१. सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांतील भेद
१ अ. सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असणे, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्वरेच्छेला प्राधान्य दिलेले असणे : ‘सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असते, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्वरेच्छेला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे सकाम साधना करून देवतांना प्रसन्न करणारा भक्त त्याच्या इच्छेनुसार संबंधित देवतांकडून वर प्राप्त करून घेऊ शकतो. याउलट निष्काम भक्ती करणार्या भक्ताच्या मनात कोणतीच मनीषा शेष नसल्यामुळे तो देवतेकडून कोणत्याही प्रकारचा वर मागत नाही. भक्ताला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, हे सर्वज्ञ देवतेला ज्ञात असल्यामुळे ती आवश्यकतेनुसार संबंधित गोष्ट भक्ताला देते.
१ आ. सकाम भक्ती करणार्या भक्ताने देवतेपेक्षा मायेला अधिक महत्त्व देणे आणि निष्काम भक्ती करणार्या भक्ताने मायेपेक्षा देवाला अधिक महत्त्व देणे : सकाम भक्ती करणार्या भक्ताच्या मनात देवतेला संपूर्ण महत्त्व दिलेले नसून मायेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे तो देवतेकडून सकामातील, म्हणजे मायेतील विविध वस्तू वराच्या रूपाने मागून घेतो. निष्काम भक्ती करणार्या भक्ताने भगवंताचे महत्त्व जाणले असते. त्याने मायेपेक्षा देवतेला अधिक महत्त्व दिलेले असते; त्यामुळे तो त्याच्या उपास्य देवतेकडून मायेतील कोणतीच गोष्ट मागत नाही. मायेविषयी आसक्ती नसल्यामुळे तो मायेतील कोणत्याच गोष्टीला प्राधान्य देत नाही. त्याच्या दृष्टीने ‘त्याच्या उपास्य देवतेची कृपा होणे’, हेच सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे तो मायेतील गोष्टी न मागता देवतेची अखंड कृपादृष्टी रहाण्यासाठी भगवंताला प्रार्थना करत असतो.
१ इ. व्यक्त भाव असलेल्या सकाम भक्ती करणार्या भक्ताचे द्वैत कायम रहाणे आणि अव्यक्त भाव असलेल्या निष्काम भक्ती करणारा भक्त अद्वैतात जाऊन भगवंताशी एकरूप होणे : सकाम भक्ती करणार्या भक्ताच्या मनात व्यक्त भाव अधिक प्रमाणात असून त्याची ओढ सगुणाकडे असते. तो साधना करून त्याच्या बदल्यात वरदान मागून देवतेशी द्वैत कायम ठेवतो. याउलट निष्काम भक्ती करणार्या भक्ताच्या मनात अव्यक्त भाव अधिक प्रमाणात असतो आणि त्याची ओढ निर्गुणाकडे असते. त्यामुळे तो साधना करून द्वैत निर्माण होईल अशी कोणतीच गोष्ट वरदानात मागत नाही. त्याची ओढ अद्वैताकडे असल्यामुळे त्याला भगवंताशी एकरूप व्हायचे असते. त्यामुळे निष्काम भक्ती करणार्या भक्ताला त्याच्या भक्तीनुसार सायुज्य मुक्ती (देवतेच्या सगुण रूपाशी एकरूपता) किंवा मोक्ष (देवतेच्या निर्गुण रूपाशी एकरूपता) यांची प्राप्ती होते.
यावरून आपल्या लक्षात येते की, सकाम भक्ती करणार्यापेक्षा निष्काम भक्ती करणारा श्रेष्ठ असतो. ‘माझी निष्काम भक्ती करणार्या भक्ताची मी सर्वतोपरी काळजी घेतो’, या आशयाचे वचन श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत दिलेले आहे. त्याचीच प्रचीती निष्काम भक्ती करणारा भक्त घेत असतो.
‘हे भगवंता, सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांच्याविषयी ज्ञान देऊन तू आमच्या मनावर निष्काम भक्ती करण्याचे महत्त्व बिंबवलेस. यासाठी तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०१७)
देवतेच्या उपासनेने त्या देवतेशी
संबंधित गोष्टी आपोआप होण्याची प्रक्रिया
‘सकाम भक्तीत कोणत्याही उच्च देवतेकडून कोणत्याही तर्हेचा वर मागता येतो. निष्काम भक्तीत देवतेच्या उपासनेने त्या देवतेशी संबंधित गोष्टी आपोआप मिळतात, उदा. श्री लक्ष्मीदेवीच्या उपासनेने धनप्राप्ती आपोआप होते. असे होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
लक्ष्मीतत्त्व हे धनाशी संबंधित आहे. साधक जेव्हा श्री लक्ष्मीदेवीची उपासना करतो, तेव्हा त्याच्याकडे लक्ष्मीतत्त्व आकर्षित होऊन ते वाढायला लागते. ते विशिष्ट प्रमाणात वाढले की, धन हे लक्ष्मीतत्त्वाशी संबंधित असल्याने त्याला आपोआप धनप्राप्ती होते.’
– परात्पर गुरु डॉ. आठवले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात