१. संकल्पातून निर्मिती
‘एकोऽहं बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे आणि माझ्यापासून अनेक होवोत !’ असा संकल्प ईश्वराने केला आणि तेव्हा सृष्टी अन् सर्व जीव निर्माण झाले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या त्याच संकल्पाने सनातन संस्था निर्माण झाली. त्यातूनच संस्थेचे अनेक कार्यकर्ते, साधक आणि संत निर्माण झाले आहेत.
२. पालनपोषण
ईश्वर सृष्टीचे पालनपोषण करतो. परात्पर गुरु डॉक्टर सनातन संस्थेच्या कारभाराचे संस्थापक असून ते सनातनचे कार्यकर्ते, साधक आणि संत यांचे पालनपोषण करतात.
३. धर्मकार्य
धर्माला ग्लानी आलेली असतांना ईश्वर धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. परात्पर गुरु डॉ. आठवले सध्याच्या परिस्थितीत अधर्माचार बोकाळला असल्यामुळे ग्रंथ आणि साधक यांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य करीत आहेत.
४. कार्याचा उद्देश
राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प केला आहे आणि त्यासाठी ते कार्यरत आहेत.
५. अहं
ईश्वराचा अहंकार शून्य आहे. परात्पर गुरु डॉक्टरांचा अहं नियोजित कार्यासाठी ५ प्रतिशत आहे.
६. प्रीती
ईश्वर सर्व प्राणीमात्रांवर आणि सृष्टीवर प्रेम करतो. भगवंत प्रेमस्वरूप आहे. परात्पर गुरु डॉक्टर सनातनचेच नाही, तर इतर साधक आणि संत यांच्यावरही प्रेम करतात. सर्व लोकांवरचे त्यांचे प्रेम वाढतच आहे. त्यामुळे त्यांनी संतपदाचे अधिकारी असलेल्या सनातनच्याच नव्हे, तर अन्य संप्रदायांतील उन्नतांनाही सन्मानपूर्वक ‘संतपदी’ विराजमान केले आहे.
७. वेद निर्माण कार्य
ईश्वराने वेद निर्माण केले. ‘यस्य निःश्वसितं वेदाः ।’ म्हणजे ‘वेद हे ईश्वराच्या निःश्वासातून आले आहेत.’ परात्पर गुरु डॉ. आठवले पुढे ‘५ वा वेद’ म्हणून मानल्या जाणार्या ग्रंथांचे संकलन करत आहेत.
८. मोक्ष देणे
ईश्वराच्या राम, कृष्ण आदी अवतारांनी त्यांच्या आयुष्यात सहस्रो लोकांना मोक्षप्राप्ती दिली आणि ते देहत्यागानंतरही कलियुगाच्या अंतापर्यंत कोट्यवधी लोकांना मोक्ष देणार आहेत. सनातनचे सहस्रो कार्यकर्ते आणि साधक प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करून मोक्षाची वाटचाल करत आहेत.
९. दैवी गुणांचा समुच्चय
ईश्वराप्रमाणे प.पू. डॉक्टरांमध्येही अनेक दैवी गुणांचा अल्प-अधिक प्रमाणात समुच्चय असून आसुरी दोषांचा अभाव आहे.
१०. ईश्वरी तत्त्व
ईश्वरात ईश्वरी तत्त्व १०० प्रतिशत मानले, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ईश्वरी तत्त्व ५ प्रतिशत आहे. सामान्य माणसांत ईश्वरी तत्त्व १/१०००० प्रतिशत असते; म्हणून त्यांना श्रीविष्णूचे अंशावतार मानतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात