१. सुखसागर येथील भेट !
१ अ. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीत केवळ
एक पलंग आणि एक पटल (टेबल) एवढेच साहित्य बघून आश्चर्य वाटणे
‘आम्ही साधनेला आरंभ करून एक वर्ष झाले असेल ! तेव्हा एका दिवाळी अंकात अंनिसने छापलेला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या विरोधात लिहिलेला लेख वाचला. तो वाचल्यानंतर मी डॉ. जाधव (घोंगाणे) यांना म्हणालो, ‘‘आपणही अंनिसच्या या लेखाला काहीतरी उत्तर द्यायला हवे.’’ नंतर काही कालावधी गेला. मी धामसे (गोवा) येथे भावजागृती शिबिरासाठी गेलो आणि शिबीर संपल्यानंतर प.पू. गुरुदेवांना भेटण्यासाठी गोवा येथील सुखसागर येथे गेलो होतो. त्या वेळी कु. राजश्रीताई सखदेव मला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. तेव्हा प.पू. गुरुदेवांची खोली पाहून मला आश्चर्य वाटले; कारण खोलीत केवळ एक पलंग आणि एक पटल (टेबल) एवढेच साहित्य होते.
१ आ. ‘मनात आलेला प्रत्येक विचार
प.पू. गुरुदेवांपर्यंत पोचतो’, याची अनुभूती घेणे
माझे प.पू. गुरुदेवांशी थोडा वेळच बोलणे झाले. तेवढ्यात महाप्रसादाची वेळ झाली. मी महाप्रसाद घेऊन निघायच्या सिद्धतेत होतो आणि माझ्या जाण्याच्या मार्गावर प.पू. गुरुदेव हातात काही कागद घेऊन उभे होते. मी ते आत जाण्याची वाट पहात त्यांना दिसणार नाही, असा थांबलो. ‘ते आत गेल्यावर पाण्याची बाटली भरून निघायचे’, असे मी ठरवले. तेवढ्यात ते स्वत:च माझ्याजवळ आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील कागद (अंनिस विषयीची हस्तपत्रके) मला दाखवले. ‘ती पत्रके ते मला का दाखवत आहेत’, ते मला कळेना. ती पत्रके दाखवून ते मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही जाऊ शकता.’’ मी निघाल्यावरही माझ्या मनात सारखा विचार येत होता, ‘त्यांनी मला पत्रके का दाखवली ?’ तेव्हा मला एकदम आठवले की, काही दिवसांपूर्वी अंनिसने लिहिलेल्या लेखाविषयी मी डॉ. जाधव (घोंगाणे) यांच्याशी चर्चा केली होती; म्हणून ती पत्रके प.पू. गुरुदेव मला दाखवत होते. अशाच प्रमाणे मनात आलेला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो, याची अनुभूती यानंतरही अनेकदा आली.
२. नांदेड येथील गुरुद्वारामध्ये प.पू. गुरुदेवांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. ‘गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी डोक्यावर टोपी किंवा रुमाल हवा’,
हे लक्षात ठेवून वाहनातून उतरत असतांनाच प.पू. गुरुदेवांनी सनातनची टोपी घालणे
प.पू. गुरुदेव नांदेडला येणार होते. नांदेड शहरात येताच प्रथम गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेण्याचे नियोजन होते. ‘गुरुद्वारामध्ये प्रवेश करायचा, तर पुरुषांनी डोक्यावर टोपी घातली पाहिजे किंवा रुमाल बांधला पाहिजे आणि महिलांनी रुमाल किंवा ओढणी घेतली पाहिजे’, असा नियम आहे. प.पू. गुरुदेवांसाठी आम्ही नवीन पांढरा रुमाल घेऊन जिथे त्यांचे वाहन थांबणार होते, त्या ठिकाणी एका साधकाला थांबवले आणि ‘ते येताच त्यांना रुमाल द्यायचा’, असे ठरवले. प.पू. गुरुदेव गुरुद्वारापाशी आल्यावर वाहनातून उतरले. तेव्हा आम्ही दोघे साधक एकमेकांकडे आश्चार्याने पहात राहिलो; कारण त्यांनी वाहनातून खाली उतरत असतांनाच सनातनची टोपी घातली होती.
२ आ. प.पू. गुरुदेवांनी गुडघेदुखीचा त्रास
असूनही अनेक ठिकाणी गुडघे अन् डोके टेकून नमस्कार करणे
आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो. तेव्हा तेथील माहिती सांगण्यासाठी शीख समाजाच्या व्यक्तीचे नियोजन केले होते. माहिती सांगत असतांना ती व्यक्ती बऱ्याच ठिकाणी भूमीवर गुडघे आणि डोके टेकवून नमस्कार करत होती. त्याप्रमाणे प.पू. गुरुदेव गुडघेदुखीचा त्रास असूनही गुडघे अन् डोके टेकून नमस्कार करत होते. अखेरीस गुरुद्वाराचे मुख्य पुजाऱ्यांची भेट होती. ते संतच असतात. तेथे बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी प.पू. गुरुदेवांना ‘ग्रंथसाहेब’ (धर्मग्रंथ) ची प्रत भेट दिली आणि प.पू. गुरुदेवांनी त्यांना हिंदी भाषेतील काही ग्रंथ भेट दिले. निघतांना प.पू. गुरुदेवांनी त्या पुजाऱ्यांच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार केला. त्यानंतर नांदेडला कोणी साधक आले की, त्यांना गुरुद्वारामध्ये दर्शनाला घेऊन गेल्यावर मीही गुडघे अन् डोके टेकवून नमस्कार करायचो.
३. प.पू. गुरुदेवांनी मिरज आश्रमात शिकवलेले सूक्ष्म परीक्षण
३ अ. प.पू. गुरुदेवांनी प्रोत्साहन दिल्यामुळे
आत्मविश्वा्स वाढून सूक्ष्मातले कळल्याचा आनंद होणे
मी आणि प.पू. कालिदास देशपांडेकाका आध्यात्मिक उपाय कसे करायचे, हे शिकण्यासाठी मिरज आश्रमात राहिलो होतो. तेव्हा प.पू. गुरुदेव आम्हाला त्रासाविषयी परीक्षण करायला सांगायचे. तो सूक्ष्मातील भाग असल्याने ‘आपल्याला जमेल का ?’ असे वाटून मी मागे मागेच थांबायचो; पण एक दिवस त्यांनी आम्हालाच प्रयत्न करायला सांगितले. आम्ही दोघांनी प्रार्थना केली आणि परीक्षण केले. परीक्षणामध्ये काय जाणवले, ते प.पू. गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी ‘‘परीक्षण योग्य आहे’’, असे सांगितले आणि संध्याकाळी पू. अनुताईंसमवेत (सद्गुरु अनुराधा वाडेकर) आम्हा दोघांना प्रसाद पाठवला. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच आम्हाला परीक्षण करता आले, आमचा आत्मविश्वास वाढला आणि ‘सूक्ष्मातले कळले’, याचा आनंदही झाला. त्यामुळे प.पू. गुरुदेव आणि श्री दुर्गादेवी सूक्ष्मातून आलेले पहाता आले.
३ आ. एका भाषणाच्या वेळी प्रार्थना केल्यावर श्री दुर्गादेवीचे दर्शन होणे
एकदा मिरजेत मंदिर सरकारीकरण कायद्याच्या विरोधात मोर्चा होता. मोर्चाच्या समारोपप्रसंगी सौ. सुजाता कुलकर्णी भाषण करू लागल्या. सूक्ष्मातील भाग कळण्यासाठी मी प्रार्थना केल्यावर मला तेथे श्री दुर्गादेवी आलेली दिसली. त्या वेळी सौ. सुजाता कुलकर्णी एकदम क्षात्रवृत्तीने बोलू लागल्या. त्यांचा आवाज चढला होता आणि त्यांचे भाषण खूपच प्रभावी झाले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प.पू. गुरुदेव आणि श्री दुर्गादेवी यांचे दर्शन झाले. त्यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता.
४. प.पू. गुरुदेवांनी साधकांवर आणि संपूर्ण मानवजातीवर केलेली अपरंपार कृपा !
४ अ. ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांची अनमोल भेट !
त्यांनीच ग्रंथरूपाने ज्ञानामृताचा सागर, अनेक सात्त्विक उत्पादने, चैतन्यदायी देवतांची चित्रे अन् गणेशमूर्ती सर्व विश्वासाठी दिली आहेत.
४ आ. मोक्षप्राप्तीचे ध्येय बिंबवणे
आज अनेक कुटुंबे पूर्णवेळ साधना करत आहेत. हीसुद्धा त्यांचीच कृपा आहे. त्यांच्यामुळेच ‘मनुष्यजन्म हा साधना करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी आहे’, हे मनावर बिंबले.
४ इ. साधक आणि संत यांनी शीघ्र उन्नती करणे
त्यांनीच गुरुकृपायोगानुसार साधना करवून घेतल्यामुळे अनेक साधकांची प्रगती झाली आहे. काही जण संत झाले, तर अनेक जण संत होण्याच्या मार्गावर आहेत.
४ ई. दैवी बालकांच्या जन्माचे रहस्य कळणे
अनेक दैवी बालके पृथ्वीवर पुन्हा जन्म घेऊन का येत आहेत, हे त्यांच्यामुळेच समजले.
४ उ. दैवी नाद ऐकायला आणि दैवी कण पहायला मिळणे
आपल्या कल्पनेच्या पलीकडे असणारे दैवी नाद त्यांनीच ऐकवले आणि दैवी कण आपल्याला पहायला मिळाले. ही केवळ त्यांची कृपा. त्यांनी जे दिले आहे, त्याची महती शब्दांत सांगणे अशक्य आहे. त्रेतायुगातील प्रजेला श्रीरामाच्या रूपाने, तर द्वापरयुगातील प्रजेला श्रीकृष्णाच्या रूपाने ईश्वर पहायला मिळाला. याचप्रमाणे कलियुगांतर्गत कलियुगातील लोकांना प.पू. डॉक्टरांच्या रूपाने ईश्वर पहायला मिळाला. त्यांच्या रूपाने ईश्वराची कृपा, दया, प्रीती, सर्वज्ञता अनुभवायला मिळाली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञ झालो, तरी ते अल्पच आहे, तरीही त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
त्यांच्या कृपेमुळेच मला हे लिखाण सुचले आणि त्यांनीच ते लिहून घेतले, त्यासाठी त्यांच्या चरणी मी सदैव कृतज्ञ आहे.’- (सद्गुरु) श्री. नंदकुमार जाधव (११.५.२०१७)
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक