गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी ! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुर्वाज्ञा प्रमाण मानून कुर्हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात मग्न झालेला अंबाजी काही वेळाने त्या फांदीसहित विहिरीत पडला. सर्व जण घाबरले. समर्थांना हे कळताच ते तेथे आले. त्यांनी विहिरीत डोकावून विचारले, अंबाजी, कल्याण आहे ना? हो, कल्याण आहे स्वामी !, विहिरीतून उत्तर आले. चल ये तर मग वरती. समर्थांचे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला आणि समर्थांच्या कृपेने सुखरूप असल्याचे त्याने सांगितले. त्या दिवसापासून समर्थांसहित सर्व जण त्याला कल्याण या नावाने हाक मारू लागले.
एकदा सज्जनगडावर गडाच्या टोकाशी रामदासस्वामी उभे असतांना, त्यांची छाटी (वस्त्र) वार्याने उडाली. तेव्हा समर्थ उच्चारले, कल्याणा, छाटी उडाली. हे ऐकताच गुरुभक्त कल्याणस्वामींनी कड्यावरून खाली उडी घेतली आणि ती छाटी हवेतच झेलली. समर्थांनी शिष्यांची परीक्षा पहाण्यासाठी एकदा मध्यरात्री विड्याची पाने आणण्याची आज्ञा केली; पण भर रात्री पाने आणायला कोणीही सिद्ध झाले नाही. त्या वेळी कल्याणस्वामी तात्काळ निघाले, परंतु जंगलातून जात असतांना त्यांना एका विषारी नागाने दंश केला. ते मूर्च्छित झाले. बराच वेळ ते का आले नाहीत, हे पहाण्यासाठी समर्थ आले असता त्यांना रस्त्यात कल्याणस्वामी मूर्च्छित दिसले. नंतर समर्थांनी त्यांचे विष उतरवले. अशी कल्याणांची गुरुनिष्ठा होती.
(संदर्भ : संकेतस्थळ)



समर्थ रामदासस्वामी सज्जनगडावर असतांना कल्याणस्वामी प्रतिदिन त्यांच्या स्नानासाठी उरमोडी नदीतून पाण्याने भरलेले हंडे सज्जनगडावर घेऊन येत असत. हे हंडे आजही तेथे पहायला मिळतात.
३० वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी समर्थांचे सर्व साहित्य लिहून दिले. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या शिवथर घळ या ठिकाणी समर्थांनी कल्याणस्वामींकडून आपला दासबोध हा ग्रंथ लिहून घेतला. ते समर्थांना कीर्तनामध्ये साथ करत असत. तसेच त्यांच्या बरोबर सर्वत्र भ्रमण करत असत. समर्थ रामदासांनी त्यांना समाधीअवस्थेची अनुभूती दिली होती.
वर्ष १६७८ मध्ये समर्थ रामदासांनी कल्याणस्वामींना डोमगावला जाण्याची आज्ञा केली. जेव्हा समर्थ रामदासस्वामींनी वर्ष १६८१ मध्ये समाधी घेतली, त्या वेळी कल्याणस्वामी डोमगावला होते. गुरूंच्या विरहाने व्याकूळ होऊन ते सज्जनगडावर गेले, तेव्हा समाधी दुभंगून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. त्यानंतर मात्र कल्याणस्वामी सज्जनगडावर कधीही गेले नाहीत; कारण त्यांना संपूर्ण सज्जनगडच समर्थरूप भासत होता. वर्ष १७१४ मध्ये योगबलाने कल्याणस्वामींनी परांडा येथे देह ठेवला.
धन्य धन्य हे गुरुशिष्यपण । धन्य धन्य हे सेवाविधान । धन्य धन्य अभेदलक्षण । धन्य धन्य लीला अगाध
(संदर्भ : संकेतस्थळ)



नमस्कार…. धन्य ते गुरू आणि शिष्य . अशी परंपरा फक्त हिंदू धर्मातच होवून गेले.. आणि होतच आहेत, हे फक्त सनातन धर्मच अस्तित्वात असलेल्या आपल्या देशात अजूनही टिकून आहे..
जय जय श्री रामदास स्वामींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता….. मनःपूर्वक समर्पित करीत आहे….