एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होऊन रडू येते. तेव्हा मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय (खर्च) होते. याचा परिणाम सेवेवर होऊन सेवेचा कालावधी अल्प होतो. २८.१.२०१७ या दिवशी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी मार्गदर्शन केले. ते सर्व साधकांना शिकायला मिळावे, यासाठी येथे लिहून देत आहे.
१. स्वतःची चूक सांगितल्यावर मन भावनाशील होणे, मन विचारांत
गुंतून राहिल्याने सेवेचा कालावधी न्यून होणे, इतर प्रसंग आठवून विचार वाढत जाणे
आणि रडू येण्याचा कालावधी वाढल्याने मनावर आवरण येऊन आध्यात्मिक त्रासात वाढ होणे
एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होते, तेव्हा मला ते साधक असे का बोलले ? नंतर वेगळ्या प्रकारे सांगू शकले असते. त्यांनी मला समजून घ्यायला हवे होते. माझी त्यात काहीच चूक नव्हती, असे विचार मनात येतात. काही वेळा एखाद्या साधकाची चूक नसतांना त्याची चूक सांगितले जाते आणि पुष्कळ वेळ रडू येते. या विचारांत मन गुंतून राहिल्याने सेवेचा कालावधी न्यून होतो. त्या समवेत इतर प्रसंगही आठवतात आणि तेही विचार वाढतात अन् रडू येण्याचा कालावधी वाढत जातो. त्यामुळे मनावर त्रासदायक आवरण येऊन आध्यात्मिक त्रासात वाढ होते. नंतर वाढलेला त्रास अल्प करण्यास पुष्कळ कालावधी लागतो.
२. मनाचा अभ्यास करतांना पुढील सूत्रांंचा विचार करावा !
अ. आपल्याला देवाने दिलेल्या कौशल्याच्या सेवेतून देव सुचवतो आणि शिकवतो; पण आपली अर्धी ऊर्जा मनाच्या द्वंद्वात वाया जाते.
आ. एखाद्या प्रसंगात मनाच्या विरुद्ध घडल्यास अथवा इतरांनी चूक सांगितली की, आपला अहं दुखावतो. त्यामुळे चूक स्वीकारता येत नाही आणि मन अस्थिर होते. मनाची संवेदनशीलता वाढल्याने भावनाशीलता वाढते.
इ. आपल्यातील अहं जागृत होतो, तेव्हा आपली बुद्धी तर्क काढते आणि चुका स्वीकारू देत नाही.
३. आध्यात्मिक स्तरावरील उपाययोजना
३ अ. मनात येत असलेले विचार लिहिणे
विचार लिहून काढल्याने ते कळतील. त्यात पूर्वग्रहाचा प्रसंग असल्यास प्रसंगापुढे त्या त्या साधकांचे गुण लिहून काढावेत. त्यामुळे पूर्वग्रहाचे विचार अल्प होण्यास साहाय्य होते.
३ आ. मन बहिर्मुख झाले असल्यास काय करावे ?
इतरांची चूक असतांना स्वतःचे मन बहिर्मुख झाले आहे, असे लक्षात आल्यास ती चूक लिहून दायित्व असणार्या साधकाला द्यावी.
३ इ. अंतर्मुख होणे
त्या प्रसंगात देवाला काय शिकवायचे आहे, याचा अभ्यास करायचा आणि शिकण्याची वृत्ती वाढवायची. त्यामुळे अंतर्मुखता येण्यास साहाय्य होते.
३ ई. चूक सांगणार्या साधकाशी बोलावे
स्वतःचे मन अंतर्मुख झाल्यावर शक्य असल्यास चूक सांगणार्या साधकाशी बोलावे.
३ उ. प्रसंग झाल्यावरही साधकांशी बोलणे सोडू नये !
प्रसंग घडल्यावर काही वेळा आपण त्या साधकाशी बोलणे सोडून देतो. तसे केल्याने साधना होत नाही आणि आपण पुढेही जाणार नाही. त्या साधकाशी बोलणे सोडायचे नाही, तर नेहमीप्रमाणे बोलत रहायचे. आपण साधनेत नसतो आणि समाजात राहून नोकरी केली असती, तर कितीतरी लोक बोलले असते. नातेवाईक, शेजारी किंवा सहकर्मचारी बोलले असते. त्यांच्या संदर्भात काही प्रसंग घडले, तरी आपण त्यांच्याशी बोलतोच. त्यांच्या घरी जातो. तसेच साधकांशीही बोलत रहायचे.
३ ऊ. सेवेचा कालावधी वाढवणे
सेवेला वेळ देऊन सेवेचा कालावधी वाढवावा.
३ ए. देवाशी बोलणे
प्रसंग घडल्यावर देवाशी बोलावे. देवाची भक्ती करावी आणि आपल्याला दिलेल्या सेवेत मन रमवावे.
३ ऐ. मनाच्या स्तरावर स्वतःचा अभ्यास करणे
मनाच्या स्तरावर स्वतःचा अभ्यास करावा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न नंतर दायित्व असलेल्या साधकाला सांगावेत.
३ ओ. दुर्लक्ष करणे
काही गोष्टी सोडून द्यायला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका.
३ औ. स्वयंसूचना देणे
१. आपल्याला कोणाची भीती वाटत असल्यास प्रथम मन खंबीर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी स्वयंसूचना घ्याव्यात. त्यामुळे प्रसंगाचा परिणाम मनावर होऊन वाईट वाटणार नाही.
२. कोणते विचार मोठ्या वाईट शक्ती घालतात, याचा अभ्यास करावा. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वयंसूचना द्यावी आणि इतरांचे साहाय्य घ्यावे. त्याचबरोबर आध्यात्मिक उपाय करावेत.
३. पुष्कळ स्वयंसूचना देऊनही पालट होत नसेल, तर मनापासून स्वतःचे दोष स्वीकारावेत, आत्मनिवेदन करावे आणि देवाला सांगावेे.
४. एखाद्या प्रसंगात काळजी वाटते, तेव्हा आपली देवावरची श्रद्धा न्यून पडते. त्या वेळी स्वयंसूचना घेणे, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया केल्याने दोष अल्प होण्यास साहाय्य होते. त्यामुळे आध्यात्मिक त्रासही अल्प होत जातो.
३ अं. शरणागती
आतून खंत वाटत नाही अथवा सूचत नाही, असे होत असल्यास शरणागतीसाठी प्रयत्न करायचे आणि प्रायश्चित्त घ्यायचे. प्रायश्चित्त घेतल्यावर दोष जाण्यास साहाय्य होते.
३ क. दुसर्याच्या मनाचे आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्याचा विचार करू नये.
३ ख. स्वतःच्या मनाला गोंजारायचे नाही, त्याला फटके द्यायचे. मनाला शिस्त लावली, तरच पालट होईल.