रामनाथी, गोवा : येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यासह सनातनचे उत्तर महाराष्ट्र धर्मप्रसारक पू. नंदकुमार जाधव, तसेच देहत्याग केलेल्या पू. (सौ.) आशालता सखदेव आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे देहत्याग केलेले ज्येष्ठ बंधू पू. (डॉ.) वसंत आठवले सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थित सर्वांनीच ‘अनंत आनंदा’ची अनुभूती घेतली. सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यानंतर त्यांनी, तसेच त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
पूर्वी मला वाटायचे की, आपण गुरुऋण फेडायला पाहिजे. आता ‘गुरूंचे ऋण कधीही फेडू शकत नाही’, याची अनुभूती येत आहे; कारण गुरूंचे ऋण फेडण्यासाठीही त्यांचेच साहाय्य घ्यावे लागते. त्यामुळे ते वृद्धींगतच होत जाते. जसे अधिकोषाकडून अधिकाधिक ऋण घेतल्यास अधिकोष आपल्यावर ‘जप्ती’ आणते, तसे गुरुदेवांनी आज माझ्यावर पूर्णपणे ‘जप्ती’ आणली. (गुरूंनी आपलेसे केले. माझे वेगळे अस्तित्व ठेवले नाही.) आता मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या १०० टक्के ऋणात आहे. माझी असमर्थता आणि त्यांची समर्थता पुन:पुन्हा अनुभवत आहे. आतापर्यंत त्यांनीच सर्व करवून घेतले. यापुढेही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात त्यांच्या इच्छेनुसार माझ्याकडून कार्य होवो आणि हिंदु राष्ट्राचा विचार करून त्या दिशेने वाटचाल करणार्या प्रत्येकावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपावृष्टी होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी
उलगडलेला त्यांचा गुरु ते सद्गुरु हा प्रवास !
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ४ मासांपूर्वी देहली सेवाकेंद्रात आल्या असतांना ‘माझ्यात काहीतरी आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया होत आहे’, असे जाणवत होते. ‘रामनाथी येथील आश्रमात येण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची इच्छा न्यून होत आहे’, असे जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या प.पू. भक्तराज महाराजांच्या वचनाप्रमाणे ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ।’ यांनुसार प्रयत्न करतांना साधक, धर्मप्रेमी आणि समाज यांच्यातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच रूप दिसते. असे असले, तरी ‘निर्गुणासह सगुणही हवे’, असे वाटते.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे भावस्पर्शी मनोगत !
एकाच वेळी ४ संत सद्गुरुपदी विराजमान होणे, तसेच साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांची प्रगती होणे, हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच होत आहे. साधकांसाठीच नव्हे, तर सार्या विश्वासाठी त्यांनी गुरुकृपायोग निर्मिला आहे. हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी साधकांनी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन, तसेच गुणसंवर्धन यांसाठी प्रयत्न करायला हवेत. साधकांची आध्यात्मिक उन्नती झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सर्वाधिक आनंद होतो. त्यांना आपण दुसरे काही देऊ शकत नाही. आपली प्रगती हाच त्यांचा आनंद असल्याने साधकांनी त्यादृष्टीने प्रयत्न करून त्यांना आनंद दिला पाहिजे.
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सद्गुरु नंदकुमार जाधव
आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे काव्यरूपात केलेले वर्णन !
भावविभोर कर श्रीविष्णु के चरणों मे ले जानेवाले : सद्गुरु नंदकुमार जाधव
जिनके कंठ मे है मां सरस्वती का वास ।
आर्तता से सुमधुर वाणी में गाकर गुरुदेवजी को प्रसन्न करते ।
कृतज्ञता, शरणागती एवं क्षात्रभाव हममें निर्माण कराते ।
हमें भावविभोर कर श्रीविष्णु के चरणों मे ले जाते ।
ज्ञान-भक्ति-कर्म का मिलन : सद्गुरु डॉ. पिंगळे
गुरुदेवजी की ज्ञानगंगा बहती जिनकी वाणी से निरंतर ।
पितृवत प्रीति वे करते साधकों और धर्मप्रेमियों पर ॥
ज्ञान-भक्ति और कर्म का है उनमें अद्भुत मिलन ।
साधकों की प्रगति हो ऐसी उनकी है तीव्र लगन ॥
वैराग्यभाव है जिनमें अतुलनीय । यह महान विभूति है ऋषितुल्य ॥
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
सोहळ्याला पू. (डॉ.) पिंगळे यांच्या कन्या सौ. वैदेही गौडा उपस्थित होत्या, तसेच संगणकीय प्रणालीद्वारे सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे आणि त्यांचे वडील श्री. प्रभाकर पिंगळे हे उपस्थित होते. त्यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे देत आहोत.
१. सौ. वैदेही गुरुप्रसाद गौडा
पुष्कळ दिवसांपासून ‘पू. बाबांमध्ये पालट होत आहेत’, असे जाणवत होते. त्यांना मनातील विचार सांगितले की ते म्हणायचे, ‘देवाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे.’ त्यांच्या या वाक्यामुळे मला प्रसंगांवर मात करता यायची. ‘आता ते समष्टीमय आणि सनातनमयच झाले आहेत’, असे वाटते. घरी एकत्र आल्यावर, ‘मायेतही देवाला कसे अनुभवावे’, हे त्यांनी शिकवले. त्या वेळी ‘ते सद्गुरु झाले आहेत’, असे वाटले होते.
२. डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे
सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांची सहजता वाढली आहे. त्यांनी आम्हाला जीवनातील प्रत्येक कृती साधना म्हणून करायला शिकवली आणि प्रत्यक्ष करवूनही घेतली. ‘त्यांच्या मनात कुठल्याच अपेक्षा नाहीत’, असे वाटते. चुका सांगतांना तत्त्वनिष्ठपणे सांगण्यासह आता त्यामध्ये प्रीतीही असते. त्यांचे शब्दही अंतर्मनापर्यंत पोहोचतात आणि कृती करण्याची प्रेरणा मिळते. ‘त्यांना शारीरिक त्रास आणि थकवा असूनही ते आनंदी आहेत आणि वेगळ्याच विश्वात आहेत’, असे वाटते. ‘ते स्वतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूपता अनुभवत आहेत’, असेही त्यांच्या सहवासात जाणवते.
३. श्री. प्रभाकर पिंगळे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच हा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. हे मनोगत व्यक्त करतांना श्री. पिंगळे यांचा भाव जागृत झाल्याने ते बोलू शकले नाहीत.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
यो सोहळ्याला सद्गुरु नंदकुमार जाधव यांची ज्येष्ठ कन्या सौ. गायत्री शास्त्री उपस्थित होत्या, तसेच त्यांची कनिष्ठ कन्या कु. अनुराधा जाधव, त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनंदा जाधव या संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढे देत आहोत.
१. सौ. गायत्री शास्त्री
सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी ‘पू. बाबा सद्गुरुपदी विराजमान होतील’, असे वाटत होते. पू. बाबा अधिवेशनासाठी रामनाथी येथे आल्यावर त्यांना भेटायला गेले, तेव्हा पू. पिंगळेकाकाही तेथे होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘ते दोघेही सद्गुरुपदी पोहोचले आहेत’, असे जाणवलेे. गत २ मासांपासून पू. बाबांमध्ये वेगळेपणा जाणवत होता. घरी गेल्यावर त्यांच्या सहवासात मन स्थिर आणि शांत झाले होते. शांतीची अनुभूती येत होती. काल रात्रीपासून निराळाच आनंद जाणवत होता आणि आज सकाळी ‘चित्रीकरण आहे’, हा निरोप मिळाला.
२. कु. अनुराधा जाधव
या आनंदवार्तेचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. २ मासांपासून पू. बाबांच्या तोंडवळ्यावर पालट जाणवत होते. तेव्हापासून ‘लवकरच ते सद्गुरुपदी पोहोचतील’, असे वाटत होते. आज सकाळपासून मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. ‘त्रासावर मात करण्यासाठी सत्संग आणि शक्ती मिळावी’, असे वाटत होते. दुपारी सहसाधिकेने संपर्क करून सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा निरोप दिला. सोहळ्यात सहभागी होताच आध्यात्मिक त्रास अल्प झाला आणि आनंद वाढला.
