सर्वाधिक सात्त्विक असलेली देवनागरी लिपी आणि संस्कृत साहित्य हा परात्पर गुरु डॉ. आठवले अणि कु. प्रियांका लोटलीकर यांनी लिहिलेला शोधनिबंध आधुनिकसन्दर्भे संस्कृतशोधपरम्परा म्हणजे आधुनिक संदर्भात संस्कृत संशोधन परंपरा या विषयावरील देहली येथील राष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने १०.८.२०१६ या दिवशी सौ. संदीप मुंजाल यांनी तो सादर केला. या शोधनिबंधाचा सारांश महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे http://www.spiritual.university/wp-content/uploads/sites/21/2017/03/Abstract-Subtle-effect-of-Sanskrit-text-and-script-compared-to-other-languages.pdf
या मार्गिकेची goo.gl/ydgThQ ही शॉर्ट लिंक आहे. (या लिंकमधील काही अक्षरे (लेटर्स) कॅपिटल असल्याची वाचकांनी नोंद घ्यावी.)
या शोधनिबंधाचा सारांश पुढे दिला आहे.
प्रत्येक आध्यात्मिक कार्यासाठी सकारात्मक स्पंदने निर्माण करता येणे, ही मूलभूत आवश्यकता असते. मूलतः संस्कृत भाषेत लिहिलेले प्राचीन भारतीय धर्मग्रंथ अमूल्य आध्यात्मिक ज्ञानाचा ठेवा आहेत. त्यांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.
१. पिप या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या
भाषांतील मजकुराभोवती असलेल्या स्पंदनांच्या प्रभावळीची तुलना करून केलेले संशोधन
आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाता मूळ धर्मग्रंथातील आध्यात्मिक सकारात्मकता अनुवादित ग्रंथात अबाधित रहाते, त्यात वृद्धी होते कि घट होते ?, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने संशोधन केले आहे. यात अनुवादाची दृश्य, श्राव्य आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आध्यात्मिक स्तरावर तुलना केली आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सूक्ष्म ज्ञानाच्या आधारे केलेल्या आध्यात्मिक संशोधनाच्या व्यतिरिक्त संस्कृत भाषेवर विविध प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्रांच्या आधारेही विस्तृत संशोधन करण्यात आले आहे. या शोधनिबंधात प्रामुख्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष मांडले आहेत. हे यंत्र प्रसिद्ध किर्लियन फोटोग्राफीवर आधारित आहे आणि याद्वारे आपण एखाद्या घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) सामान्यतः डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. यासंदर्भात आम्ही पुढील दोन प्रयोग केले.
अ. एखाद्या व्यक्तीने नामजप करण्यापूर्वी, ती नामजप करत असतांना आणि नामजपानंतर तिच्याभोवती असलेली स्पंदने पिप यंत्राच्या आधारे मोजली.
आ. संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील लिखाणाभोवती असलेल्या सकारात्मक अन् नकारात्मक स्पंदनांच्या प्रभावळीची पिप यंत्राच्या आधारे तुलना केली.
२. पिप या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या चाचणीचे निष्कर्ष
२ अ. देवनागरी लिपीतील भाषांमधील श्लोकाच्या अनुवादाभोवतीची
प्रभावळ इंग्रजी अनुवादाच्या तुलनेत साधारण ७० टक्के अधिक सकारात्मक
असणे आणि संस्कृतमधील श्लोकाची प्रभावळ सर्वाधिक सकारात्मक असणे
प्रथम आम्ही अन्य ३ भाषांमध्ये अनुवादित संस्कृत भाषेतील श्रीमद्भगवद्गीतेमधील एका श्लोकाच्या स्पंदनांमध्ये काही फरक असतो का ?, याची चाचणी घेतली. देवनागरी लिपीतील भाषांमधील श्लोकाच्या अनुवादाभोवतीची प्रभावळ इंग्रजी अनुवादाच्या तुलनेत साधारण ७० टक्के अधिक सकारात्मक होती, तर संस्कृतमधील श्लोकाची प्रभावळ सर्वाधिक सकारात्मक होती, हे या चाचणीच्या निष्कर्षांमध्ये दिसून आले.
२ आ. देवनागरी आणि लॅटिन अक्षरे अन् अंक यांची पिप चाचणी घेतली असता
देवनागरी अक्षरे, तसेच अंक यांच्या प्रभावळीची स्पंदने अधिक सकारात्मक असल्याचे आढळणे
त्याच उच्चाराच्या देवनागरी आणि लॅटिन अक्षरांची पिप चाचणी घेतली असता देवनागरी अक्षराच्या प्रभावळीची स्पंदने १७८ टक्के अधिक सकारात्मक होती. अशाच प्रकारचे निष्कर्ष देवनागरी आणि लॅटिन अंकांच्या संदर्भातही दिसून आले. दोन्ही भाषांमध्ये २ या अंकात साधर्म्य आहे, तरीही देवनागरी लिपीतील अंकाची स्पंदने इंग्रजी अंकाच्या तुलनेत ६७ टक्के अधिक सकारात्मक होती. यावरून आकारातील किरकोळ पालटही सकारात्मकतेमध्ये वृद्धी करतो, हे लक्षात आले.
२ इ. देवनागरी लिपीतील अक्षरांच्या तुलनेत महर्षि अध्यात्म
विश्वविद्यालयाद्वारे निर्मित अक्षरे अधिक सकारात्मक असणे
पिप तंत्रज्ञानाद्वारे घेतलेल्या चाचणीत देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अक्षराच्या तुलनेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाद्वारे निर्मित तेच अक्षर २६ टक्के अधिक सकारात्मक असल्याचे आढळले.
३. ऋषिमुनींनी धर्मग्रंथांसाठी वापरलेली संस्कृत भाषा सकारात्मक स्पंदनांमध्ये आदर्श असणे
या निष्कर्षांनी हेच प्रयोग सूक्ष्म ज्ञानाद्वारे केल्यावर मिळालेल्या निष्कर्षांना दुजोरा दिला. या प्रयोगांमधून जुने ते सोने ही उक्ती सार्थ असल्याचे, तसेच आपल्या ऋषिमुनींनी धर्मग्रंथांसाठी वापरलेली संस्कृत भाषा सकारात्मक स्पंदनांमध्ये आदर्श असल्याचे स्पष्ट झाले.
४. जगातील अग्रगण्य भाषेचा दर्जा संस्कृत
भाषेला पुन्हा प्राप्त व्हावा, यासाठी हे प्रयोग प्रभावी असणे
प्रगती आणि विकास हे मानवी प्रयत्नांचे केंद्रबिंदू आहेत. हे तत्त्व आजच्या ६ सहस्रहून अधिक भाषांनाही लागू आहे. संस्कृत भाषेची अन्य प्रमुख भाषा आणि लिपी यांच्याशी तुलना करण्यासाठी अजून पुष्कळ प्रयोग केले जाऊ शकतात; परंतु उपरोल्लेखित प्रयोग मानवजातीला संपर्क माध्यमांचा अभ्यास करण्यासाठी दिशादर्शक आहेत. सकारात्मक स्पंदने ही मूलभूत आवश्यकता असलेल्या अध्यात्मक्षेत्रात तर आणखीन महत्त्वाची आहेत. जगातील अग्रगण्य भाषेचा दर्जा संस्कृत भाषेला पुन्हा प्राप्त व्हावा आणि ती प्रत्येक शाळा अन् विश्वविद्यालय यांतील अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक बनावी, यासाठी या प्रयोगांतून प्रभावी कारणे प्राप्त होतात.
– शोधनिबंधकर्ते परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
ई-मेल : [email protected]