
‘आषाढी आणि कार्तिकी या मासांतील महाएकादशीच्या दिवशी श्री पांडुरंग आणि श्री राही-रखुमाई यांचा रथोत्सव सोहळा पंढरपूर येथे पार पडतो. वारीच्या दिवशी हा पंढरपुरातील पुण्यप्रद कार्यक्रम असतो.
आजचे पंढरपूर इसवी सन् १७१५ नंतरच्या परंपरा जपणारे आहे. त्यापूर्वी पंढरपूर फार काळ सुलतानी अंमलाखाली होते. त्यामुळे प्रथा-परंपरा यांचा लोप झालेला होता; परंतु ‘रथस्थ विठ्ठल दृष्ट्वा, पुनर्जन्म न विद्यते’ असा उल्लेख पांडुरंग महात्म्यात असल्यामुळे पूर्वीही रथोत्सव होता, हे समजते.
१. रथोत्सव पूर्वापार चालू असल्याचे काही पुरावे
शिव-पूर्वकाळातील कागदपत्रावरून असे दिसून येते की, विठ्ठलास वाहने, रथ इत्यादी अर्पण करण्याची पद्धत होती. आषाढी कार्तिकीस पालखी निघत होती. यावरून उत्सवमूर्ती आणि रथोत्सव होता, असा अंदाज बांधता येतो. पुढे पेशवाईत शाहू महाराजांच्या अष्ट प्रधानांतील मंत्र्यांनी रथातून श्री विठ्ठलाच्या पादुका फिरवल्याचा उल्लेख सापडतो.


२. जिवाजीपंत आणि मंगसुळकर यांना झालेल्या स्वप्नदृष्टांंतानुसार रथोत्सव चालू होणे
सध्या चालू असणारी परंपरा पेशव्यांचे खाजगीकडील कारभार पहाणारे शिवरामपंत उपाख्य जिवाजीपंत खाजगीवाले यांनी चालू केली आहे. आख्यायिकेनुसार जिवाजीपंतांना श्री पांडुरंगाचा दृष्टांत झाला आणि ‘आषाढी कार्तिकीस माझे दर्शन सर्वांस होत नाही; म्हणून ‘माझी उत्सवमूर्ती स्थापून रथोत्सव कर’, अशी आज्ञा आली. त्यानुसार जिवाजीपंतांनी मंगसुळकर नावाच्या कारागीरास मूर्ती निर्माण करण्यास सांगितले; परंतु दोनदा प्रयत्न करूनही ती व्यवस्थित झाली नाही. तद्नंतर जिवाजीपंतांस पुन्हा स्वप्नदृष्टांत झाला. मूर्ती सिद्ध करण्यास सांगितले. असाच दृष्टांत मंगसुळकरासही झाला. झोपेतून जागे झाल्यावर ‘जिवाजीपंतांना स्वप्नात प्रसाद दिलेला नारळ उशाजवळ आहे’, असे दिसले. यानुसार नवी मूर्ती पुन्हा ओतली. ती श्री विठ्ठलासारखी समप्रमाण झाली आणि तीच रथात मिरवली जाते. श्री विठ्ठलाने प्रसाद म्हणून नारळ दिल्याने रथोत्सवात नारळ देण्याची प्रथा आहे. यास ‘मानाचा नारळ’ म्हणतात.
खाजगीवाले यांनी मुळात श्री पांडुरंगाची स्थापना केली होती; परंतु पुढे कर्नाटकच्या एका साधूने श्री राही-रखुमाईच्या मूर्ती दिल्याचेही सांगितले जाते.
३. रानडे, लिमये, नातू आणि देवधर यांना झालेल्या स्वप्नदृष्टांतानुसार
शोध घेतल्यावर पांडुरंगाची मूर्ती मिळणे आणि त्यांनी श्री विठ्ठलाचे संस्थान निर्माण करणे
याविषयी अन्य आख्यायिका सांगितल्या जातात की, रानडे, लिमये, नातू आणि देवधर हे कोकणातून उद्योग अन् उदरनिर्वाह यांसाठी फिरत होते. त्यांनी ‘कुणा एकाचा अर्जित काळ झाल्यास साहाय्य करावे’, असे ठरले होते. हे सर्व पंढरपुरात येऊन झोपले असता, ‘श्री संत कान्हया हरिदासाच्या समाधीजवळ मी भूगर्भात आहे. मला काढा’, असे स्वप्न चौघांनाही पडले. यावर विश्वास ठेवून लिमये यांनी शोध घेतला असता त्यांच्यावर पांडुरंगाची कृपा होऊन मूर्ती मिळाली. त्यांचा भाग्योदय होऊन त्यांना सरदारी मिळाली. पूर्वीच्या वचनाप्रमाणे त्यांनी श्रीविठ्ठलाचे संस्थान निर्माण केले आणि आपल्या मित्रांना मानकरी म्हणून रथोत्सवात अन् संस्थानात मान आणि अधिकार दिले.
४. जर्नादनपंत रानडे यांनी जिवाजीपंतांच्या आज्ञेने
सदर रथोत्सव शके १६६० (इसवी सन् १७३८) मध्ये चालू करणे
पेशवे दशकातील कागदपत्रांवरून या संस्थानास इसवी सन् १७५६ मध्ये वाखरी येथील सरदेशमुखांनी अधिकार आणि पुढे माधवराव यांनी ‘कौठाळी’ हा इनाम दिला. सदर रथोत्सव शके १६६० (इसवी सन् १७३८) मध्ये जिवाजीपंतांच्या आज्ञेने जनार्दनपंत रानडे यांनी चालू केल्याचा उल्लेख ‘रानडे कुलवृत्तां’तात आहे.
५. रथोत्सव सोहळा
५ अ. स्थान
श्री पांडुरंगाची उत्सवमूर्ती संत कान्हया हरिदास यांच्या समाधीवर आहे. पंढरपूरच्या प्रसिद्ध हरिदास घराण्याचे हे पूर्वज भगवद्भक्त होते. विठ्ठलास यांच्या काकड्याने उठवले जाते.
५ आ. राही-रखुमाई आणि पांडुरंग यांच्या मूर्ती आणि त्यांचे सिंहासन
श्री पांडुरंगाची मूर्ती पंंचधातूची असून शास्त्रानुसार तिची अभिषेक पूजा केवळ एकादशीस केली जाते. त्यामुळे मूर्तीवर सर्व चिन्हे आणि लक्षणे सुस्थितीत आहेत. राही-रखुमाई यांच्या मूर्ती श्रीदेवी, भूदेवी स्वरूपात चामरधारिणी स्वरूपात असून या श्री पांडुरंगापेक्षा मोठ्या आहेत. पंढरपुरात पांडुरंग ‘दिगंबर बाळमूर्ती’ आहे. बालस्वरूप दाखवण्यासाठी मूर्ती लहान असल्याचे सांगितले जाते. श्री हा गुजराथी तर श्रीदेवी, भूदेवी दाक्षिणात्त्य पद्धतीच्या आहेत, हे त्यांच्या अलंकारांवरूनही दिसते. श्रींचे सिहांसन अत्यंत सुंदर असून पुढे गरूड आणि मागे शेषाची प्रभावळ, तर वर पंचानन सदाशिव-शंकराची मूर्ती असून त्यांच्या बाजूस श्रीगणपती अन् कार्तिक स्वामी यांच्या मूर्ती आहेत.
५ इ. सरदार खाजगीवाले यांनी रथोत्सवाची कार्यपद्धती ठरवणे
सरदार खाजगीवाले हे मुळात सरदार असल्याने त्यांनी रथोत्सवाची प्रत्येक गोष्ट, ती करण्याची पद्धत इत्यादी ठरवून दिले आहे. ही कामे करणार्या व्यक्तींना ‘मानकरी’ असे म्हणतात.
५ ई. श्री विठ्ठलास रुद्राभिषेक करणे
एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाचा रुद्राभिषेक होऊन माहेश्वरी धर्मशाळेचे मानकरी ‘इस्टी’ (एक धार्मिक विधी) करतात आणि श्रींचे मुख्य पुजारी देवधर पौरोहित्य करतात.
५ उ. मूर्ती रथावर बसवणे
यानंतर दुपारी १ च्या सुमारास श्रींची मूर्ती रथावर नेण्याची व्यवस्था चालू होते. मूर्ती रथामध्ये व्यवस्थित बसावी, सुरक्षित रहावी, त्याच वेळी सर्वांना दर्शन व्हावे, अशा पद्धतीने रथामध्ये व्यवस्था केलेली असते.
५ ऊ. श्रींपुढे अखंड कीर्तन चालू असून
‘संत मालिका’ चालवण्याचा मान हरिदास घराण्याकडे असणे
सदर अभिषेक पूजा चालू असतांना श्रींपुढे अखंड कीर्तन चालू असते. यांस ‘संत मालिका’ असे म्हणतात. ही चालवण्याचा मान हरिदास घराण्याकडे आहे. दुपारी १ च्या सुमारास रथावर ठरलेल्या गाद्या-गिरद्या, लोड यांची बैठक सिद्ध करून मूर्ती विराजमान करण्याची सिद्धता केली जाते.
५ ए. देवास मार्ग दाखवण्याचा मान हरिदास घराण्याकडे असणे
सर्व मानकरी गोळा झाल्यावर देवधर श्री पांडुरंगाची, तर नातू राही बाई यांची आणि रानडे-पोतनीस हे सर्व रखुमाबाई यांच्या मूर्ती घेऊन रथाकडे निघतात. श्रींच्या पुढे हरिदासांचे भजन चालू असते. देव हरिदासांच्या मागे मागे रथाकडे जातात. रथोत्सवात देवास मार्ग दाखवण्याचा मान हरिदास घराण्याकडे असतो. श्रींचा रथ हा लाकडी असून त्यावर मध्यभागी श्रीमूर्ती आणि कडेने मानकरी बसून हा अनुमाने २ टन वजनाचा रथ माणसांकरवी ओढला जातो. रथावर मूर्ती हालू नयेत, अशा पद्धतीने पक्क्या बसवल्या जातात.
५ ऐ. रथामध्ये आरती ओवाळण्याचा मान देवधर यांचा असणे
त्यानंतर श्रींची रथातील आरती केली जाते. ही एकारती खाजगीवाल्यांचे दिवाण श्री. वैद्य हरिदासांसमवेत आणि श्रींचे पुजारी शर्मा यांच्यासमवेत घेऊन येतात. रथामध्ये आरती ओवाळण्याचा मान देवधर यांचा आहे. या वेळी प्रथम ‘शरणागत तव चरणा’ ही प्रल्हाद महाराज बडवे यांची आरती म्हटली जाते. नंतर ‘युगे अठ्ठावीस’ ही नामदेव महाराजांची आरती होऊन रथोत्सवास आरंभ होतो. सदरच्या रथाची विविध कामे आणि बसण्याच्या जागा नेमून दिलेल्या आहेत. विठ्ठलाचे पायी भेदाभेद अमंगळ असल्याने त्या रथावर सर्व १८ पगड जातींचे मानकरी असतात. श्रींच्या उजव्या अंगास मागील बाजूस नातू आणि त्यांच्या पुढे बडवे बसतात, तर श्रींच्या डाव्या बाजूस श्रींचे पुजारी देवधर बसतात.
५ ओ. रथाचे संचलन करण्यासाठी श्रींच्या उजव्या आणि डाव्या बाजूस चवरीवाले असणे
हा रथ माणसांच्या गर्दीतून कोणतेही आधुनिक गतीरोधक वगैरे साधन नसतांना माणसांकडूनच ओढला जातो. यामुळे रथाचे संचलन करण्यासाठी श्रींच्या उजव्या आणि डाव्या बाजूस चवरीवाले बसलेले असतात. त्यांच्या हातात वन गायीच्या शेपटीच्या केसांपासून निर्माण केलेल्या चवर्या असतात. त्या हलवून रथ चालवणे किंवा थांबवणे यांच्या खुणा केल्या जातात. यातील उजवी चवरी सरदार खाजगीवाल्यांचे कारभारी रानडे – पोतनीस यांच्याकडे आहे. तर डावी चवरी पुजारी – देवधर यांच्याकडे असते.
५ औ. रथ ओढण्याचा मान पंढरपूरच्या वडर समाजातील घराण्याकडे असणे
रथाच्या दुसर्या टप्प्यावर श्रींचे दिवाण श्री. वैद्य आणि शेपाधारी कर्वे बसतात. श्रींचे मागे बारसकर, हवालदार ही श्रींचे संरक्षण करणारी मंडळी बसतात. रथाच्या पुढे सुपली नामक भाग आहे. तेथे पवार आणि लोहार समाजाचे प्रतिनिधी, तर सगर हे गवंडी समाजाचे प्रतिनिधी बसलेले असतात. रथ ओढण्याचा मान पंढरपूरच्या वडर समाजातील घराण्याकडे आहे. त्यातसुद्धा डाव्या आणि उजव्या बाजूस उभारायचे मुख्य मानकरी आहेत. यांना ‘नाईक’ असे म्हणतात.
५ क. रथापुढे घोडा मिरवण्याचा मान कासेगाव येथील देशमुख घराण्याकडे असणे
या सोहळ्याच्या बंदोबस्ताचे काम पूर्वी पंढरपूरचे कासेगाव येथील वतनदार देशमुख यांच्याकडे असे. यामुळे आजही रथापुढे घोडा मिरवण्याचा मान कासेगाव येथील देशमुख घराण्याकडेच आहे. रथामध्ये इशार्याकडे लक्ष देऊन रथ चालू करणे अथवा थांबवणे, ही कामे नाईक मंडळी कौशल्याने करतात. रथ अडवण्यासाठी प्रसंगानुसार लाकडी ठोकळे टाकले जातात. याला ‘उटी’ असे म्हणतात. ही सर्व कामे परंपरेनुसार केली जातात. रथातील सर्व मानकर्यांना पूर्वी सरदार खाजगीवाले यांनी इनामेही करून दिली होती.
५ ख. रथोत्सवाचा मार्ग
रथोत्सव माहेश्वरी धर्मशाळा (खाजगीवाल्यांचा जुना वाडा) येथून चालू होऊन प्रदक्षिणा मार्गाने सायंकाळी ६ च्या सुमारास परत येतो. परंपरेनुसार पंढरपुरात रहाणार्या जुन्या घराण्यांकडून रथाची पूजा केली जाते. या पूजेसाठी आणि दर्शनासाठी रथ जागोजागी थांबवला जातो. रथावर खारीक, पैसे, बुक्का, अष्टगंध इत्यादींची अखंड उधळण चालू असते.
५ ग. देवधर, नातू, रानडे हे मानकरी मूर्ती घेऊन गर्भगृहाकडे जाणे
सायंकाळी श्री विठ्ठल येतात. पुन्हा दुपारच्या पद्धतीने आरती केली जाते आणि हरिदासाच्या मागे देवधर, नातू, रानडे हे मानकरी मूर्ती घेऊन गर्भगृहाकडे जातात. तेथे श्रींचा पोषाख पालटला जातो. या वेळी श्रींसमोर सेवाधारी हरिदास यांची भजन सेवा चालू होते. श्रींची मूर्ती पुन्हा रथावर स्थानापन्न झाल्यावर बडवे आरती ओवाळतात.
५ घ. श्रींच्या मूर्तीपाशी मुख्य मानकर्यांना बडवे
यांच्याकडून प्रसादाचा नारळ देण्यात येणे आणि सोहळ्याची सांगता होणे
या वेळी श्रींच्या मुख्य मंदिरात काकडा म्हणून म्हटली जाणारी कान्हया हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. यानंतर रथोत्सवाच्या सांगतानिमित्ताने ‘मानाच्या नारळा’चा कार्यक्रम चालू होतो. श्रींची मूर्ती कान्हया हरिदास यांच्या समाधीवर असून त्यांच्या वंशजांना सरदार खाजगीवाले यांचे प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठलाच्या वतीने मानाचे पागुटे बांधण्यात येतात. या वेळी प्रसादाचे अभंग म्हणण्याची चाल आहे. सदर पागुटे बांधून झाल्यावर श्रींच्या मानकर्यांना सरदार खाजगीवाले यांच्या वतीने माहेश्वरी संस्थानचे विश्वस्त नारळ देतात आणि बडवे मुख्य मानकर्यांना श्रींच्या मूर्तीपाशी प्रसादाचा नारळ देतात. येथेच सोहळ्याची सांगता होते.’
– अधिवक्ता सुधीर उपाख्य धनंजय रानडे, पंढरपूर