अमरावती येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत धर्मप्रेमींचा निर्धार !
अमरावती : येथे १२ आणि १३ ऑगस्ट अशी दोन दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली. उत्तम संघटक बनण्यासाठी साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रकियाही राबवणार, असा निर्धार येथे करण्यात आला. या कार्यशाळेला अमरावती आणि यवतमाळ येथील धर्मप्रेमी उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये गुरुकृपायोगानुसार साधना, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, सुराज्य अभियान कसे राबवावे, उत्तम वक्ता कसे बनावे, समाजात हिंदूसंघटक म्हणून कार्य करतांना असलेले ईश्वरी अधिष्ठानाचे महत्त्व, वाईट शक्तीच्या निवारणार्थ करावयाचे उपाय यांविषयी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर चर्चा करण्यात आली.
सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, अमरावती समिती समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याकडून प्रायोगिक भाग करवून घेतला.
समारोपीय सत्रामध्ये धर्मप्रेमींनी कार्यशाळेत शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभव सांगितले. वन्दे मातरम् म्हणून कार्यशाळेची सांगता करण्यात आली. अंबा मंगलम सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिल्याविषयी श्री. गणेश बहाळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
क्षणचित्रे
१. धर्मप्रेमी श्री. मनोज विश्वकर्मा यांना कार्यशाळेसाठी यायचे होते; पण मालकाने सुट्टी नाकारली. असे असतांनाही त्यांनी धर्मकार्यासाठी जाणार असल्याचे ठामपणे सांगितल्यावर मालकाने सुट्टी दिली.
२. कार्यशाळेची सिद्धता आणि नंतर आवरण्यासाठीही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. अमित काळे : समितीच्या कार्यक्रमात आल्यावर रामराज्याची प्रचीती आली.
२. श्री. अभिषेक दीक्षित : या कार्यशाळेतून हिंदु राष्ट्र येणारच, याची निश्चिती झाली.
३. श्री. संदीप राजगुरे : मी आतापर्यंत हिंदुत्वाचे पुष्कळ कार्य केले; परंतु मी प्रामाणिक कार्य करणार्याच्या शोधात होतो. कार्यशाळेत आल्यावर माझा इतक्या वर्षांचा शोध संपला. मी यापुढे समितीसमवेतच कार्य करीन.
४. श्री. संदीप राठोड : दोष आणि अहं यांमुळे होणारी हानी याविषयी कार्यशाळेतून शिकायला मिळाले.
५. कु. अंकिता ठाकरे : हिंदूसंघटक म्हणून कार्य करतांना कायद्याच्या अभ्यासाविषयी समजले आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली.