साधकांची पोटच्या मुलांप्रमाणे मायेने काळजी घेणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी !

पू. (सौ.) सुशीला मोदी

जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी (पू. मोदीभाभी) यांचा आणि माझा परिचय प्रथम देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झाला. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी बरेच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या मला प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहेत, असे जाणवले. त्यांच्यात अनेक दैवी गुणांचा समुच्चय आहे. त्यांच्यातील पुढील गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली.

१. सेवेची तळमळ

सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया

अ. सनातनला काही देऊ इच्छित नसलेल्यांकडून क्षमतेनुसार साधक-रुग्णांना आथिर्र्क साहाय्य मिळवून देणे : पनवेल येथे पू. मोदीभाभींचे माहेर आहे. तेेथील एक नगरसेवक त्यांच्या परिचयाचे आहेत. मला झालेल्या व्याधीविषयी त्यांनी जाणून घेतले आणि त्या नगरसेवकाच्या ओळखीच्या एका न्यासाकडून मला आथिर्र्क साहाय्य मिळवून दिले. जे लोक सनातनला काही देऊ इच्छित नाहीत, त्यांना रुग्णांना काही साहाय्य करू शकता का ?, असे विचारून त्यांनी २ – ३ वेळा औषधांसाठी साहाय्य मिळवून दिले.

आ. माहेरी आल्यानंतरही अखंड सेवारत रहाणे : राजस्थानमध्ये उन्हाळा अतिशय कडक असतो. त्या वेळी पू. मोदीभाभी काही दिवस पनवेल येथे त्यांच्या माहेरी रहायला येतात. तेथेही त्या ओळखीच्या लोकांकडून अर्पण मिळवणे, प्रवचने करणे, उत्पादने आणि ग्रंथ यांचा हिशोब करणे, अशा प्रकारे अखंड सेवा करतात.

 

२. कार्यपद्धतींचे पालन करणे

पू. मोदीभाभी देवद आश्रमात आल्यावर ग्रंथ, विज्ञापने किंवा अर्पण यांचे पैसे जमा करतांना त्या ठरवून दिलेल्या कार्यपद्धतींचे पालन करतात.

 

३. प्रेमभाव

अ. पू. मोदीभाभींनी घरी आलेल्या साधकांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेणे आणि त्यांच्या डोळ्यांतूनही अखंड प्रेमाचा वर्षाव होत असणे : महाराष्ट्रातून राजस्थानात काही साधक सेवेला जातात. ते बर्‍याचदा पू. मोदीभाभी यांच्या घरी निवासाला असतात. त्या वेळी त्या साधकांची अगदी पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. माझा मुलगा आनंद प्रथमच जोधपूर येथे पू. मोदीभाभींकडे गेला होता. मी आनंदला भ्रमणभाषवर तू कुणाकडे रहातोस ? कुठे जेवतोस ?, असे विचारल्यावर तो मला म्हणाला, तू माझी जेवणा-खाण्याची काहीच काळजी करू नको. पू. मोदीभाभी जेवणासह प्रेमही देतात. तेव्हा मला प.पू. डॉक्टर आणि पू. मोदीभाभी यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हापासून मी त्याची काळजी करायचे सोडून दिले. त्या देवद येथील सनातन आश्रमात आल्यावरही साधिकांची गळाभेट घेऊन प्रेम व्यक्त करतात. त्यांच्या डोळ्यांतूनही अखंड प्रेमाचा वर्षाव होत असतो.

आ. साधक परगावी गेल्यावर वाईट वाटणे : पू. मोदीभाभींच्या घरून साधक अन्यत्र सेवेला गेल्यावर पू. मोदीभाभींना वाईट वाटते. त्या म्हणतात, मला घर रिकामे झाल्यासारखे वाटत आहे. आईला जशी मुले परगावी गेल्यावर करमत नाही, तसे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.

इ. साधकांच्या नातेवाइकांचेही अतिशय प्रेमाने आदरातिथ्य करणे : आनंदचे मामा-मामी कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर आनंदला भेटण्यासाठी जोधपूर येथे पू. मोदीभाभींच्या घरी गेले होते. त्या वेळी पू. मोदीभाभींनी त्यांचे चांगले आदरातिथ्य केले. पू. मोदीभाभींनी त्यांच्यासाठी राजस्थानकडचा खास पदार्थ बनवला होता, तसेच त्यांना पूर्ण प्रवासात पुरेल एवढा जेवणाचा डबाही दिला होता. त्या भ्रमणभाषवर बोलतांना म्हणाल्या, साधक घरी होते; म्हणून त्याचे मामा-मामी आले. एरव्ही कोणी येत नाही. आपल्या साधकांसाठी एवढे तरी करायलाच हवे.
त्या वेळी माझी भावजागृती झाली. मायेतील नात्यापेक्षा अध्यात्मातील नाते किती श्रेष्ठ आहे !, हे जाणवले.

 

४. कृतज्ञताभाव

त्यांना तुम्ही किती चांगली सेवा करता, असे म्हणाल्यावर त्या कृतज्ञताभावाने म्हणतात, मी काही करत नाही. देवच करवून घेतो. त्या सततच कृतज्ञताभावात असतात.

 

५. पू. मोदीभाभी संत होण्याविेषयी मिळालेली पूर्वसूचना

मला अनेक दिवसांपासून त्यांच्यातील संतत्वाची जाणीव होत होती. गेल्या वर्षी त्या एका नातलगाला घेऊन देवद आश्रमात आल्या होत्या. तेव्हा मी त्यां सहज म्हणाले, लवकरच या संत होतील. तेव्हापासून बर्‍याचदा मनात विचार यायचा, या आता लवकरच संत होतील. जणू मला ती पूर्वसूचना मिळाली होती, असे वाटते.
हे गुरुदेवा, आपणच मला पू. मोदीभाभींची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याची बुद्धी दिलीत. त्यांच्यातील गुण माझ्यातही येऊ देत. त्यांच्याप्रमाणे माझीही प्रगती होण्यासाठी माझ्याकडून अपेक्षित साधना करवून घ्या, अशी आपल्या कोमल श्रीचरणी संपूर्ण शरणागत भावाने प्रार्थना करते.

– सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment