अनुक्रमणिका
- १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसतांनाही शबरीप्रमाणे उत्कट भक्तीने गुरूंची कृपा संपादन करणार्या पू. (सौ.) पाटीलआजी !
- २. न कंटाळता नामजप करणार्या आणि अंत:करणात गुरुमाऊलीच्या कृपेने नाम कोरणार्या पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
- ३. पू. (सौ.) पाटीलआजी यांनी काढलेले भावोद्गार !
- ४. पू. आजींच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
- ४ अ. गावातील लोक पत्नीला ‘लक्ष्मी’ म्हणायचे ! – श्री. जामराव पाटील (वय ८२ वर्षे) (पू. आजींचे यजमान)
- ४ आ. भावसोहळ्यातून श्रीकृष्णाविषयी कृतज्ञता वाटली ! – श्री. वसंत पाटील (पू. आजींचे पुत्र)
- ४ इ. पू. आजींनी सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून सांभाळ केला ! – सौ. वनिता पाटील (पू. आजी यांच्या स्नुषा)
- ४ ई. आजी आज ‘पू. आजी’ होणार, असा विचार मनात आला ! – कु. जयेश पाटील (पू. आजींचा नातू)
- ५. पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनाच्या वेळी पू. आजींना आलेली अनुभूती
- ६. पू. (सौ.) पाटीलआजी यांना आलेल्या अनुभूती
- ७. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
- ८. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
- ९. आजींना आलेली अनुभूती
- ९ अ. प.पू. गुरुदेवांचे शेषनागावर पहुडलेेल्या श्रीविष्णूच्या रूपात २ वेळा दर्शन होणे
- ९ आ. परीक्षेच्या वेळी आजींची आठवण झाल्यावर त्यांचाच भ्रमणभाष येणे आणि त्यांच्याशी बोलल्यावर प्रश्नपत्रिकेतील कठीण प्रश्नांची उत्तरे सहज आठवणे
- ९ इ. आजींशी बोलल्यावर आवरण नाहीसे झाल्याचे जाणवणे
- ९ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी सौ. पाटीलआजी उपस्थित असतांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
- ९ उ. चांगली स्पंदने प्रक्षेपित होणे
- ९ ऊ. आजींना पाहून अंतर्मुखता वाढणे
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसतांनाही
शबरीप्रमाणे उत्कट भक्तीने गुरूंची कृपा संपादन करणार्या पू. (सौ.) पाटीलआजी !
त्रेतायुगात शबरीने प्रभु श्रीरामाला प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही सतत त्याचे स्मरण केले. त्या स्मरणामध्ये आर्तता आणि उत्कट भाव होता. त्यामुळे भगवंतालाही शबरीला भेटण्याची ओढ लागली आणि रामरायांनी तिला दर्शन दिले. त्याचप्रमाणे पू. (सौ.) पाटीलआजी यांचे आहे. लिहिता-वाचता येत नसलेल्या आणि एका छोट्याशा खेड्यात रहाणार्या पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष कधीच पाहिलेले नसतांना सतत गुरुदेवांचे उत्कट स्मरण केले. गुरुमाऊलींवर अपार श्रद्धा ठेवली. त्यामुळेच कृपाळू गुरुमाऊलीने त्यांच्यावर कृपा केली. पू. आजींना पाहिल्यावर एकच वाटते की, कलियुगातील ‘शबरी’ म्हणजे पू. (सौ.) पाटीलआजी !
२. न कंटाळता नामजप करणार्या आणि अंत:करणात गुरुमाऊलीच्या कृपेने
नाम कोरणार्या पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
जळगाव : सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेली ‘नाम हाच गुरु’ ही शिकवण किती यथार्थ आहे, याची अनुभूती साधकांना येथील सेवाकेंद्रात झालेल्या भावसोहळ्यात आली. बोर्खेडे बु., तालुका चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे वास्तव्य असणार्या सौ. केवळबाई जामराव पाटीलआजी यांनी श्रद्धापूर्वक आणि आर्ततेने नामजप करून, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही त्यांंच्याप्रती अपार श्रद्धा ठेवून संतपद गाठले आहे, असे सनातनचे सद्गुुरु नंदकुमार जाधव यांनी २ जुलै या दिवशी घोषित केले. या आनंदवार्तेने येथील सर्वच साधकांचा गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता भाव दाटून आला.
येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अलका ठाकरे यांनी पू. पाटीलआजींचा पुष्पहार घालून सन्मान केला. त्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पू. आजींना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा भेट दिली.
३. पू. (सौ.) पाटीलआजी यांनी काढलेले भावोद्गार !
१. शबरीचा प्रभु रामचंद्रांप्रती जसा भाव होता, तसाच भाव मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती ठेवला होता. त्यामुळे कृपाळू गुरुदेवांनी मला जवळ केले.
२. मला लिहिता-वाचता येत नसल्याने मी कधी ग्रंथ वाचले नाहीत; पण माझ्या साधनेचा आढावा मी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रतिदिन देत असे. काही चुकले, तर त्याविषयी प्रायश्चित्तही घ्यायचे.
३. कधी कधी नामजप करायला कंटाळा यायचा. त्याचे कारण कळत नव्हते. साधकांना संपर्क करून याविषयी सांगितल्यावर कळायचे की, आता नामजप पालटला आहे. किती त्या कृपाळू गुरुमाऊलींची कृपा ! ते ‘उपायांचा नामजप पालटला आहे’, अशी आम्हाला जाणीव करून द्यायचे.
४. मला दुसरे काहीच करता येत नसल्याने गुरुमाऊलीने दिलेले नाम मात्र मी सतत घेण्याचा प्रयत्न केला. अगदी स्वयंपाक करतांना, घरातील किंवा शेतातील कामे करतांना, तसेच अन्य काहीही करतांना मी नामजप करण्याचा प्रयत्न करायचे. नियमितपणे बसूनही नामजप करायचे. उगाच अनावश्यक बोलण्यापेक्षा मी नामजप करत रहायचे. त्यामुळे गुरुमाऊलीने त्यांचे नाम माझ्या हृदयातच कोरून ठेवले. आता आतून सतत नाम चालू असते, ही गुरुदेवांचीच कृपा !
५. मला सतत मनातून गुरुदेवांशी बोलायला आवडत असे. मी प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करते. तेच मला शिकवतात. माझा हट्ट ते नेहमी पुरवतात. मी जरी गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिले नसले, तरी गुरुदेवांनी मला वेगवेगळ्या रूपांत दर्शन दिले.
४. पू. आजींच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
४ अ. गावातील लोक पत्नीला ‘लक्ष्मी’ म्हणायचे !
– श्री. जामराव पाटील (वय ८२ वर्षे) (पू. आजींचे यजमान)
पत्नीचा स्वभाव पूर्वीपासूनच शांत आहे. मी जर चिडलो, तर तीच माझी समजूत काढायची. गावातील लोक तिला ‘आक्काबाई’ या नावाने हाक मारतात. काही जण म्हणायचे ‘‘ही लक्ष्मी मिळाली नसती, तर तुमचा संसार झालाच नसता.’’
४ आ. भावसोहळ्यातून श्रीकृष्णाविषयी कृतज्ञता वाटली ! – श्री. वसंत पाटील (पू. आजींचे पुत्र)
भक्तीभाव कसा असावा, हे मला आईकडून शिकायला मिळाले. आईने फार तपश्चर्या केली आहे. माझ्या लहानपणी एकदा समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील एक संत गावात आले होते. ते कुणाकडेही काहीही खात नसत; पण आईकडे (पू. आजींकडे) त्यांनी स्वतःहून येऊन भोजन ग्रहण केले. याविषयी गावातील सर्वांनी पुष्कळ आश्चर्य व्यक्त केले. या सोहळ्यामुळे भगवान श्रीकृष्णाविषयी कृतज्ञता व्यक्त होत आहे. अशा सात्त्विक आई-वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचे भाग्य मिळाले, ही देवाचीच कृपा आहे.
४ इ. पू. आजींनी सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून
सांभाळ केला ! – सौ. वनिता पाटील (पू. आजी यांच्या स्नुषा)
हा आनंद शब्दातून व्यक्त करणे कठीण आहे. संतरूपी सासूबाई मिळाल्याने देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. अमृत महोत्सवाच्या वेळीही आजींकडे पाहून पुष्कळ चांगले जाणवत होते. आजींनी कधीही मला सून म्हणून वागवले नाही. मुलगी म्हणूनच त्यांनी माझा सांभाळ केला. त्या अत्यंत शांत, संयमी आणि समजून घेणार्या आहेत. या सोहळ्यामुळे गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी अल्पच आहे.
४ ई. आजी आज ‘पू. आजी’ होणार, असा
विचार मनात आला ! – कु. जयेश पाटील (पू. आजींचा नातू)
मी आजीला कधीही रागावलेले पाहिले नाही. कठीण प्रसंगातही ती स्थिर असायची. बाबांनी सकाळी ‘जळगावला जायचे आहे’, असे सांगितले, तेव्हा मनात विचार आला, ‘आजी आज ‘पू. आजी’ होणार.’
५. पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनाच्या वेळी पू. आजींना आलेली अनुभूती
पू. आजी पांडुरंगाच्या निस्सीम भक्त आहेत. एकदा त्या आणि श्री. पाटील पंढरपूर येथे वारीला गेले होते. तेथे पू. आजींना वाटले, ‘विठ्ठलाच्या चरणांवर नमस्कार केल्यावर पुजार्यांनी तेथून उठवूच नये.’ त्या वारीतच त्यांना २ तरुण भेटले. आजी त्यांना ओळखत नव्हत्या. ते तरुण सर्वांना सांगायचे, ‘हे आमचे आई-वडील आहेत.’ एवढ्या गर्दीतून वाट काढत त्यांनी आम्हाला विठोबाच्या चरणांशी नेले. तेथे डोळे भरून विठोबाचे दर्शन झाले. पुजार्यांनीही मनोभावे दर्शन घेऊ दिले. ‘हे केवळ माझ्या विठ्ठलामुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे) शक्य झाले’, याची मला निश्चिती आहे. नंतर ते दोन तरुण गर्दीतून कुठे निघून गेले, ते कळलेच नाही. गुरुदेवांनी मला एवढ्या अनुभूती दिल्या आहेत की, त्यातून मी परात्पर गुरुमाऊलीला अपेक्षित असे मोठे ग्रंथ लिहू शकले असते; पण मला लिहिता-वाचता येत नाही.
६. पू. (सौ.) पाटीलआजी यांना आलेल्या अनुभूती
या सोहळ्याच्या वेळी पू. आजींनी त्यांना आलेल्या अनुभूती सर्व साधकांना सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘‘मला प्रतिमास १ सहस्र रुपयांच्या औषधांच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या; मात्र गुरुदेवांच्या कृपेने या गोळ्या आता मला घ्याव्या लागत नाहीत. श्री. पाटील (पू. आजींचे यजमान) यांचे गुडघे दुखायचे, तेव्हा कापूर आणि विभूती लावल्याने त्यांना लगेच बरे वाटायचे. गावातील एक महिला ‘मला काहीतरी औषध द्या’, म्हणून मागायला आली, तेव्हा मी तिला उदबत्तीची विभूती लावून नामजप करायला सांगितला. त्यामुळे त्या महिलेची व्याधी दूर झाली. कुणीही औषध मागितल्यास मी त्यांना नामजप करायला सांगायचे. ’’
७. कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
७ अ. श्री. वसंत पाटील (मुलगा), नंदुरबार
७ अ १. ‘आम्ही ‘आईला राग किंवा प्रतिक्रिया आल्या आहेत’, असे कधीच पाहिले नाही.
७ अ २. ‘ती सतत मनातल्या मनात देवाशी बोलते’, असे जाणवते.
७ अ ३. संतांचे त्वरित आज्ञापालन करणे : एकदा आई नंदुरबारहून चाळीसगावला येऊन चार दिवस झाले होते. आईला ‘नंदुरबार येथील हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहावे’, असा निरोप मिळताच ती रात्रीचा प्रवास करून तत्परतेने सभेला उपस्थित राहिली. आई ‘संतांचे आज्ञापालन त्वरित करते’, हे अनेक प्रसंगांतून अनुभवले.
७ आ. सौ. वनिता पाटील (सून), नंदुरबार
७ आ १. प्रेमळ : ‘पाटीलआजी या माझ्या सासूबाई आहेत’, असे मला कधीच वाटले नाही. त्या माझ्याशी कधीही अधिकारवाणीने बोलल्या नाहीत. त्या पुष्कळ प्रेमळ असून सगळ्यांची पुष्कळ काळजी घेतात.
७ आ २. सेवेत साहाय्य करणे : मी सेवा करायला निघतांना त्या मला सर्व साहित्य हातात देतात. मी सेवेला गेल्यावर त्या घरातील सर्व आवरून ठेवतात.
७ आ ३. त्या सतत नामस्मरण करतात.
७ आ ४. भाव : त्यांचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. ‘प्रत्येक प्रसंगात देव पाठीशी आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्या नेहमी ईश्वरेच्छेने वागतात.’
८. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
८ अ. शांत आणि स्थिर : ‘आजींना जेवायला कितीही उशीर झाला, तरी त्या शांत आणि स्थिर असतात.’ – श्री. योगेंद्र जोशी, नंदुरबार
८ आ. सेवेची तळमळ : ‘अमृत महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सोहळा बघण्याची सिद्धता चालू असतांना आजी आल्यावर त्यांनी लगेच ‘माझ्यासाठी काही सेवा आहे का ?’, असे आवर्जून विचारले.’ – सौ. भारती पंडित, नंदुरबार
८ इ. भावावस्थेत असणे : ‘आजींचा तोंडवळा तेजस्वी दिसतो. ‘त्या सतत भावावस्थेत आहेत’, असे जाणवते.’ – सौ. छाया सोनार, कु. भावना कदम आणि डॉ. नरेंद्र पाटील, नंदुरबार
८ ई. ‘आजींचा अंतर्मनातून नामजप चालू असतो’, असे जाणवले.’ – श्री. योगेंद्र जोशी
८ उ. ‘त्या प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात असून ‘तेच कर्ता-करविता आहेत’, असा त्यांचा भाव असतो.’ – कु. भावना कदम
९. आजींना आलेली अनुभूती
९ अ. प.पू. गुरुदेवांचे शेषनागावर पहुडलेेल्या श्रीविष्णूच्या रूपात २ वेळा दर्शन होणे
‘आईला प.पू. गुरुदेवांनी शेषनागावर पहुडलेेल्या श्रीविष्णूच्या रूपात दोन वेळा दर्शन दिले आहे. ‘प.पू. गुरुदेव साक्षात् ईश्वर आहेत’, हे ती पूर्वीपासून सांगत आहे.
९ आ. परीक्षेच्या वेळी आजींची आठवण झाल्यावर त्यांचाच भ्रमणभाष येणे
आणि त्यांच्याशी बोलल्यावर प्रश्नपत्रिकेतील कठीण प्रश्नांची उत्तरे सहज आठवणे
‘माझी १० वीची परीक्षा जवळ आल्यावर ‘आजीशी बोलूया’, असा विचार केला. तेवढ्यात आजीनेच भ्रमणभाष केला. ‘आजीची आठवण झाल्यावर तिला भ्रमणभाष करायचा विचार केल्यावर तिचाच भ्रमणभाष येतो’, असे मला तीन वेळा अनुभवायला आले. तिच्याशी बोलल्यावर मला प्रश्नपत्रिकेतील कठीण प्रश्नांची उत्तरे सहज आठवली.’ – कु. जयेश पाटील (नातू), नंदुरबार
९ इ. आजींशी बोलल्यावर आवरण नाहीसे झाल्याचे जाणवणे
‘आईशी भ्रमणभाषवर बोलल्यावर पुष्कळ वेगळे वाटते. ‘माझ्यावरील आवरण नाहीसेे झाले आहे’, असे वाटते.’ – श्री. वसंत पाटील
९ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी
सौ. पाटीलआजी उपस्थित असतांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
९ ई १. लांबचा प्रवास करूनही तोंडवळ्यावर थकवा न जाणवणे
‘आजी अमृत महोत्सवाचा कार्यक्रम संगणकावर पहाण्यासाठी लांबचा प्रवास करून आल्या होत्या; परंतु त्यांच्या तोंडवळ्यावर जराही थकवा जाणवला नाही. त्या कार्यक्रम चालू असतांना दोन्ही दिवस पाणी पिण्यासाठीही उठल्या नाहीत.’ – श्री. भरत पंडित, नंदुरबार
९ ई २. ‘त्यांच्याकडे पाहून मला शांत वाटत होते आणि नामजपाची आठवण होत होती.’ – सौ. निवेदिता जोशी, नंदुरबार
९ ई ३. ‘अमृत महोत्सवाच्या पूर्ण कार्यक्रमात पाटीलआजी भावावस्थेत आणि आनंदात आहेत’, असे जाणवले. – सौ. भारती पंडित
९ उ. चांगली स्पंदने प्रक्षेपित होणे
‘अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी दोन्ही दिवस मला त्यांच्या चरणांजवळ बसण्याची संधी मिळाली. तेव्हा मला ‘त्यांच्याकडून चांगली स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवले.’ – डॉ. नरेंद्र पाटील
९ ऊ. आजींना पाहून अंतर्मुखता वाढणे
‘अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी आजींकडे पाहिल्यावर ‘सद्गुरु तुझे मी धरिते चरण । देह नाशवंत माझा झाला पावन ॥’ या भावगीताची आठवण झाली. माझी अंतर्मुखता वाढून माझा नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता होत होती.’ – कु. भावना कदम
टीप : हा लेख पू. (सौ.) पाटीलआजी संत होण्यापूर्वीचा असल्याने त्यांचा उल्लेख सौ. पाटीलआजी असा आला आहे.