‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प
साकार करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !
‘८.२.२०१७ या दिवशी उडुपी येथील स्वामी विनायकानंदजी महाराज (बैलूर मठ) आणि मंगळुरू येथील प.पू. देवबाबा रामनाथी आश्रमात आले होते. त्यांचे आश्रमात येणे हे जणू ‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संकल्पानुसार ईश्वरी नियोजनच होते. त्यांनी आम्हाला ‘संगीत आणि नृत्य यांतून साधना होण्यासाठी काय करायचे ?’, याविषयी संक्षिप्त मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी हे विषय शिकण्यासाठी आम्हाला त्यांच्या आश्रमात येण्यास सांगितले होते. त्यानुसार भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने १७ ते १९.३.२०१७ या काळात पू. स्वामी विनायकानंदजी महाराज यांच्या बैलूर येथील आश्रमात आणि २० ते २२.३.२०१७ या काळात प.पू. देवबाबा यांच्या ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रम’, किन्नीगोळी येथील आश्रमात रहाण्याची अमूल्य संधी आम्हाला (सौ. सावित्री इचलकरंजीकर, कु. तेजल पात्रीकर, डॉ. (कु.) आरती तिवारी आणि श्री. चेतन एम्.एन्. यांना) मिळाली. या कालावधीत त्यांची आणि त्यांच्या आश्रमांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये, त्यांनी केलेले मार्गदर्शन अन् त्या वेळी आम्हाला आलेल्या अनुभूती (क्रमश:) येथे देत आहोत.
भाग १
१. स्वामी विनायकानंद महाराज
यांचा साधना प्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्रीरामकृष्ण मठात साधनारत असतांना कठोर साधना करून स्त्री-पुरुष देहभाव
पार करून पुढील साधनेसाठी बेलुर (बंगाल) येथील मुख्य श्रीरामकृष्ण आश्रमात जाणे
‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते. तेथे साधना करत असतांना त्यांना मार्गदर्शन करणार्या एका श्रेष्ठ गुरूंनी (जे पुढील साधनेसाठी हिमालयात गेले) स्वामीजींना पत्रातून सांगितले, ‘तू पुढील साधनेसाठी बेलुर (बंगाल) येथील मुख्य श्रीरामकृष्ण आश्रमात जा. त्याआधी तू स्त्री-पुरुष देहभाव पार कर. त्यामुळे तुला पुढील साधनाप्रवास जलद करता येईल.’ त्याप्रमाणे स्वामीजींनी कठोर साधना करून ही स्थिती आत्मसात केली.
१ आ. स्वामीजींनीही भगवंताच्या साक्षात्कारासाठी आवश्यक असा
स्त्रियांमधील शरणागत भाव आणि वात्सल्यभाव आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले !
श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात सांगितले आहे, ‘स्त्रीभाव काय आहे ?’, हे जाणण्यासाठी श्रीरामकृष्ण परमहंस काही मास (महिने) स्त्री वेषात रहात होते.’ स्वामीजींनीही भगवंताच्या साक्षात्कारासाठी आवश्यक असा स्त्रियांमधील शरणागत भाव आणि वात्सल्यभाव आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले. ते काही मास रात्री स्त्री वेषात रहायचे. स्वामीजी म्हणाले, ‘‘पुरुषी अहंकार हाच त्याच्या भगवंत प्राप्तीतील मोठा अडथळा असतो. स्त्रियांमध्ये मुळातच शरणागत भाव आणि वात्सल्य असल्याने त्यांना हे सोपे जाते.’’
१ इ. साधना करतांना स्वामीजींचे ‘स्व’ला विसरणे
त्यानंतर ते पुढील साधनेसाठी बेलुर येथील मुख्य रामकृष्ण आश्रमात गेले. तेथे स्वामीजी केवळ भगवद्भक्तीत लीन असायचे. स्वामीजींनी आम्हाला सांगितले, ‘‘तेथे काही वेळा ‘जेवण झाले आहे’, हेच मला आठवायचे नाही. ‘जेवण व्हायचे आहे’, असे वाटून मी ताट घ्यायला जायचो. तेव्हा ‘ते ओले आहे’, हे पाहून ‘मी जेवलो आहे’, हे लक्षात यायचे.’’ ते अशा साधनेच्या निराळ्याच अवस्थेत होते.
१ ई. वनाधिकार्यांनी बांधलेल्या झोपडीत रहाणे आणि
त्यांनी प्रत्येक ३ मासांनी आणलेले पोहे खाऊन उदरनिर्वाह करणे
पुढे स्वामीजी एका घनदाट वनात साधनेसाठी गेले. तेथील अनुभव सांगतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘तेथे अंधार्या वनात माझ्याकडे एक काड्यापेटी आणि कंदिल एवढेच साहित्य होते; परंतु मी कधी कंदिल पेटवलाच नाही. वनातून १२ वर्षांनी परत येतांना मी भरलेली काड्यापेटी तशीच परत आणली. त्या वनात मी केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठीच व्याकुळ व्हायचो. तोच सर्वतोपरी माझी काळजी घ्यायचा. तेथील वनाधिकार्यांनी (रेंजरने) स्वतःहून मला एक झोपडी बांधून दिली. ते प्रत्येकी तीन मासांनी (महिन्यांनी) थोडे पोहे घेऊन यायचे. मी तेवढेच अन्न ग्रहण करायचो. त्या वनाची तोडणी झाल्याने मला इच्छा नसतांनाही तेथून बाहेर पडावे लागले.’’
१ उ. भक्ताने दिलेल्या जागेत आश्रम बांधणे
त्यानंतर त्यांच्या संपर्कात काही व्यक्ती आल्या. त्यातील काही जण स्वामीजींच्या सत्संगाने प्रभावित होऊन पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक होतेे. एका भक्ताने आश्रमासाठी मोठी जागा दिली. आज या नयनरम्य परिसरात स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार ‘रामकृष्ण आश्रम’ उभा आहे.
१ ऊ. देश-विदेशांतील भक्तांना मार्गदर्शन करणे
स्वामीजींचे साधकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य अविरत चालू असते. त्यांचा देश-विदेशांतही मोठा भक्त परिवार आहे. स्वामीजी या साधकांना प्रत्यक्ष अथवा संगणकीय प्रणालीद्वारे सतत मार्गदर्शन करतात. ते केवळ २ – ३ घंटेच विश्रांती घेतात. अन्य वेळी त्यांचे समष्टी कार्य चालू असते.
२. विविध वाद्यांचे ज्ञान असणे
स्वामीजींनी एकही वाद्य वाजवण्याचे शिक्षण घेतले नाही, तरीही त्यांना तबला, पेटी, सतार आणि बासरी ही वाद्ये वाजवता येतात. त्यांना संगीत आणि नृत्य यांचेही ज्ञान आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विनंतीनुसार स्वामीजींनी त्यांच्या एवढ्या व्यस्ततेतून वेळ काढून आम्हाला शिकण्यासाठी ३ दिवस त्यांच्या आश्रमात बोलावले.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर, कु. तेजल पात्रीकर, डॉ. (कु.) आरती तिवारी आणि श्री. चेतन एम्.एन्
३. स्वामीजींची भेट
३ अ. ध्यानमंदिरात गेल्यावर स्वामीजींनी ‘मोगरा फुलला’ हे गीत म्हणायला सांगणे आणि
श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ते ‘गाओ बेटा, गाओ’, असे म्हणत असल्याचे जाणवणे
‘आम्ही तेथील ध्यानमंदिरात गेलो. तेव्हा तेथे नियमित होणारी प्रार्थना चालू होती. स्वामी विनायकानंद यांना त्यांच्या शिष्यांनी आम्ही आल्याचा निरोप दिला. तेव्हा ‘गाणे म्हणणार्या साधिकेला ‘मोगरा फुलला’ हे गाणे आता म्हणायला सांगा’, असा त्यांचा निरोप त्यांच्या शिष्येने दिला. (स्वामी विनायकानंदजी दीड मासांपूर्वी आश्रमात आले असतांना त्यांच्यासमोर मी हे गीत गायले होते. ते त्यांना आवडल्याचे त्यांनी सांगितले होते.) मी ध्यानमंदिरातील श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ते मला ‘गाओ बेटा, गाओ’, असे म्हणत असल्याचे जाणवले. त्यानंतर मी हे भक्तीगीत गायले. तेव्हा ‘आश्रमात गेल्यावर देवाने लगेच संगीत शिकण्याच्या साधनेला आशीर्वाद दिला’, असे जाणवले.’ – कु. तेजल पात्रीकर
४. स्वामीजींनी ‘संगीत आणि नृत्य
आदी कलांच्या माध्यमातून साधना’ यांविषयी केलेले मार्गदर्शन
१७.३.२०१७ या दिवशी स्वामीजींनी संगीत आणि नृत्य आदी कलांच्या माध्यमातून साधनेची तात्त्विक माहिती, कलेतून साधना होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, हे सांगितले.
४ अ. स्वामीजींनी केलेल्या मार्गदर्शनातील सांगितलेली सूत्रे
१. आपली मन:स्थिती स्थिर असायला हवी. ‘कोणतीही बाह्य परिस्थिती स्वतःची स्थिती बिघडवू शकणार नाही’, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
२. आपल्याला कोणतीही आसक्ती नसावी.
३. आपली देहबुद्धी हळूहळू अल्प करण्याचा प्रयत्न करावा. ‘मी म्हणजे देह’, असे आठवण्यापेक्षा ‘मी म्हणजे आत्मतत्त्वच आहे’, असे आठवावे.
४. संगीत-साधनेत पवित्रता आणि देहभावाच्या पलीकडे जाणे महत्त्वाचे आहे, तरच आपण स्वत:ला विसरून गाण्याच्या माध्यमातून त्या ईश्वराशी सूक्ष्मातून खेळण्याचा आत्मानंद घेऊ शकतो.
५. आपल्याला कुणावर प्रेम करता आले नाही, तर काही परिणाम होत नाही; पण एखाद्याविषयी मनात घृणा असेल, तर आपली अपरिमित हानी होते. त्यामुळे कोणाचीही घृणा करणे टाळावे.
६. भगवंतासाठी व्याकुळ होऊन गीत म्हणावे आणि नृत्य करावे.
वरील सर्व सूत्रे ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आजपर्यंत आपल्याकडून करून घेतलेल्या स्वभावदोष, अहं निर्मूलन आणि भावजागृती यांच्या प्रयत्नांविषयी त्यांच्याप्रती कृतज्ञताच वाटली.
४ आ. भगवंतासाठी व्याकुळ होण्यातील महत्त्व
४ आ १. गीतातून भगवंताला आळवतांना त्यात संत मीराबाईंप्रमाणे आर्तता असावी !
‘मेरे तो गिरीधर गोपाल’ हे भजन संत मीराबाई म्हणत असत. हे भजन म्हटल्यावर श्रीकृष्ण संत मीराबाईंसाठी धावून यायचा. तेच भजन एक प्रसिद्ध गायिका अतिशय सुरेल आवाजात गायल्या आहेत; पण त्यांनी हे गीत गायल्यावर देव धावून आल्याचे आपण ऐकले नाही. तो त्यांच्यासाठी धावून का येत नाही ? संत मीराबाई या अंत:करणातून भगवंताला साद घालण्यासाठी भावपूर्ण गात. त्यामुळे श्रीकृष्ण संत मीराबाईंसाठी धावून यायचा. त्या प्रसिद्ध गायिकेने हे गीत गायल्यावर त्यांची पर्स भरत असे. हाच भेद आहे. आपल्याला संत मीराबाईंप्रमाणे गायला शिकायचे आहे.
स्वामीजींनी अशा प्रकारे भगवंताला आळवण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करून आम्हाला अंतर्मुख केले आणि भगवंताच्या स्मरणात रहाता येण्यासाठी साहाय्य केले.
४ आ २. भावावस्थेत राहून नृत्य केल्याने पहाणार्यांनाही भगवंत लीलेचा आनंद घेता येऊन त्यांनाही भावस्थितीत रहाता येणे
१८.३.२०१७ या दिवशी सकाळच्या सत्रात नृत्यातून साधनेविषयीच्या विविध प्रश्नांवर स्वामीजींनी मार्गदर्शन केले. ‘स्वत:ला विसरून भगवंताच्या स्मरणात रममाण कसे व्हायचे ?’, याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. रामकृष्ण परमहंस हे देहबुद्धी विसरून भगवंतासाठी व्याकुळ होऊन कसे नृत्य करायचे, चैतन्य महाप्रभु हेही श्रीकृष्णाच्या प्रेमात न्हाऊन भावावस्थेत नृत्य करत. स्वामीजींनी आम्हाला भावावस्थेत नेऊन तसे भावावस्थेतील नृत्य करून दाखवले. ‘अशा भावनृत्यातून आपणही भावावस्थेत रहातो आणि पहाणार्यांनाही भगवंताच्या लीलेचा आनंद घेता येऊन त्यालाही आपण हळूहळू भावस्थितीत घेऊन जाऊ शकतो, ते खरे नृत्य’, असे स्वामीजींनी सांगितले.
४ आ ३. एक अभिनेत्री तिचे अस्तित्व विसरून देवीची भूमिका करतांना श्री रामकृष्ण परमहंस यांनी ‘यातूनच तू उद्धरून जाशील’, असा तिला आशीर्वाद देणे
एक अभिनेत्री श्रीरामकृष्ण परमहंस यांची भक्त होती. तिच्या एका कार्यक्रमाला श्री रामकृष्ण परमहंस गेले होते. त्या नाटकात ती देवीची भूमिका करत असे. ती संपूर्ण नाटकात देवीच्या अभिनयाशी अशा प्रकारे एकरूप होते की, तिच्या ठिकाणी साक्षात् देवीचेच तत्त्व कार्यरत होते. श्रीरामकृष्ण परमहंसांना तिच्या ठिकाणी साक्षात् कालीमातेचे दर्शन घडले. ती अभिनेत्री कार्यक्रम संपल्यानंतर श्रीरामकृष्ण परमहंस यांना नमस्कार करण्यासाठी आल्यावर ते तिला म्हणाले, ‘‘असली आणि नकली यात भेद राहिला नाही. या कलेतूनच तू उद्धरून जाशील.’’
४ इ. संगीत आणि नृत्य साधनेतील भेद
स्वामीजी म्हणाले, ‘‘संगीतातून भावाच्या साहाय्याने अंतरंगात जाता येते, तर नृत्यातून आनंदावस्था अनुभवून त्यातून भावावस्थेकडे जाऊन शेवटी शांती अनुभवणे’, असा प्रवास असतो.’’
– डॉ. (कु.) आरती तिवारी
भाग २
५. नृत्य करतांना स्वामीजींनी मार्गदर्शन करणे,
त्या वेळी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
५ अ. ‘स्वामीजी नृत्याच्या प्रायोगिक भागावर मार्गदर्शन करणार आहेत’, असे समजल्यावर
‘काय करायचे ?’, ते लक्षात न येणे, प्रार्थना केल्यावर ईश्वराने ‘स्वामीजींसमोर कसे नृत्य करायचे ?’, याचे दृश्य दाखवणे
‘१८.३.२०१७ या दिवशी दुपारी स्वामीजींनी निरोप दिला, ‘सायंकाळी नृत्याच्या प्रायोगिक भागावर मार्गदर्शन करणार आहे.’ तेव्हा ‘नेमके काय करायचे ? कसे करायचे ?’, काहीच कळत नव्हते. तेव्हा ‘केवळ शरणागतीनेच सर्वकाही होऊ शकते’, याची तीव्रतेने जाणीव झाली. त्याप्रमाणे शरणागत भावाने ‘तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे करवून घ्या’, अशी प्रार्थना होऊ लागली. तेव्हा ईश्वराने मला ‘स्वामीजींसमोर कसे नृत्य करायचे ?’, याची दृश्य स्वरूपात झलक दाखवली. त्यानंतर मी मानसभावाने त्याचाच सराव १ – २ वेळा केला. तेव्हा जणू ‘मी प्रत्यक्षातच सराव केला आहे’, अशा पद्धतीने मला हलके वाटले. नृत्य करण्याच्या आरंभी ‘घुंगरू म्हणजे सहसाधक आहेत’, असा भाव मनात निर्माण झाला. त्यांनाच ‘तुम्हीच स्वामीजींकडून अधिकाअधिक चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना करा’, अशी प्रार्थना झाली.
मी आणि सौ. सावित्री यांनी स्वामीजींना नमस्कार केल्यावर त्यांनी सौ. सावित्रीला ३ वेळा घुंगरू झेलून पायात बांधण्याकरता दिले. त्यांनी मला घुंगरू ‘देऊ कि नको ?’, असे विचारून ते दिले. मी ते घुंगरू हातात घेतल्यावर मला त्यातून ‘कृष्ण कृष्ण’ असा नामजप ऐकूू येऊ लागला. ते घुंगरू पायात बांधत असतांना माझे मन नामजपाकडे एकाग्र झाले.’
– डॉ. (कु.) आरती तिवारी
५ आ. स्वामीजींनी ‘नृत्य करतांना देहाचा विसर पडून देह भगवंताच्या चरणी
समर्पित करायला हवा’, असे सांगणे आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकतांना भावजागृती होणे
सौ. सावित्री यांनी कथ्थक या नृत्य प्रकारातील गुरुवंदना, सरस्वती स्तवन, आमद (रंगमंचावर आगमन करतांना केला जाणारा नृत्यप्रकार), तोडे आदी केले. त्यानंतर मी दोन गीतांवर भरतनाट्यम् या नृत्यातील काही प्रकार केले. आमचे नृत्य झाल्यावर स्वामीजींनी सांगितले, ‘‘नृत्य करतांना त्यात सहजता असायला हवी आणि देहाचा विसर पडायला हवा.’’ त्या वेळी दोघींच्याही मनात ‘नृत्याचे बोल स्वत:च म्हणत नृत्य करणे जमेल का ? नेमके काय करायचे ?’, अशा प्रकारचे विचार होते. त्यानंतर स्वामीजींनी तिघींनाही एकत्र बोलावून सांगितले, ‘‘नृत्य करतांना आपण काय शिकलो ? स्टेप्स् आदी सर्व विसरून केवळ त्या भगवंतालाच आठवा. त्याच्या आठवणीत संपूर्ण रंगून जा. हा देह त्याच्या चरणी समर्पित करा.’’ स्वामीजी मार्गदर्शन करत असतांना आम्हा तिघींचीही भावजागृती झाली. सौ. सावित्रीकडून आणि माझ्याकडून त्यांनी तीन वेळा नृत्य करवून घेतले.’ – डॉ. (कु.) आरती तिवारी
५ इ १. नृत्य करतांना ध्यान लागणे आणि स्वतःचे भान नसणे
‘मी दुसर्यांदा नृत्य करतांना ‘श्रीगणेश परण’ (कथक नृत्यातील एक प्रकार. यातील बोल पखवाजावर वाजवले जातात.) अन् श्रीकृष्ण आणि गोपी यांच्याशी संबंधित एक कवित्त (कथक नृत्यातील एक प्रकार. यातील बोल एखाद्या प्रसंगाचे वर्णन करणारे असतात.) सादर केले. मी गणेश परण करतांना ‘श्री गणेशाला आवाहन करत आहे’, असा माझा भाव होता, तर कवित्त करतांना श्रीकृष्ण गोपींची पाण्याची मडकी फोडत आहे’, असे वाटत होते. त्या वेळी पूर्ण वेळ माझे ध्यान लागले होते. ‘मी कुठे आहे आणि काय करत आहे’, याचे मला भान नव्हते.’ – सौ. सावित्री इचलकरंजीकर
५ इ २. नृत्य करतांना ध्यान लागणे आणि देहभान विसरणे
‘तिसर्या वेळी नृत्य करतांना मी एक गतनिकास (घुंगटगत – यात घुंगट घेण्याचे प्रकार दाखवले जातात) आणि काही तत्कार (विशिष्ट प्रकारचे पदन्यास) केले. त्या वेळी ध्यान लागण्याचे आणि देहभान विसरण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत अधिक होते.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर
५ इ ३. शरणागत भावाने प्रार्थना करून नृत्य केल्यावर स्वामीजींनी कौतुक करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा समोर दिसून मन शांत होणे
‘तिसर्या वेळी नृत्य करतांना ‘गीताचे बोल म्हणणे त्यातील हावभाव, तसेच पदन्यास यांकडे लक्ष देणे’, हे एकत्रित करायचे होते. ‘हे सर्व आणि त्यातून पहाणार्यांनाही आनंद मिळणे’, हे सर्व केवळ श्रीगुरूंच्या कृपेनेच शक्य आहे’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. त्या वेळी शरणागत भावाने प्रार्थना झाली. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले स्मितहास्य करत आहेत’, असे दिसले. त्यानंतर ‘सर्वांच्याच कृपेने नृत्य करू शकले’, असे जाणवले. ‘त्यात काय झाले ते’, मला कळलेच नाही. नृत्य संपल्यावर स्वामीजींनी कौतुकाने ‘एकदम छान !’, असे म्हटले. त्याच क्षणी ‘कृतज्ञता, कृतज्ञता’, असा नामजप आतून होऊ लागला. तेव्हा ‘शरणागतीविना काहीही शक्य नाही’, हे शिकायला मिळाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा समोर दिसून मन शांत झाले.’ – डॉ. (कु.) आरती तिवारी
५ इ ४. ‘श्रीकृष्णासमवेत नृत्य करावे’, असे तीव्रतेने वाटणे आणि त्यासंदर्भात स्वामीजींनी दिलेली श्रीकृष्णाची अनुभूती
त्यानंतर एकदा मला स्थुलातून ‘श्रीकृष्णासमवेत नृत्य करावे’, असे तीव्रतेने वाटू लागले. हे तर अशक्यच होते. तेव्हा ‘स्वामीजींच्या रूपातील श्रीकृष्णाच्या भोवती नृत्य करूया’, असे वाटले. मी त्याविषयी स्वामीजींना विचारले. काही क्षणांनी ते म्हणाले, ‘‘पहा. मी तिथे सूक्ष्मातून उभा आहे. तू नृत्य कर.’’ तेव्हा त्यांनी तसे म्हणताच माझे डोळे आपोआप मिटले गेले. मला सभोवती निळा प्रकाश दिसू लागला. ‘माझा देह वेगाने वरच्या दिशेने (चक्रीवादळाप्रमाणे) कुठेतरी जात आहे’, असे जाणवले. तेथे पोहोचल्यावर मी पहिली गिरकी घेतल्यावर मला शक्ती जाणवली. मला पाय उचलता येईना. माझा देह स्तब्ध झाला. माझ्या हातात काहीतरी वेगाने प्रवेश करत आहे, देहात तोंडावाटे, तसेच नंतर पेशीपेशीत काहीतरी वेगाने शक्ती आणि प्रवाह असे एकाच वेळी जात असल्याची जाणीव मधेमधे झाली. नंतर चार पाच गिरक्या घेऊन नृत्य थांबवले. मला समोर काही क्षण श्रीकृष्णाचे विशाल चरण दिसले आणि नंतर केवळ निळा प्रकाश दिसला. ‘मी जेथे उभी होते, ते सभागृह हलत आहे कि मला चक्कर येत आहे’, हे कळलेच नाही. माझ्या शरिरात वीज संचारावी, तसे होत होते. मला पांढर्या प्रकाशाचा प्रवाह दोन वेळा वर-खाली जातांना दिसला. मला काही क्षण ‘थंडी वाजून शरीर थरथरत आहे कि काय ?’, असेही वाटले. नृत्य संपल्यानंतर मी स्वामीजींच्या चरणांवर डोके ठेवल्यावर काही क्षण ध्यान लागले होते’, असेही जाणवले.’
– डॉ. (कु.) आरती तिवारी
प्रश्न : परात्पर गुरु डॉ. आठवले, नृत्य करतांना ध्यान अनुभवले कि ध्यानात नृत्य झाले ? कि अजून काही वेगळे होते ? – डॉ. आरती
उत्तर : ध्यानात नृत्य झाले
५ इ ५. ‘नृत्य एका वेगळ्याच लोकात होत आहे’, असे साधकांना जाणवणे
या वेळी एक भाग प्रकर्षाने जाणवत होता की, सौ. सावित्री आणि आरती नृत्य करत असतांना स्वामीजी त्यांच्या दिशेने हातांच्या विविध मुद्रा करत होते. तेव्हा वाटले, ‘स्वामीजी त्यांच्या चक्रांवर सूक्ष्मातून कार्य करत आहेत.’ यामुळे सर्वांनाच नृत्यातील आनंदावस्था अनुभवता आली. तिथे उपस्थित असलेल्या साधकांना ‘हे नृत्य एका वेगळ्याच लोकात होत आहे’, असे जाणवले.’
– कु. तेजल पात्रीकर, श्री. चेतन एम्. एन्. आणि श्री. सोमनाथ मल्ल्या
नृत्य शिकवणारे शिक्षक आणि संत यांतील भेद
‘नृत्य शिकवणारे शिक्षक आणि नृत्यासाठी मार्गदर्शन करणारे संत यांच्यातील भेद या ठिकाणी लक्षात आला. ‘शिक्षक केवळ विद्यार्थ्याला कसे करावे ?’, हे सांगू शकतो. त्यांच्याकडून करवून घेऊ शकत नाही. संतांचे सामर्थ्यच वेगळे असते. ते एखाद्याला सांगून त्याप्रमाणे समोरच्याकडून करवूनही घेतात’, हे आम्हाला अनुभवायला मिळाले.’ – कु. तेजल पात्रीकर, सौ. सावित्री इचलकरंजीकर, डॉ. आरती तिवारी आणि श्री. चेतन एम्.एन्.
५ इ ६. स्वामीजींच्या संदर्भातील अनुभूती
५ इ ६ अ. स्वामीजी वापरत असलेल्या वस्तूंना सुगंध येणे
५ इ ६ अ १. स्वामीजींकडील ‘एका बासरीला सुगंध येत आहे’, असे जाणवणे
‘स्वामीजींकडील बासर्या काही वेळ माझ्याकडे दिल्या होत्या. त्यांपैकी एक बासरीला दैवी सुगंध येत होता. माझे सुगंधामुळे मधेमधे ध्यान लागत होते. तेथे उपस्थित अन्य साधकांनाही सुगंध आला.
५ इ ६ अ २. स्वामीजींच्या उपनेत्राला सुगंध येणे आणि सुगंध घेत असतांना तोंडात गोड चव जाणवणे
सत्संगात एक कृती दाखवत असतांना स्वामीजींनी त्यांचे उपनेत्र (चष्मा) माझ्याकडे दिले. तेव्हा ‘उपनेत्राच्या टोकातून एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत आहे’, असे मला जाणवले. तो सुगंध घेत असतांना ‘मला तोंडात गोड चव जाणवली’ आणि ‘सुगंध घेत रहावा’, असे वाटत होते.
