अनुक्रमणिका
- १. गुरु आणि साधक यांचा विश्वास अन् मने जिंकणारे सद़्गुरु दादा !
- २. ‘अखंड शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे’, हे शिकवणारे सद़्गुरु दादा !
- ३. ‘शिकण्याची तळमळ’ आणि ‘आज्ञापालन’ या गुणांमुळे बर्याच सेवा अल्प कालावधीत शिकणे
- ४. गुरूंवर असलेल्या श्रद्धेच्या बळावर साधकांसाठी नामजपादी उपाय करूनही इतर साधकांप्रमाणे स्वत:ला त्रास न होेणारे सद़्गुरु दादा !
- ५. प्रांजळपणे मनातील विचार सांगणारे सद़्गुरु सत्यवानदादा !
- ६. संतांच्या संकल्पात असलेले सामर्थ्य
- ७. सद़्गुरु दादांची स्थितप्रज्ञ अवस्था
- ८. स्वतःच्या सेवा स्वतः करणे
- ९. विश्रांती न घेता नामजप करणे
- १०. कन्नड शिकण्यासाठी प्रयत्न करणे
- ११. सद्गुरु असूनही विचारून विचारून करणे
- १२. साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करणे
- १३. साधकांना साधनेत साहाय्य करणे
- १४. अनुभूती
‘आज्ञापालनाचा मेरूमणी असलेले, गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर वाईट शक्तींशी लढा देणारे, गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) अपेक्षित असणारी परिपूर्ण आणि चुकांविरहित सेवा करणारे साधकरूपी सद़्गुरु दादा, गुरु आणि साधक यांचा विश्वास अन् मने जिंकणारे, स्थितप्रज्ञ अवस्थेत रहाणारे सद़्गुरु सत्यवानदादा !’, अशा अनेक दैवी गुणांचा समुच्चय असलेले सद़्गुरु दादा प.पू. डॉक्टरांचे आवडते असणार यात कुणालाही संशय नाही. मुंबई येथील सेवाकेंद्रात असतांना दिवसभरात गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) मुखात ‘सत्यवान कुठे गेला ? सत्यवानला सांगितले का ? सत्यवान काय करत आहे ? सत्यवानला बोलव’, असे दिवसभर चालू असायचे. समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी यांच्यातील नात्याप्रमाणे प.पू. डॉक्टर अन् सद़्गुरु सत्यवान कदम यांचे नाते आहे. साधक ते सद़्गुरु असा प्रवास करत ते आता मोठ्या प्रमाणात गुरूंचे समष्टी कार्य करत आहेत. सद़्गुरु दादांच्या सहवासात असतांना मुंबई येथील सेवाकेंद्रातील काही साधकांना आणि अनेक वर्षे त्यांच्या सहवासात असणार्या साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळाले. आजच्या लेखात आपण श्री. प्रकाश शिंदे यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.
१. गुरु आणि साधक यांचा विश्वास अन् मने जिंकणारे सद़्गुरु दादा !
‘सनातनचे कार्य जसजसे वाढत होते, तसतसे मुंबई सेवाकेंद्रात अनेक जिल्ह्यांतील साधकांची सेवेच्या निमित्ताने ये-जा करण्याचे प्रमाणही वाढले होते. त्या वेळी त्यांची रहाण्याची, प्रसाद-महाप्रसादाची व्यवस्था करणे, त्यांचे सर्व पहाणे, या सर्व सेवा सद़्गुरु दादाच पहात होते. त्याचप्रमाणे आलेल्या साधकांच्या अडचणीही ते सोडवत. सद़्गुरु दादांना अडचणी सांगितल्यावर ‘ते सोडवतील’, असा विश्वासही त्या साधकांना असायचा. त्यांच्याकडे सर्व जण आदरानेच पहात असत. एखादी अडचण घेऊन साधक गुरुदेवांकडे गेल्यास ते ‘सत्यवानला सांगितले का ?’, असा प्रश्न विचारत असत.
यावरून ‘गुरुदेवांचे मन जिंकण्यासाठी रात्रंदिवस जिवाचे रान कसे करावे आणि विकल्पविरहित स्वतःला अर्पण कसे करावे ?’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
२. ‘अखंड शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे’, हे शिकवणारे सद़्गुरु दादा !
एकदा सदगुरु दादा गुरुपौर्णिमेच्या कालावधीत देवद आश्रमात आले होते. ‘गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात साधकांनी विषय कसा मांडायचा ? प्रवचन परिणामकारक कसे घ्यायचे ?’, यांसंदर्भात साधकांचा सराव पाहून ‘त्यात अजून काही सुधारणा करायच्या का ?’, हे ते पहाणार होते आणि स्वतःचा सरावही करणार होते. तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही पूर्वीपासून प्रवचन घेत आहात. तुम्हाला सरावाची आवश्यकता आहे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्याला येते; म्हणून करायचे’, असे न करता अखंड शिकण्याच्या स्थितीतच राहिले पाहिजे. गुरुदेवांना ते अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आपल्याला वागता आले पाहिजे.’’
३. ‘शिकण्याची तळमळ’ आणि ‘आज्ञापालन’
या गुणांमुळे बर्याच सेवा अल्प कालावधीत शिकणे
‘देवद आश्रमातील काही साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या संदर्भातील व्यष्टी आढावा घेत असत आणि त्याचा लाभही साधकांना होत होता. ‘अन्य साधकांनी ही सर्व प्रक्रिया शिकून इतर केंद्रांत, तसेच राज्यांतही राबवावी’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी अनेक साधकांना ती शिकून घ्यायला सांगितली होती. त्यामधे सद़्गुरु दादाही होते. त्याच वेळी त्यांना अन्य सेवाही शिकण्यास सांगितल्या होत्या. वास्तविक हे सर्व विषय त्यांच्यासाठी पूर्णतः नवीन होते; परंतु त्यांच्यातील ‘शिकण्याची तळमळ’ आणि ‘आज्ञापालन’ या गुणांमुळे ते प्रत्येक विषय अल्प कालावधीत शिकत गेले. ते संतपदावर होते; परंतु ‘मी संत आहे’, अशा कुठल्याही अविर्भावात ते राहिले नाहीत. त्यांनी साधकांकडून ‘व्यष्टी आढावा कसा घ्यायचा ?’, तसेच अन्य सर्व सेवा शिकून घेतल्या आणि नंतर अनेक साधकांनाही शिकवल्या.
४. गुरूंवर असलेल्या श्रद्धेच्या बळावर
साधकांसाठी नामजपादी उपाय करूनही
इतर साधकांप्रमाणे स्वत:ला त्रास न होेणारे सद़्गुरु दादा !
वर्ष २००० पासून साधकांना आध्यात्मिक त्रास होऊ लागल्यानंतर त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सद़्गुरु दादांनाही सांगितले होते. वर्ष २००८ मध्ये बर्याच साधकांचे त्रासाचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. साधकांसाठी उपाय करण्याचे दायित्व अन्य काही उत्तरदायी साधकांनाही दिले होते. त्यातील प्रत्येक उत्तरदायी साधक त्रास असलेल्या साधकासाठी नामजपादी उपाय करत होते; परंतु कालांतराने त्या उत्तरदायी साधकांवरही वाईट शक्तींची आक्रमणे होऊ लागली. त्यामुळे त्यांना ती सेवा थांबवून स्वतःसाठीच नामजपादी उपाय करावे लागले; परंतु सद़्गुरु दादा हे एकमेव असे होते की, ते साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. त्यांच्यावर वाईट शक्ती आक्रमण करू शकत नव्हत्या. त्याविषयी मी त्यांना विचारले, ‘‘तुमच्यावर आक्रमण का होत नाही ?’’ त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मन कणखर हवे आणि ‘मी नाही, तर प्रत्यक्ष गुरुदेवच माझ्या माध्यमातून साधकांसाठी नामजपादी उपाय करून घेत आहेत’, याची जाणीव हवी. त्या वेळी स्वतःचे अस्तित्व नको. त्यामुळे माझ्यावर आक्रमणे अल्प होतात.’’ यावरून त्यांची गुरुदेवांवर असलेल्या श्रद्धेची प्रचीती येते.
५. प्रांजळपणे मनातील विचार सांगणारे सद़्गुरु सत्यवानदादा !
मी बराच कालावधी सद़्गुरु दादांच्या समवेत राहिल्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील मनातील काही विचारांच्या संदर्भात ते चर्चा करत असत. मनात येणार्या विवाहाच्या संदर्भातील विचारांच्या संदर्भात सांगतांना ते म्हणाले, ‘‘६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतरही माझ्या मनात विचार येत होते. ८० टक्के आध्यात्मिक स्तर झाल्यानंतर मात्र आता असे कोणतेही विचार माझ्या मनात येत नाहीत.’’
६. संतांच्या संकल्पात असलेले सामर्थ्य
एकदा मी सद़्गुरु दादांना विचारले, ‘‘तुमचा आध्यात्मिक स्तर ८० टक्के झाल्यावर सध्याची तुमची अवस्था कशी आहे ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला आता असे वाटते, ‘मी काहीही करू शकतो. मला कठीण असे काही नाही; कारण गुरुदेवच सर्व करून घेतात !’’ यावरून ‘सद़्गुरु पदावर गेल्यानंतर संकल्प शक्ती पुष्कळ प्रमाणात कार्यरत होते’, याची मला जाणीव झाली आणि म्हणूनच ‘गुरुदेव साधकांना संतांचे मन जिंकण्यास का सांगतात ?’, याचे कारणही कळले. आपण कितीही प्रयत्न केले, तरी आध्यात्मिक प्रगती ही एका मर्यादित टप्प्यापर्यंत करू शकतो; परंतु संतांचे मन जिंकल्यास आपल्या प्रगतीसाठी त्यांचा संकल्प झाला की, आपली प्रगती शीघ्र गतीने आणि अमर्यादित होते.
७. सद़्गुरु दादांची स्थितप्रज्ञ अवस्था
‘प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज हे स्थितप्रज्ञ अवस्थेत असायचे. ते आश्रमात येणार्या प्रत्येकाची काळजी घेत असत. ‘त्यांना काय हवे-नको’, हे सगळे ते पहात असत. त्याच प्रकारे सद़्गुरु सत्यवानदादा होते. त्यांना पाहिले की, प.पू. रामानंद महाराज यांची आठवण होते. सेवाकेंद्रात सेवेसाठी साधक असो किंवा नसो, सद़्गुरु दादा स्वतः एकटे सेवा करत असत. त्या वेळी ‘गुरुदेवांना अपेक्षित चुकांविरहित सेवा कशी करता येईल ?’, हाच त्यांचा ध्यास असे. ‘अवतारी गुरूंच्या समवेत (सगुण) चुकांविरहित सेवा करणे किती कठीण आहे ?’, हे मी स्वतः सेवाकेंद्रात असतांना पाहिले होते. त्या वेळी प.पू. गुरुदेव क्षणाक्षणाला येऊन ‘सेवा कशी चालू आहे ?’, हे पहात असत आणि त्यात होणार्या चुकाही त्याच वेळी दाखवून देत असत. सद़्गुरु दादा त्याही परीक्षेत उत्तीर्ण होत असत.’
– श्री. प्रकाश शिंदे (वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२३)
८. स्वतःच्या सेवा स्वतः करणे
‘सद्गुरु सत्यवानदादा स्वत:ची सेवा कोणालाही करायला देत नाहीत. पाणी भरणे इत्यादी स्वतःच्या सेवा ते स्वतःच करतात, तसेच इतर कोणत्याही कृती ते सहजतेने करतात.
९. विश्रांती न घेता नामजप करणे
सद्गुरु दादांना दिवसभरात पुष्कळ वेळ सेवेसाठी बसावे लागते. तरीही ते दुपारी विश्रांती म्हणून न झोपता बसूनच नामजप करतात, तसेच मधे मधे अधिकाधिक वेळ उपाय करण्यास प्राधान्य देतात.
सद्गुरु दादा सांगितलेले उपाय न चुकता करतात. त्यांचे पाय कितीही दुखत असले, तरी ते न चुकता सूर्यनमस्कार घालतात. एकदा अंघोळीचे पाणी लवकर तापल्यामुळे त्यांना अंघोळीला लवकर जावे लागले. त्यामुळे त्यांचे सूर्यनमस्कार घालायचे राहिले; पण सद्गुरु दादांनी अंघोळ होताच सूर्यनमस्कार पूर्ण केले. अशा रितीने ते कुठेही असले आणि कितीही गडबड असली, तरी प्रत्येक उपाय पूर्ण करतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक साधकाला सर्व उपाय करण्याची जाणीव करून देतात.
हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर ‘उपाय पूर्ण कसे करायचे ?’, हे गुरुदेवांनी सद्गुरूंच्या माध्यमातून शिकवून ‘आम्ही कुठे न्यून पडतो ?’, याची जाणीव करून दिल्याचे लक्षात आले.
१०. कन्नड शिकण्यासाठी प्रयत्न करणे
सद्गुरु दादा दिवसातील थोडा वेळ तरी कन्नड शिकवणार्या पुस्तकाचा अभ्यास करतात. आपल्यासह असलेल्या साधकांशी ते कन्नडमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. कर्नाटकातील बर्याच साधकांना सद्गुरु दादांशी बोलतांना अडचण येत नाही. याचे कारण म्हणजे सद्गुरु दादांना कन्नड भाषा पूर्णपणे समजते. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना ‘कुणीतरी भाषांतर केले पाहिजे’, अशी अडचण येत नाही. उत्तर मात्र ते हिंदीतून देतात.
११. सद्गुरु असूनही विचारून विचारून करणे
सद्गुरु असूनही आपल्यासह असलेल्या साधकांना ते ‘हे बरोबर आहे ना ?’, ‘असे करू शकतो का ?’, ‘आपल्याला काही सांगायचे आहे का ?’, असे विचारून विचारून सेवा करतात. यातून आम्हाला सद्गुरु दादा ‘सेवेचे साधनेत रूपांतर कसे करायचे ?’, हे प्रत्यक्ष शिकवतात.
१२. साधकांना त्यांच्या सेवेत साहाय्य करणे
सद्गुरु दादा स्वतः सद्गुरु असूनही सर्व साधकांना साहाय्य करतात. याची काही उदाहरणे येथे देत आहे.
अ. एकदा सत्संगाची सिद्धता करायची होती. तेव्हा सद्गुरु दादांनी आसंद्या आणून ठेवणे, सतरंजी घालणे इत्यादी केले.
आ. एकदा केंद्रांना ‘सनातन प्रभात’ वितरण करण्याची सेवा चालू होती. त्या वेळी सद्गुरु दादांनी तत्परतेने केंद्रातील साधकांसह बसून त्यांना हिशोब करून देऊन साहाय्य केले.
यातून ‘कोणतीही कृती सद्गुरु दादा कशी करतात आणि आम्ही कुठे न्यून पडतो ?’, ते लक्षात आले.
१३. साधकांना साधनेत साहाय्य करणे
सद्गुरु दादा एखाद्या केंद्रात गेल्यावर ‘तिथे साधक कुठे न्यून पडतात ? त्यांच्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत ?’ इत्यादी सर्व लिहून ठेवून जिल्ह्याच्या आढावा सत्संगात सांगतात. काही वेळा साधकांनी लक्षात न घेतलेली आणि लिहून न घेतलेली सूत्रे आठवणीने त्यांना सांगतात. उत्तरदायी साधक जेथे न्यून पडतात, तेथे त्यांना तत्परतेने, वात्सल्याने आणि प्रेमाने जाणीव करून देतात. त्यामुळे साधकांना चुकांची खंत वाटते आणि ‘नेहमी योग्यच केले पाहिजे’, असा उत्साह त्यांच्यात निर्माण होतो.
१४. अनुभूती
अ. सद्गुरु सत्यवानदादा आपल्यासमवेत अथवा सेवाकेंद्रात असतांना आपल्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत स्मरण होते, तसेच आपल्याकडून भावाच्या स्तरावर वेगवेगळ्या प्रार्थना होतात.
आ. सद्गुरु दादांना पहाताक्षणी प्रत्यक्ष ‘परात्पर गुरु डॉक्टरांनाच पहात आहोत’, असे जाणवते. तेव्हा वेगळ्याच भावविश्वाचा अनुभव होतो.
इ. गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर गुरुदेवांचे दर्शन होताच आपोआप आनंदाची अनुभूती येते, तशीच अनुभूती सद्गुरु दादा समोर येताच येते.
ई. काही वेळा सत्संग चालू असतांना मी मनात परात्पर गुरु डॉक्टरांना माझ्या स्थितीविषयी प्रार्थना करत असे. त्या वेळी अनेक वेळा समोरून सद्गुरु दादा उत्तर द्यायचे. त्या क्षणी परात्पर गुरु डॉक्टरच उत्तर देत असल्याचे मला अनुभवायला मिळत असे.
उ. सद्गुरु सत्यवानदादांच्या समवेत असतांना आपल्या त्रासाचे प्रमाण घटून जडत्व न्यून होत असल्याचे जाणवते.
या सर्व अनुभूतींमधून परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाची कशी काळजी घेतात, हेच प्रत्यक्ष अनुभवता आले.’
– कु. नागमणी आचार, हुब्बळ्ळी, कर्नाटक.