निर्गुणाची सेवा सोपी असते; कारण निर्गुण काही म्हणत नाही; पण सगुणाची सेवा कठीण असते. आपली चूक झाली की, सगुण, देहधारी गुरु रागावतात आणि चूक नसली तरी रागावतात दोन दिवस प.पू. बाबांकडे राहून आलेल्यांना कळत नाही की, संतसेवा किती कठीण आहे. आपण काही केले, तरी त्यांना ते पसंत पडत नाही, हे मी (परात्पर गुरु डॉ. आठवले) १९९५ मध्ये बाबांजवळ सेवेसाठी आठ मास राहिलो असतांना अनुभवले. त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
१. एकदा बाबांच्या चहा घ्यायच्या नेहमीच्या वेळी मी विचारले, ‘‘बाबा, चहा घेणार ना ?’’ त्यावर बाबा रागावून म्हणाले, ‘‘ही काय चहा घ्यायची वेळ आहे ?’’ एका घंट्याने ओरडून म्हणाले, ‘‘कोणाचे लक्षच नाही, मी चहा घेतला कि नाही !’’
२. औषधाची नेहमीची वेळ झाली म्हणून मी विचारले, ‘‘बाबा, औषध घेणार ना ?’’ बाबा ओरडून म्हणाले, ‘‘मला विचारणारे तुम्ही कोण ? फेकून द्या औषधे. मला पाहिजे तर घेईन, नाहीतर नाही घेणार.’’
३. मी बाबांच्या छातीवरच्या जखमेची मलमपट्टी करतांना प.पू. रामानंद महाराज विजेरीने प्रकाश पाडत होते. प्रकाश योग्य ठिकाणी पडत होता, तरी त्यांना शिव्या देत ओरडत बाबा म्हणाले, ‘‘उजेड भलतीकडे काय पाडता ?’’
४. बाबांच्या जवळ बसून मी अध्यात्मशास्त्र ग्रंथाच्या खंडांचे लिखाण करायचो. एक दिवस ओरडून बाबा म्हणाले, ‘‘मी आजारी असतांना तुम्ही लिहीत काय बसलात ? फेकून द्या ते कागद.’’ मी लिखाण बंद केले आणि त्यांच्या अंगावर माशा बसू नयेत; म्हणून उभे राहून वारा घालायला प्रारंभ केला. दोन दिवसांनंतर एकदा असाच वारा घालत असतांना बाबा ओरडून म्हणाले, ‘‘तुम्ही हे काय फालतू काम करता ? लिहीत बसा.’’
५. बाबांना झोप लागत आहे, असे पाहून मी खोलीतील दिवा बंद करायला गेलो. तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले. तेव्हा मी त्यांना सहज विचारले, ‘‘दिवा मालवू का ?’’ त्यावर बाबा म्हणाले, ‘‘तुम्हाला हे नसते धंदे कोणी सांगितले ? विजेचे पैसे तर दुसर्यांना द्यायचे आहेत.’’ मी ‘बरं बाबा’ असे म्हणून खोलीतून बाहेर पडल्यावर त्यांनी लगेच मला बोलावणे पाठवले. मी त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘‘दिवा बंद करा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात