सनातनच्या देवद आश्रमातील साधकांवर गुरुकृपेचा वर्षाव !
‘विविध गुणांच्या बळावर अवघ्या २७ व्या वर्षी
६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या
इतिहासात अनोखे पर्व निर्माण करणार्या सौ. अश्विनी अतुल पवार !’
‘महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या सौ. अश्विनीने युवावस्थेत प्रथम देवद येथील आश्रमात आणि नंतर रामनाथी येथील आश्रमातील गुरुकुलात राहून साधनेचा पाया पक्का केला. त्या वेळी तिने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन केले. नियोजनकौशल्य, आज्ञापालन, उत्तम नेतृत्व, प्रेमभाव, तसेच विचारून करण्याची वृत्ती आदी गुणांमुळे अश्विनीने वर्ष २०१३ पासून, म्हणजे वयाच्या २३ व्या वर्षापासून देवद आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले अन् ‘देवद आश्रमातील साधकांच्या साधनेची घडी कधी व्यवस्थित बसेल का ?’, ही माझी चिंता दूर केली.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी तिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले.
अश्विनीचा विवाह वर्ष २०१० मध्ये झाला. अश्विनीच्या संतपदाच्या वाटचालीत तिच्या आई-वडिलांबरोबरच तिचे पती अतुल आणि सासरचे यांचा मोठा सहभाग आहे. तिच्या आई-वडिलांनी तिला साधनेसाठी देवद आश्रमात येण्यापासून कधी रोखले नाही. लग्न झाल्यावरही ती कधी पत्नी किंवा सून अशी वागली नाही. ती नेहमीच साधिका म्हणून वागायची, तरी पती अतुल आणि सासरचे यांनी तिच्या साधनेत कधी बाधा आणली नाही. अतुल हा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याकडे त्यांच्या सेवेत वर्ष २०१३ पासून, म्हणजे सव्वातीन वर्षे पूर्णवेळ आहे, तरी तिने त्याविषयी कधी अप्रसन्नता व्यक्त केली नाही. उलट त्याला प्रोत्साहनच दिले. त्यामुळे अतुलचीही प्रगती जलद होत आहे.
अशा ‘पू. (सौ.) अश्विनी पवार हिची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती जलद गतीने व्हावी’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.७.२०१७)
देवद (पनवेल), ९ जुलै (वार्ता.) – येथील सनातनच्या आश्रमातील साधकांच्या आध्यात्मिक आई असलेल्या सौ. अश्विनी पवार (वय २७ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या सनातनच्या ६९ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत, असे सनातनच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ९ जुलै या दिवशी, म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी घोषित केले. त्यांनी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. संतपद घोषित करण्याच्या काही वेळ अगोदरपासूनच सौ. अश्विनी पवार यांना भावाश्रू अनावर झाले होते. या प्रसंगी अनेक लहान-मोठ्या प्रसंगांत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचे निखळ प्रेम अनुभवणारे आणि त्यांनी संतपद गाठल्याच्या घोषणेसाठी आतुरलेले देवद आश्रमातील साधक आनंदविभोर झाले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्यानेच गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची असते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या सोहळ्याद्वारे साधकांनाच ही आनंदाची आणि संतकृपेची भावभेट दिली. सनातन संस्थेचे विश्वस्तपद किंवा आश्रमाचे कोणतेही अधिकारपद नसतांना केवळ अंगीभूत असणार्या आध्यात्मिक गुणांच्या आधारे साधकांना साधनेत मार्गदर्शन करून सौ. अश्विनी पवार यांनी समष्टी संतपद गाठले.
या भावसोहळ्याला प.पू. पांडे महाराज, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. सुदामराव शेंडे, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. दत्तात्रय देशपांडे, पू. विनायक कर्वे, पू. महादेव नकाते, पू. पद्माकर होनप, पू. रमेश गडकरी, तसेच पू. (सौ.) अश्विनी पवार यांचे पती श्री. अतुल पवार, वडील श्री. सदाशिव साळुंखे, आई सौ. पुष्पा साळुंखे, भाऊ श्री. सचिन साळुंखे, तसेच आश्रमातील सर्व साधक उपस्थित होते.