

म्हसवड (जिल्हा सातारा) : येथे ३० जुलै या दिवशी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी वस्तूंची खरेदी आणि विक्री करू नये, यासाठी भव्य जनजागृती फेरी काढली. यात मोठ्या संख्येने महिला आणि युवा वर्ग सहभागी झाला होता. फेरीनंतर अनेक व्यापार्यांनी घरातील चिनी वस्तूंची होळी केली, तसेच यापुढे कोणीही चिनी वस्तू खरेदी करणार नाही, अशी शपथ घेतली. या वेळी भारत माता की जय, वन्दे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी येथील नगरसेवक श्री. गणेश रसाळ, आप्पासाहेब पुकळे, प्राचार्य विश्वंभर बाबर, सनातन संस्थेच्या सौ. सुनीता दीक्षित तसेच डॉक्टर, व्यापारी, सराफ संघटना, सिद्धनाथ अॅकॅडमी, तरुण विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. २५ जुलै या दिवशी प्राचार्य श्री. विश्वंभर बाबर, नगराध्यक्ष तुषार विरकर, नगरसेवक गणेश रसाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, आप्पासाहेब पुकळे यांनी पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना यासंदर्भात निवेदन दिले.
आग्रा येथे अमरनाथ यात्रेकरूंवरील
आक्रमणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आग्रा : अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमण आणि चीनकडून सिक्कीम येथील नाथू-ला जवळील कैलास मानसरोवर बंद करणे, या घटनांच्या विरोेधात येथील भगवान टॉकीज पुलाच्या खाली हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सनातन संस्था, हिंदु सेना, राष्ट्रीय हिंदू जागरण मंच आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी सहभाग घेतला. हिंदूंवर अत्याचार करणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार तात्काळ बरखास्त करावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.
क्षणचित्र
आंदोलनाच्या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.