे जेव्हा मला कळते, तेव्हा मी ती इच्छा दाबायचा प्रयत्न करते. त्या वेळी माझा संघर्ष होतो. तेव्हा काय करायचे ?’’ मी तिला म्हटले, ‘‘इच्छा दाबायची नाही, तर त्या इच्छेचा त्याग करायचा.’’ तेव्हा तिने मला विचारले, ‘‘इच्छा दाबणे आणि तिचा त्याग करणे, यांत काय भेद आहे ?’’
मी तिला पुढीलप्रमाणे उत्तर दिले.
जेव्हा आपण आपली एखादी इच्छा दाबतो, तेव्हा ती इच्छा मनातून पूर्णपणे गेलेली नसते. त्यामुळे ती पुन्हा केव्हाही उफाळून वर येऊ शकते. चेंडू जेवढ्या जोरात आपण भूमीवर आपटतो, तेवढ्याच वेगाने तो वर उसळतो, तसेच आपण दाबलेली इच्छा पुन्हा वर येते; कारण मन ती इच्छा न स्वीकारता तिला प्रतिकार करते.
याउलट आपली इच्छा न दाबता तिचा त्याग करणे, म्हणजे मनाला ‘ती कृती का करायची नाही’, हे साधनेच्या दृष्टीने समजावून देऊन त्याला ती इच्छा त्यागायला प्रवृत्त करणे. त्या वेळी मनाला आपण सांगितलेले कारण पटते आणि ते योग्य कृती करणे स्वीकारते. आपले मन हे लहान मुलासारखे संस्कारजन्य आहे. त्याच्यावर आपल्यालाच चांगले संस्कार करावे लागतात. एखादे वेळी असेही होईल की, प्रथम सांगितल्यावर मन ते स्वीकारणार नाही, तरीही निराश न होता मनाला पुनःपुन्हा सांगत रहावे. आपले मूल एकदा सांगून ऐकत नाही. तेव्हा त्यालाही परत परत सांगावे लागते. तसेच हे आहे. नुसते ओरडून सांगून मूल ऐकत नाही. त्याला दृष्टीकोन देऊन नीट समजावून सांगितले, तर ते ऐकते. त्याप्रमाणेच आपली इच्छा दाबू नका, तर तिचा त्याग करण्यासाठी मनाला प्रवृत्त करा !’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. निरागस आणि निर्मळ पू.गाडगीळकाका
‘पू. गाडगीळकाका निरागस आणि निर्मळ आहेत. ते सर्वांमध्ये सहजतेने मिसळतात. पू. काका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंदी करतात.’
– कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. अभ्यासू वृत्ती आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ
२ अ. धारिकेत झालेल्या चुका लिहून घेणे आणि ‘त्या पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्यांचा अभ्यास करणे
‘एकदा पू. काका संगणकावर धारिका वाचत होते. त्या वेळी आम्ही पू. काकांना विचारले, ‘‘तुमच्या धारिका तुम्ही पुन्हा का वाचत आहात ?’’ तेव्हा पू. काका म्हणाले, ‘‘त्या अंतिम पडताळून आल्या आहेत. मी त्यातील माझ्या शुद्धलेखनाच्या चुका पाहून त्यांचा अभ्यास करत आहे. त्या चुका मी लिहून घेत आहे, जेणेकरून त्या चुका पुन्हा होणार नाहीत.’’ यातून पू. काकांची शिकण्याची आणि अभ्यासू वृत्ती लक्षात आली.
२ आ. प्रत्येक कृती करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदर्श समोर ठेवणे
एकदा आम्ही पू. काकांना विचारले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना अचूक शद्धलेखन कसे येते ?’’ त्या वेळी आम्हाला वाटले, ‘पू. काका म्हणतील, ‘ते देव आहेत. त्यामुळे त्यांना सर्वच येते.’ पू. काका म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनीही शद्धलेखनाचा अभ्यास केला आहे. त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे. त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांनी ही सर्व प्रक्रिया समष्टीला शिकण्यासाठी केली आहे.’’ पू. काकांनी ‘परात्पर गुरु डॉक्टर देव आहेत’, असे उत्तर दिले नाही, तर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्यक्षात कृतीच्या स्तरावर (ते साक्षात् भगवान विष्णूचा अवतार असूनही) कसे प्रयत्न केले ?’, हे सांगितले. यातून ‘पू. काका प्रत्येक कृती परात्पर गुरु डॉक्टरांचा आदर्श समोर ठेवून करत आहेत’, हे आमच्या लक्षात आले.’
– कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. प्रेमभाव
अ. ‘त्रास होत असल्यास साधक पू. काकांना नामजप विचारायला येतात. तेव्हा पू. काका त्यांना ‘प्रसाद किंवा महाप्रसाद ग्रहण केला कि नाही ?’, असे विचारतात. साधकांनी काही खाल्ले नसल्यास त्यांना स्वयंपाकघरातील खाऊ आणून देतात आणि त्यांच्याकडील खाऊही देतात.
आ. एखाद्या साधकाने पू. काकांना खाऊ दिल्यास तोे मला आणि माधवीला दिल्याविना ते कधीच खात नाहीत.
इ. पू. काकांना कितीही तातडीची सेवा असली, तरी ते इतरांसाठी नामजप शोधून देतात. साधकांचा नामजप होत नसल्यास ते साधकांना स्वतःच्या खोलीत बसवून त्यांच्याकडून नामजप करवून घेऊन मगच त्यांना सेवेला पाठवतात. काही वेळा साधक त्रास होत असल्याने पू. काकांकडे रडत येतात; मात्र पू. काकांच्या सहवासात राहिल्याने त्यांचा त्रास दूर होऊन ते खोलीतून हसत बाहेर पडतात.
ई. एकदा एक साधक पू. काकांकडे येऊन म्हणाला, ‘‘मला पुष्कळ त्रास होत आहे. मला झोपायचे आहे; पण झोपायला जागा मिळत नाही. मी काय करू ?’’ पू. काकांनी त्याला नामजप शोधून दिला. त्यांनी त्याला त्यांच्या खोलीत अंथरूण घालून देऊन ‘येथेच झोप. तुला बरे वाटेल’, असे सांगितले. त्या साधकाला झोपल्यावर बरे वाटले. त्यानंतर तो आनंदाने सेवा करू लागला.
उ. आम्ही कधी घरी जात असलो, तर पू. काका नेहमी सांगतात, ‘‘घरी तुम्हाला नकारात्मक विचार येऊन साधना किंवा नामजप होत नाही’, असे वाटल्यास मला आवर्जून भ्रमणभाष करा.’’
– कु. सोनाली खटावकर
४. साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर व्हावा, याची तळमळ
४ अ. प्रसाद किंवा महाप्रसाद ग्रहण करतांना
साधक नामजप विचारण्यासाठी आल्यास जेवणातून मध्येच उठून नामजप शोधणे
‘साधक पू. काकांकडे हक्काने नामजप (आध्यात्मिक उपाय) विचारायला येतात. पू. काकांना नामजप विचारण्यास साधकांना कधीच संकोच वाटत नाही. काका प्रसाद किंवा महाप्रसाद ग्रहण करत असतांना साधक नामजप विचारण्यासाठी आल्यास ते जेवणाचे ताट तसेच ठेवून त्याच्यासाठी नामजप शोधतात. त्या वेळी त्यांना ‘महाप्रसाद किंवा चहा थंड होत आहे’, असे सांगितल्यास ते म्हणतात, ‘‘तो साधक त्रस्त झाला आहे. त्याला आधी बरे करूया. मी नंतर महाप्रसाद ग्रहण करीन.’’ त्या साधकाला बरे वाटेपर्यंत ते त्याच्यासाठी नामजप (उपाय) करतात आणि त्याला आनंदी करतात.
४ आ. मध्यरात्री झोपेतून उठूनही साधकांसाठी नामजप करणे
साधकांना त्रास होत असल्यास ते रात्री २ – ३ वाजताही पू. काकांना झोपेतून उठवून नामजपाविषयी (आध्यात्मिक उपायांविषयी) विचारतात. त्या वेळी पू. काकाही झोपेतून उठून साधकांना लगेच नामजप शोधून देतात. काही वेळा साधकांना तीव्र त्रास होत असल्यास पू. काका मध्यरात्री उठून त्या साधकांसाठी नामजप करतात.
४ इ. साधकांवरचे आवरण हाताने काढल्याने
हात दुखत असतांनाही हाताने इतर साधकांवरील आवरण काढणे
पू. काकांना दिवसभरात अनेक (३० ते ३५ साधक) साधक नामजप (उपाय) विचारण्यासाठी येतात. पू. काका कधीही कंटाळा करत नाहीत. काही वेळा साधकांवरचे आवरण हाताने काढल्याने पू. काकांचे हात दुखायला लागतात, तरी ते इतर साधकांवरील आवरण काढतात; पण ते तसे कधीच सांगत नाहीत. ते हे उपाय मनापासून आणि आनंदाने करतात.’
– कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर
४ ई. वेगवेगळे उपाय शोधून साधिकेवर न कंटाळता उपाय करणे
‘एके दिवशी मला दिवसभर आध्यात्मिक त्रास होत होता. त्या वेळी पू. काकांनी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे उपाय शोधून ते माझ्यासाठी नामजप करत होते. शेवटी मलाच कंटाळा आला. पू. काकांनी कंटाळा न करता माझ्यावर बराच वेळ मनापासून उपाय केले.
५. साधकांना घडवणे
अ. पू. काका प्रतिदिन आम्हाला ‘नामजप आणि सेवा किती केली ?’, हे विचारतात. ‘मी आणि माधवी साधनेत कुठे अल्प पडतो ?’, याविषयीही ते मार्गदर्शन करतात.
आ. भावसत्संग झाल्यानंतर ते आम्हाला (मला, तसेच माधवी आणि त्यांची कन्या (सौ.) सायली यांना) ‘तुम्ही आज काय शिकलात ? ते कृतीत आणण्यासाठी काय प्रयत्न केले ?’, असे विचारतात.
इ. पू. काका साधकांच्या चुका लक्षात आल्यास तत्त्वनिष्ठतेने चुका सांगून त्यात सुधारणा होईपर्यंत साधकांना साहाय्य करतात.’
– कु. सोनाली खटावकर
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक !
‘साधकांना त्रास होत असल्यास परात्पर गुरु डॉ. आठवले विश्वासाने नामजप (उपाय) विचारून घेण्यासाठी पू. काकांकडे पाठवतात. परात्पर गुरु डॉक्टर पू. काकांना म्हणतात, ‘‘आध्यात्मिक त्रास असणारे साधक तुम्ही शोधून काढत असलेल्या नामजपामुळे (उपायांमुळे) आनंदी आहेत.’’
– कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर
७. अनुभूती
७ अ. ध्यान लागणे
‘पू. काका नामजप करत असतांना मी नामजप केल्यास माझे चांगले ध्यान लागते.
७ आ. पांढरा प्रकाश दिसणे
एके दिवशी पू. काका नामजप करतांना मला पू. काकांच्या ठिकाणी पांढरा प्रकाश दिसला. ‘ते माझ्या एकेका पूर्वजाला गती देत आहेत’, असे मला जाणवले.’
– कु. सोनाली खटावकर
७ इ. पू. काकांच्या पायांना मानसरित्या तेल लावण्याची सेवा केल्यावर आलेली अनुभूती
७ इ १. पू. काकांच्या पायांना तेल लावण्याची सेवा करू शकत नसल्याने त्यांच्या पायांना मानसरित्या तेल लावणे
मी पू. गाडगीळकाकांच्या पायांना तेल लावण्याची सेवा करू शकत नव्हते. मी रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करून पू. काकांच्या पायांना मानसरित्या तेल लावले. त्यानंतर मला झोप लागली. पहाटे उठल्यावर पू. काकांच्या पायांना मानसरित्या तेल लावल्याचे मी विसरूनही गेले होते.
७ इ २. सेवेसाठी पू. काकांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी ‘रात्री चांगली झोप लागली आणि पायांना हलकेपणा जाणवत आहे’, असे सांगणे
नंतर मी एका सेवेसाठी पू. काकांच्या खोलीत गेले. त्या वेळी पू. काका झोपले होते. ते नेहमीपेक्षा विलंबाने उठले; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘पू. काका, आज बरे वाटत नाही का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘काल मला चांगली झोप लागल्याने आता चांगले वाटत आहे. आता माझे पाय दुखत नाहीत. मला हलके वाटत आहे.’’ त्या वेळी मला देवाने माझ्याकडून करवून घेतलेल्या सेवेची आठवण झाली. मी पू. काकांना रात्री मानसरित्या त्यांच्या पायाला तेल लावल्याचे सांगितल्यावर पू. काका म्हणाले, ‘‘म्हणूनच पायांना हलकेपणा जाणवत आहे. मला चांगले वाटत आहे. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, हे देवानेच ही अनुभूती देऊन आपल्याला शिकवले.’’
७ ई. पू. काकांच्या खोलीतील चैतन्यामुळे तेथे दुपारी झोपल्यावर वेगळे औषधोपचार न करताही झोप लागणे
मला काही दिवसांपूर्वी आध्यात्मिक त्रासामुळे रात्री झोप लागत नव्हती. त्यामुळे दिवसाही मला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊन माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली होती. मला औषधोपचार करूनही झोप येत नसे. आध्यात्मिक उपाय करूनही माझा त्रास न्यून होत नव्हता.पू. काका दुपारी अन्यत्र सेवा करण्यासाठी जातांना त्यांनी मला त्यांच्या खोलीत विश्रांती घ्यायला सांगितले. काही दिवस मी तेथे दुपारी विश्रांती घेतल्यावर त्यांच्या खोलीतील चैतन्यामुळे मला रात्री औषधोपचार न करताही झोप येऊ लागली. मला ३ – ४ दिवसांनी जाणवले, ‘रात्री झोप लागते आणि आध्यात्मिक त्रासही होत नाही. त्यामुळे दिवसभर माझे मन उत्साही, प्रसन्न आणि सकारात्मक राहू लागले.’
– कु. माधवी पोतदार
‘देवा, तुझ्या कृपेने हे आम्हाला शिकायला आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. आम्हाला चैतन्याचा लाभ करून घेण्याची अमूल्य संधी दिल्याबद्दल आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञ आहोत. ‘भगवंता, तुला अपेक्षित असे प्रयत्न आमच्याकडून करवून घे’, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर
८. ‘थकवा येणे, चक्कर येणे आणि अनावर ग्लानी येणे’, हे त्रास होत असणे
आणि त्यामुळे उपाय विचारायला पू. डॉ. मुकुल गाडगीळकाकांकडे जायचे ठरवणे
‘२.८.२०१७ या दिवशी मला ‘थकवा येणे, चक्कर येणे आणि अनावर ग्लानी येणे’, हे त्रास होत होते. उपायांना बसल्यावर जवळपास २ घंटे मला अनावर ग्लानी येऊन मधे मधे झोपही येत होती. या कालावधीत मला माझ्या हाताची बोटेही हलवणे शक्य होत नव्हते. ‘अशा स्थितीत उपाय होणार नाहीत’, असा विचार करून मी विश्रांती घेण्याचा विचार केला. ध्यानमंदिराबाहेर पडल्यावर माझी प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली. मला चालतांना आधार घेऊन चालावे लागत होते. विश्रांती घेऊ लागल्यावर माझे शरीर पुष्कळ जड होऊन ‘जणू कोणीतरी भूमीला चिकटवून ठेवले आहे’, असे मला जाणवत होते. मला हलणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे मला झोप लागली नाही. ग्लानीमुळे माझे डोके आणि डोळे दुखत होते. माझ्या मनात अनेक अनावश्यक विचार येऊ लागले. दीड घंटा तशाच स्थितीत विश्रांती घेतल्यावर मला थोडे बरे वाटू लागले; पण तरीही त्रास होत असल्याने मी अध्यात्मिक उपाय विचारायला पू. (डॉ.) मुकुल गाडगीळकाकांकडे जायचे ठरवले.
९. पू. गाडगीळकाकांकडून उपाय शोधण्याची प्रक्रिया
बारकाव्यांसहित शिकायला मिळणे अन् त्यांचे पितृवत प्रेमही अनुभवायला मिळणे
उपाय विचारण्यासाठी पू. गाडगीळकाकांच्या खोलीच्या दिशेने जात असतांना माझ्या मनात सहज विचार आला, ‘आज बहुतेक पू. काका आधी मलाच उपाय शोधायला लावतील आणि मगच स्वतः उपाय शोधून देतील.’ हा विचार प्रकर्षाने मनात आला. पू. काकांच्या खोलीत गेल्यावर खरोखरच या वेळी पू. काकांनी मलाच आधी उपाय शोधायला सांगितले आणि ‘काय जाणवते ?’, असा अभ्यास माझ्याकडून करवून घेतला. या वेळी मला पू. काकांकडून उपाय शोधण्याची प्रक्रिया बारकाव्यांसहित शिकायला मिळाली आणि त्यांचे पितृवत प्रेमही अनुभवायला मिळाले. पू. काकांमुळे माझ्यावर उपाय झाले आणि माझा त्रासही उणावला. मला हलके वाटू लागले. हे लिखाण मी कृतज्ञतेच्या रूपात त्यांच्या चरणी अर्पण करते.
१०. पू. गाडगीळकाकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१० अ. आपल्या त्रासाशी लढतांना
क्षात्रवृत्तीने लढण्याबरोबरच भावपूर्ण प्रार्थना करणेही महत्त्वाचे !
आपल्या त्रासाशी लढतांना क्षात्रवृत्ती असण्याबरोबरच भावपूर्ण प्रार्थना करणेही पुष्कळ महत्त्वाचे आहे. आवरण काढण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी, ‘देवा, माझावर आलेले आवरण नष्ट होऊ दे आणि तुझ्या चैतन्याचे कवच माझ्याभोवती निर्माण होऊ दे. ‘हे हात तुझेच असून तूच माझे आवरण काढत आहेस’, असा माझा भाव असू दे’ आणि नामजप करत आवरण काढावे. मी प्रार्थना न करताच आज्ञाचक्रावरील आवरण काढू लागले. तेव्हा लगेच माझ्या पोटात तीव्रतेने वेदना होण्यास आरंभ झाला (वाईट शक्तींना मला त्रास देता आला). मला पू. काकांनी प्रार्थनेची जाणीव करून दिल्यावर त्याप्रमाणे प्रथम प्रार्थना करून मग आवरण काढतांना मला पोटात वेदना झाल्या नाहीत.
१० आ. आज्ञाचक्रावर आवरण असल्यास आणि
अनाहत किंवा मणिपुर चक्राशी संबंधित त्रासही होत असल्यास प्रथम आज्ञाचक्रावरचे आवरण काढावे.
वाईट शक्ती पुष्कळ वेळा प्रथम आज्ञाचक्रावर आक्रमण करून तेथे त्यांचे केंद्र निर्माण करतात आणि मग तेथून अनाहत अन् मणिपुर चक्रांवर आघात करून साधकाला त्या चक्रांशी संबंधित शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा तशी त्रासांची लक्षणे जाणवतील, तेव्हा प्रथम आज्ञाचक्रावरचे आवरण काढावे. आज्ञाचक्रावर आलेले आवरण पुष्कळ वेळा संपूर्ण डोक्याभोवती, तसेच डोक्यावरही पसरलेले असल्याने कपाळावरील, डोक्याच्या मागील भागाकडील, दोन्ही कानांकडील आणि डोक्यावरील असे सर्व बाजूंनी असलेले आवरण काढावे.
१० इ. आवरण काढून झाल्यावर ‘प्राणशक्तीवहन उपाय’
पद्धतीने उपाय शोधणे’, ही करायची प्रक्रियाही एक प्रकारे उपायच असणे
आवरण काढून झाल्यावर ‘प्राणशक्तीवहन उपाय’पद्धतीने उपाय शोधून त्याप्रमाणे उपाय करावेत. उपाय शोधणे ही प्रक्रियाही एक प्रकारे उपायच आहेत; कारण तेव्हा आपल्या बोटांतून प्रक्षेपित होत असलेल्या प्राणशक्तीचा आपल्यावर उपाय होऊन चक्रांवरील आवरण थोड्या प्रमाणात दूर होते, तसेच ज्या चक्रांवर त्रासदायक स्पंदने नसतील, त्यांना प्राणशक्ती मिळून आपल्याला उत्साह वाटू लागतो.
१० इ १. ‘प्राणशक्तीवहन उपाय’पद्धतीने उपाय शोधता येत नसलेल्यांनी त्रास होत असतांना या पद्धतीने उपाय शोधण्याचा सराव केल्यामुळे सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढून त्यांना स्वावलंबी होता येते.
१० इ २. पू. काकांनी ‘प्राणशक्तीवहन उपाय’पद्धतीने उपाय शोधतांना झालेले उपाय
माझ्यासाठी पू. काकांनी उपाय शोधतांना त्यांच्या हाताची बोटे त्यांचे स्वाधिष्ठानचक्र ते सहस्रारचक्र आणि पुन्हा सहस्रारचक्र ते स्वाधिष्ठानचक्र अशी फिरवली आणि ही क्रिया त्यांनी ५ – ६ वेळा केली. तेव्हा माझ्यावर पुढीलप्रमाणे उपाय झाले.
अ. पहिल्यांदा माझ्या अनाहतचक्रावरचे जडत्व न्यून (कमी) झाले.
आ. मला माझ्या आज्ञाचक्रावर थोडासा दाब जाणवत होता आणि मणिपुरचक्राच्या ठिकाणी थोड्या वेदना होत होत्या.
इ. आधी विशुद्धचक्रावर दाब जाणवत नव्हता; पण आता जाणवू लागला. मणिपुरचक्राच्या ठिकाणी होत असलेल्या वेदना मात्र थांबल्या.
ई. विशुद्धचक्रावरील दाब थोडासा न्यून झाला.
उ. शेवटी विशुद्धचक्र आणि आज्ञाचक्र ही न्यासस्थाने आली.
या त्रासाच्या वेळी मणिपुर आणि अनाहत चक्र यांवर अल्प प्रमाणात आवरण असल्याने त्या स्थानांवरील त्रास उपाय शोधतांनाच दूर झाला.
या सर्व कृती पू. काकांनी माझाकडून स्वतः करवून घेतल्या आणि मला आवरण काढायला अन् ‘प्राणशक्तीवहन उपाय’पद्धतीने उपाय शोधायला शिकवले. त्रास होत असतांना वरीलप्रमाणे उपाय केल्यास अल्पावधीत प्रभावी उपाय होतात, असे माझ्या लक्षात आले.
१० ई. कृतज्ञता व्यक्त करणे
शेवटी देवाला कृतज्ञता व्यक्त करावी – ‘देवा, तुझ्यामुळेच मी हे उपाय शोधू शकलो आणि करू शकलो’. या सर्व प्रक्रियेत कर्तेपणा कुठेच येता कामा नये.’
– कु. शिवांजली होसाहोळलू (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.