प.पू. डॉक्टरांनी अथक परिश्रम घेऊन बसवलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची घडी आणि सिद्ध झालेले प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या भजनांच्या ध्वनीफिती हे संस्थेचे पहिलेे उत्पादन !

१. ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी
लागणारे साहित्य इतरांकडून मागून आणणे किंवा भाड्याने आणणे

        मी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ध्वनीचित्रीकरणाची सेवा करू लागलो. सनातनची निर्मितीच मुळी शून्यातून झालेली असल्याने वर्ष १९९० ते १९९७ या कालावधीत ध्वनीक्षेपक (माईक), ध्वनीमुद्रक (टेपरेकॉर्डर), ध्वनीचित्रक (व्हिडिओे कॅमेरा), छायाचित्रक (फोटो कॅमेरा), संकलनासाठी लागणारा व्हि.सी.आर्. आदी ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण करण्यासाठी लागणारे साहित्य नव्हते. हे सर्व साहित्य प.पू. डॉक्टर इतरांकडून मागून आणायचे किंवा शक्य असेल तिथे भाड्याने आणून कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण किंवा ध्वनीचित्रीकरण केले जायचे. असे करणे नेहमीच शक्य नसायचे.

चित्रीकरणातील बारकावे समजावून सांगतांना डावीकडून प.पू. डॉक्टर आठवले आणि कु. पूनम साळुंखे (२००८)

 

२. पुष्कळ कष्ट घेऊन प.पू. डॉक्टरांनी ध्वनीफिती आणि
ध्वनीचित्रफिती यांचे संकलन विविध बारकाव्यांनिशी शिकवणे

        ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेला आरंभ केल्यानंतर ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण कसे करायचे ? त्यासाठी प्रकाशयोजना कशी असायला हवी ? संकलन कसे करायचे ? या सर्व गोष्टी स्वतः प.पू. डॉक्टरांनी मला शिकवल्या. प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज. यांना सर्व जण बाबा म्हणत.) वेळोवेळी गायलेली भजने, त्या वेळी भक्तांसमवेत झालेले त्यांचे बोलणे आणि प.पू. बाबांचे वेगवेगळ्या ठिकाणी झालेले कार्यक्रम या सर्वांच्या ध्वनीफिती अन् ध्वनीचित्रफिती प.पू. बाबांच्या भक्तांकडून घेऊन प.पू. डॉक्टरांनी त्या संग्रहित केल्या होत्या. आरंभी प.पू. डॉक्टरांनी मला प.पू. बाबांनी गायलेल्या भजनांच्या ध्वनीफितींचे संकलन (ऑडिओ एडिटींग) करायला शिकवले. त्यानंतर प.पू. बाबांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ध्वनीचित्रफितींचे संकलन (व्हिडिओे एडिटींग) करायला शिकवले. कार्यक्रमाला अनुसरून मुख्य मथळा कसा द्यायचा ? कार्यक्रमाचे स्थळ, दिनांक आणि पत्ता कुठे घालायचा ? संत आणि भक्त यांच्या नावांच्या तळपट्ट्या कशा घालायच्या ? या सर्वांची रंगसंगती सात्त्विक कशी करायची ? कोणत्या दृश्याने कार्यक्रमाचा आरंभ करायचा ? दृश्यांची सलगता राखण्यासाठी कोणकोणती दृश्ये निवडायची ?, निवडलेल्या दृश्यांचे समयांक (काऊंटर्स) कसे लिहायचे ? निवेदन कसे लिहायचे ? व्हि.सी.आर्. टेपचे हेड कधी आणि कसे स्वच्छ करायचे ? अशा संकलनातील आणि तांत्रिक स्तरावरील एक ना अनेक बारीक-सारीक गोष्टी प.पू. डॉक्टरांनी स्वतः शिकवल्या. मला शिकवण्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले आणि मला घडवले. यासाठी त्यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.

