मंगळुरू (कर्नाटक) : येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी ४ जुलैला घोषित केले. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पू. उदयकुमार यांचा श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. हा सोहळा सनातनच्या मंगळुरू येथील सेवाकेंद्रात भावपूर्णरित्या पार पडला. या वेळी सनातनच्या संत पू. राधा प्रभु यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच श्री. उदयकुमार यांचे भक्तही उपस्थित होते.
पू. उदयकुमार यांचा परिचय
पू. उदयकुमार हे गेल्या २५ वर्षांपासून ध्यानसाधना करत आहेत. रेकी आणि योगनिद्रा यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. गत जन्मांविषयी सांगणे, हेसुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते पहाटे ४.३० वाजता उठून गायत्रीमंत्राचा ५ सहस्र जप करतात आणि देवपूजेनंतर न्यूनतम् १० ते १२ घंटे ध्यान साधना करतात. आतापर्यंत जगन्मातेने (देवीने) त्यांना विविध विषयांवरील ज्ञान दिले आहे आणि आताही देत आहे. एकदा ते ध्यानात असतांना देवलोकात गेले, तेव्हा देवतांनी त्यांच्यावर ३.३० घंटे पुष्पवृष्टी केली, अशी त्यांना अनुभूती आली आहे. ज्योतिष शास्त्राविषयीही ते मार्गदर्शन करतात. त्यांनी ज्योतिष शास्त्राचे काही शिक्षण घेतलेले नसतांनाही केवळ देवीच्या कृपेने ते भविष्य सांगतात.