३. सौ. सुनंदा जाधव (सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या पत्नी)
आज गुरुदेवांनी जो आनंद दिला तो शब्दांत व्यक्त करू शकत नाही. केवळ कृतज्ञता !
जनलोकवासी पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी ‘सद्गुरु’पद प्राप्त
करण्याविषयी त्यांची कन्या कु. राजश्री सखदेव यांना मिळालेली पूर्वसूचना !
सद्गुरु (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १० मासांपूर्वी देह ठेवल्यानंतर मला त्यांची कधीही आठवण आली नव्हती; मात्र गेला १ मास प्रतिदिन त्यांची आठवण येते. कधी त्यांचे बोलणे ऐकू येते, तर कधी त्यांचा हसतमुख तोंडवळा, कधी त्या आजारी असतांनाचा त्यांचा तोंडवळा दिसतो. आज सकाळी ध्यानमंदिरात नामजप करतांना पू. आजींनी गळ्यात हार घातल्याचे चित्र समोर दिसले. त्या वेळी ‘आज त्या सद्गुरु झाल्या असतील आणि आज ते घोषित होईल’, असे वाटले.
पू. नंदकुमार जाधव यांच्याकडे मायेतील नात्याऐवजी
‘समष्टी संत’ या भावाने पाहून सर्वांसमोर आदर्श ठेवणारे जाधव कुटुंबीय !
मनोगत व्यक्त करतांना कु. अनुराधा जाधव यांनी सांगितले की, जून मासामध्ये पू. बाबांचा वाढदिवस होता. त्या वेळी ‘संतांना भ्रमणभाष करू नका’, अशी सूचना दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली होती. ‘पू. बाबा समष्टीचे झाल्याने या सूचनेचे पालन करायला हवे’, असे वाटून मी त्यांना वाढदिवसानिमित्त संपर्क केला नाही. मानसरित्या केवळ त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘कु. अनुराधा यांच्याप्रमाणे मीही पू. जाधवकाका यांना वाढदिवसानिमित्त संपर्क केला नाही’, असे सौ. सुनंदा जाधव यांनी सांगितले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र
स्थापनेसाठी केलेल्या संकल्पाला कृती स्वरूप देणारे सद्गुरुद्वयींचे कार्य !
सद्गुरु जाधवकाका यांनी जळगाव येथील धर्मजागृती सभेत स्फूर्तीदायी भाषण करून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे कार्य करणारे धर्मवीर सिद्ध केले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी व्यापक हिंदूसंघटन उभारणीचे कार्य सद्गुरु पिंगळेकाकांनी वर्ष २०१२ पासून झालेल्या सहा ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशनां’चे नेतृत्व करून कृतीत आणले.
दोन्ही सद्गुरुंविषयी व्यक्त केलेले मनोगत
सौ. नम्रता शास्त्री (सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या विहीण)
सद्गुरु पिंगळेकाका पूर्वीपासून ऋषितुल्य वाटायचे. ‘ज्या व्यक्तीविषयी प्रतिक्रिया येतात त्यांची पाय पकडून क्षमा मागायची’, या त्यांनी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे कृती केल्यावर माझ्या मनातील प्रतिक्रिया अल्प झाल्या. सद्गुरु जाधवकाका म्हणजे प्रीतीचा सागर ! एका सेवेनिमित्त त्यांचे भावपूर्ण झालेले स्वागत पाहूनच ते सद्गुरुपदी पोचल्याचे मला जाणवले.
भावसोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि पू. नंदकुमार जाधव यांना ‘सद्गुरु’ घोषित केल्यानंतर लगेचच पर्जन्यवृष्टी होऊ लागली. या मंगलप्रसंगी ‘वरुणदेवतेने कृपावर्षाव केल्यामुळे सारी सृष्टीच आनंदाने हर्षभरीत झाली आहे’, असे उपस्थित सर्वांना वाटले.
२. सद्गुरुद्वयींनी सन्मानानंतर एकमेकांना वाकून नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.