श्री. दिनेश शिंदे

३. प.पू. भक्तराज महाराज यांनी
गायलेल्या भजनांच्या ध्वनीफिती सिद्ध करणे

३ अ. प.पू. डॉक्टरांनी समष्टीला आध्यात्मिक स्तरावर उपयुक्त अशा
गोष्टींचा विचार करून ध्वनीफिती सिद्ध करण्यासाठी भजनांची निवड करणे

वर्ष १९९२ ची गुरुपौर्णिमा मुंबई येथे होती. प.पू. बाबा त्याला उपस्थित रहाणार होते. या निमित्ताने प.पू. बाबांनी गायलेल्या भजनांच्या ध्वनीफिती सिद्ध करण्याचे प.पू. डॉक्टरांनी ठरवले. या भजनांची विषयानुरूप वर्गवारी करून त्यांचे १२ भाग करायचे त्यांनी ठरवले. यासाठी प.पू. डॉक्टरांनी स्वतः प.पू. बाबांच्या भक्तांकडून गोळा केलेल्या २०० ते २५० ध्वनीफिती ऐकल्या. त्यांतील निवडक भजने घेण्याचे ठरवले. यासाठी वाद्यांना महत्त्व न देता प.पू. बाबांचे शब्द नीट ऐकू येतात ना ? भजन ऐकतांना कोणती अनुभूती येते ? अशा आध्यात्मिक स्तरावरील निकषांवर ही निवड केली. अशी भजने निवडण्यामागे प.पू. डॉक्टरांचा एकच विचार होता, तो म्हणजे समष्टीला आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा !

३ आ. संकलित केलेले प्रत्येक भजन प.पू. डॉक्टरांनी स्वतः पडताळून अंतिम करणे

प.पू. बाबा भजन म्हणतांना पुष्कळदा काही पंक्ती परत परत म्हणत असत. अशा भजनांचे संकलन करतांना एकच ओळ घ्या, असे प.पू. डॉक्टर सांगायचे. त्या वेळी आतासारखे संगणकावर संकलन करण्यासाठी संगणक नव्हते. टेपरेकॉर्डरवर ती भजने संकलित केली जायची. ती ओळ एकदाच घेऊन बाकीच्या ओळी पुसून टाकण्यासाठी अनेक घंट्यांचा कालावधी लागत असे. अशा पद्धतीने संकलित केलेले प्रत्येक भजन प.पू. डॉक्टर स्वतः ऐकून अंतिम करत.

३ इ. भजने संकलित करतांना भजनांमुळे येणार्‍या अनुभूतींत न रमू
देता प.पू. डॉक्टरांनी समष्टीचा विचार आणि वेळेचे महत्त्व मनावर बिंबवणे

प.पू. बाबांनी गायलेली भजने संकलित करतांना भजने परत-परत ऐकत रहावीशी वाटणे, शांत वाटणे, ध्यान लागणे अशा विविध प्रकारच्या अनुभूती यायच्या. कधीकधी त्या अनुभूतींमध्येही माझा बराच वेळ जायचा. त्या वेळी समष्टीचा विचार आणि त्यासाठी वेळेचे पालन महत्त्वाचे आहे, असे सांगून प.पू. डॉक्टर जाणीव करून द्यायचे. यातून माझी समष्टी साधना व्हावी, ही त्यांची तळमळ असायची.

३ ई. प.पू. भक्तराज महाराज यांनी
गायलेल्या भजनांच्या ध्वनीफिती हे संस्थेचे पहिले-वहिले उत्पादन !

करता करता प.पू. बाबांनी गायलेल्या भजनांच्या ध्वनीफितींचे १२ भाग सिद्ध झाले. हे सनातनचे प.पू. बाबांच्या भक्तांसाठी आणि सनातन संस्थेच्या साधकांसाठी ना लाभ ना घट (ना नफा ना तोटा) या धर्तीवर काढलेले पहिले-वहिले उत्पादन ! या ध्वनीफितींचे प्रकाशन ठरल्याप्रमाणे वर्ष १९९२ च्या मुंबई येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी प्रत्यक्ष प.पू. बाबांच्याच करकमलांनी करण्यात आले. आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन पहिल्यांदा अल्प संख्येत ध्वनीफितींच्या प्रती काढल्या आणि विक्रीसाठी ठेवल्या. जेवढ्या ध्वनीफितींची विक्री व्हायची, तेवढ्याच ध्वनीफिती पेठेतून विकत आणून पुन्हा मूळ ध्वनीफितीच्या प्रती काढल्या जायच्या. हे सारे करतांना मी एकटाच असल्याने दमछाक व्हायची; परंतु त्यात आनंदही तितकाच असायचा.

 

४. प.पू. डॉक्टरांची प्रवचने आणि मार्गदर्शन यांच्या ध्वनीफिती सिद्ध करणे

४ अ. घरगुती ध्वनीमुद्रकावर ध्वनीमुद्रण करून
प.पू. डॉक्टरांची प्रवचने आणि मार्गदर्शन यांच्या ध्वनीफिती सिद्ध करणे

वर्ष १९९० ते १९९७ या कालावधीत अध्यात्मप्रसाराचा भाग म्हणून प.पू. डॉक्टरांची अनेक ठिकाणी प्रवचने आणि साधकांना मार्गदर्शने आयोजित करण्यात आली होती. त्या सर्वांचे ध्वनीमुद्रण आणि चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. काही ठिकाणी मात्र साधकांकडे उपलब्ध झालेल्या घरगुती ध्वनीमुद्रकावर (टेपरेकॉर्डवर) आम्ही प्रवचन आणि मार्गदर्शन यांचे ध्वनीमुद्रण करू शकलो. त्यामुळे त्याची गुणवत्ता तांत्रिकदृष्ट्या म्हणावी तेवढी चांगली मिळू शकली नाही. अध्यात्मप्रसार हेच प.पू. डॉक्टरांच्या कार्याचे एकमेव उद्दिष्ट असल्यामुळे या प्रवचनांच्या आणि मार्गदर्शनांच्या काही ध्वनीफिती आम्ही सिद्ध केल्या. पुढे त्यांचे वितरणही होऊ लागले.

४ आ. तांत्रिकदृष्ट्या निम्न गुणवत्तेच्या
ध्वनीफिती प.पू. डॉक्टरांच्या चैतन्यमय वाणीमुळे
साधना करणार्‍या जिवांना आजही आकर्षून घेत असणे

तांत्रिकदृष्ट्या ध्वनीफितींची गुणवत्ता चांगली नसूनही प.पू. डॉक्टरांनी विषय सहजपणे मांडलेला असल्यामुळे आणि त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे त्यांची प्रवचने आणि साधकांना केलेली मार्गदर्शने यांच्या ध्वनीफिती आजही पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात. त्यांमधील चैतन्य साधना करणार्‍या जिवांना आकर्षून घेते. आजही साधकांना ही मार्गदर्शने आणि प्रवचने ऐकतांना आध्यात्मिक उपाय होणे, मन निर्विचार होणे, ध्यान लागणे, तसेच प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे यांसारख्या अनुभूती येतात. आध्यात्मिक स्तरावर विचार करता या ध्वनीफितींमधील गोडी अवीट आहे.

– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०१६)

 

असा मिळाला पहिला ध्वनीचित्रक (व्हिडिओे कॅमेरा) !

        प.पू. डॉक्टर ठिकठिकाणी अध्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग घ्यायचे. वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉक्टर घेत असलेल्या अभ्यासवर्गाला ठाणे येथील श्री. श्रीकांत पाटील येत असत. त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा ध्वनीचित्रक (व्हिडिओे कॅमेरा) होता. त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या डोंबिवली येथील अभ्यासवर्गाचे चित्रीकरण केले होते. पुढे संस्थेचेे कार्य पाहून त्यांनी त्यांचा व्हिडिओे कॅमेरा संस्थेच्या कार्यासाठी अर्पण केला. त्या काळी त्या व्हिडिओे कॅमेराची किंमत जवळजवळ ७० ते ८० सहस्र रुपये एवढी होती. हा ध्वनीचित्रीकरण सेवेसाठी अर्पण मिळालेला पहिला व्हिडिओे कॅमेरा होता.

 

प.पू. डॉक्टरांनी सेवेत एकाने घडायचे आणि त्याने
अनेकांना घडवायचे, हा दृष्टीकोन देऊन समष्टी साधना करवून घेणे

        प.पू. भक्तराज महाराज यांच्या सर्व ध्वनीफितींचे आणि ध्वनीचित्रफितींचे संकलन प.पू. डॉक्टरांनी करून घेतले. हे संकलन ते स्वतः पडताळत आणि त्यातील त्रुटीही दाखवत. त्यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन शिकायला मिळायचे. त्या वेळी त्यांनी सांगितलेले वाक्य आजही आठवते. ते म्हणाले होते, संकलन करणारा आणि चित्रीकरण करणारा असा तयार व्हायला हवा की, तो पुढे इतरांना तयार करील ! त्यामुळे चित्रीकरणासाठी आणि संकलनासाठी आपल्याकडे साधक नाही, असे होणार नाही. प.पू. डॉक्टरांच्या या उद्गारांची सत्यता आज २५ वर्षांनंतर मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. आज ध्वनीचित्रीकरण सेवेअंतर्गत अनेक उपसेवा निर्माण झाल्या आहेत आणि या सर्व सेवांत अनेक साधक सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे त्यांनी मला घडवून पुढे समष्टी साधना करण्याची संधी दिली. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– श्री. दिनेश शिंदे

Leave a Comment