उज्जैन (मध्यप्रदेश) येथील संत बाबा उमाकांतजी
महाराज यांची सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट
बाबा उमाकांतजी महाराज यांचा परिचय
उमाकांतजी महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला असून बाबा जयगुरुदेवजी महाराज हे त्यांचे गुरु होत. वर्ष २००७ पासून गुरूंच्या आज्ञेने बाबा उमाकांतजी महाराज धर्मस्थापना आणि लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यांसाठी कार्य करू लागले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे बाबा जयगुरुदेव आश्रमाची त्यांनी स्थापना केली. देशभरात विविध ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून ते लोकांना मार्गदर्शन करतात.
रामनाथी (गोवा) : मनुष्याला भाड्याने देह मिळाला आहे तो मौजमजा करण्यासाठी नाही. पशूंप्रमाणे मनुष्य वागू लागल्यास त्याचे जीवनाचे मुख्य कर्तव्य तो विसरू शकतो. ज्या ईश्वराने हा देह दिला आहे, तो त्यांच्यासाठी खर्च केला नाही, तर त्याचा उपयोग काय ? भारत जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. त्याला पुन्हा आध्यात्मिक देश बनवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, तसा तुमचाही चालू आहे. आपले लक्ष्य एकच आहे, असे मार्गदर्शन परम संत बाबा जयगुरुदेवजी यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांतजी महाराज यांनी केले. महाराजांनी आज येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर साधकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी त्यांचा हार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
प्रत्येक युग संपतांना मोठी हानी झाली. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग संपतांना जशी हानी झाली, तशीच मोठी हानी आता कलियुग संपतांना होणार आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही, असेही बाबा उमाकांतजी महाराज यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांनी शाकाहाराचे महत्त्व प्रतिपादित केले. तत्पूर्वी महाराजांनी आश्रमातील राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी चाललेल्या कार्याची माहिती जाणून घेतली. सनातनचे साधक श्री. योगेश जलतारे यांनी महाराजांना ही माहिती दिली. या वेळी महाराजांसमवेत त्यांचे भक्तही उपस्थित होते.
बाबा उमाकांतजी महाराज यांचे राष्ट्र
आणि धर्म विषयक जागृती करणारे विचार
देशभरात गोहत्या बंद होण्यासाठी बाबा उमाकांतजी महाराज यांनी वर्ष २०१४ च्या गुरुपौर्णिमेपासून व्यापक अभियानास प्रारंभ केला आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे ‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, तसेच गोहत्येच्या संदर्भात कठोर कायदा बनवावा’, अशा मागण्या केल्या होत्या. त्याचसमवेत ‘मनुष्याने निसर्गाच्या विरोधातील कार्य केले आहे. परिणामी निसर्गाचा कोप होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी शाकाहारी, सदाचारी, प्रामाणिकपणे कष्ट करा’, असे आवाहनही ते त्यांच्या सत्संगामधून लोकांना करतात. ‘आंदोलने, मोर्चे यांतून कुठल्याही समस्यांचे निराकरण होणार नाही. त्याऐवजी स्वत:त देशभक्ती आणि देशप्रेम निर्माण करणे आवश्यक आहे’, असेही ते सांगतात.