५ इ ६ आ. ‘आश्रमात अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहोत’, असे वाटणे
मला स्वामीजींबद्दल कृतज्ञता वाटून माझी सतत भावजागृती होत होती. ‘आश्रमात आम्ही केवळ तीन दिवस रहात नसून अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहोत’, असे वाटत होते. ‘स्वामीजींनी ज्या गतीने आम्हाला शिकवले, ज्ञान दिले, आमच्यात भगवंताप्रतीचा भाव वृद्धींगत केला आणि शक्ती दिली, ते ग्रहण करण्याचे सामर्थ्य आमच्यात नव्हते. ते केवळ परात्पर गुरु डॉ. आणि स्वामीजींचे आशीर्वाद यांच्यामुळेच शक्य झाले’, असे सतत वाटून कृतज्ञतेने मन भरून येत होते.’- डॉ. (कु.) आरती तिवारी
६. स्वामीजींची लक्षात आलेली काही वैशिष्ट्ये
६ अ. सतर्कता
‘स्वामीजी मार्गदर्शन करत असतांना आम्ही ध्वनीचित्रीकरण केले. त्या वेळी स्वामीजींचे बोलणे ऐकू यावे, यासाठी ध्वनीक्षेपक (माईक) लावला होता. त्यांनी ‘पांघरलेल्या भगव्या वस्त्रामुळे ध्वनीक्षेपक घासला जातो’, हे स्वामीजींना कळल्यावर ते ‘पुढे तसे होणार नाही’, याकडे आवर्जून लक्ष ठेवायचे आणि लगेच व्यवस्थित करायचे.
६ आ. सूक्ष्मातील कळणे
१. स्वामीजी मार्गदर्शन करत असतांना एकदा ध्वनीक्षेपकातून खरखर ऐकू येत होती. तेव्हा त्यांना ‘बोलतांना मधेच कसे थांबवू ?’, असे विचार मनात येत होते. तेवढ्यात स्वामीजींनी माझ्याकडे पाहून ‘ध्वनीक्षेपकात काही अडचण आहे का ?’, असे विचारले. त्यानंतर मी तो व्यवस्थित केला.’ – श्री. चेतन एम्.एन्.
२. ‘१६.३.२०१७ या दिवशी स्वामीजींच्या आश्रमात येतांना आम्ही प.पू. भांडारकर महाराज यांच्याविषयी बोलत होतो. आम्हाला वाटत होतेे, ‘त्यांच्याकडेही जाता आले, तर बरे होईल.’ आमचे त्यांच्याकडे जाण्याचे काही नियोजन नव्हते. त्या दिवशी दुपारी स्वामीजी आमच्यासमवेत असलेले उडपी येथील साधक श्री. सोमनाथ मल्या यांना म्हणाले, ‘‘यांना प.पू. भांडारकर महाराज यांच्याकडेही घेऊन जा.’’
६ इ. इतरांचा विचार करणे
१. चित्रीकरणाच्या वेळी खोलीत असलेल्या घड्याळात प्रत्येकी अर्ध्या घंट्याने मोठ्या आवाजात ठोके पडायचे. त्यामुळे मार्गदर्शन करतांना स्वामीजींच्या बोलण्याचा आवाज चित्रीकरणात स्पष्ट येत नव्हता. स्वामीजींना हे सांगितल्यावर त्यांनी सहजतेने ‘घड्याळ बंद करूया’, असे सांगितले.
२. स्वामीजींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही ज्या सभागृहात बसत होतो, तेथे पुरेसे पंखे नव्हते. हे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच तेथे पंखे लावायला सांगितले.
६ ई. ‘साधकांनी अनुभूतीत अडकू नये’, असे सांगणे
साधकांनी स्वामीजींना अनुभूती सांगितल्यावर ‘ते त्याला विशेष महत्त्व देत नाहीत’, हे लक्षात आले. त्यामागे ‘साधकांनी अनुभूतीत अडकू नये’, हा त्यांचा उद्देश असतो. ते म्हणतात, ‘‘अनुभूती म्हणजे काही क्षण अनुभवलेला भगवंत. काही क्षण अनुभवलेल्या भगवंतात अडकल्यास मूळ ‘भगवंतच हवा’, या विचारापासून आपण दूर जाऊ शकतो. त्यामुळे भगवंताला सांगावे, ‘भगवंता, मला क्षणिक ‘तू’ नकोस. मला तू कायमचा हवा आहेस. या अनुभूती म्हणजे ‘भासमान भगवंत’ आहे. ते मला नको.’’
६ ऊ. स्वामीजींनी आश्रमातील साधिकेला ‘ते करत असलेल्या संगीत-नृत्य विषयक
मार्गदर्शन ऐकण्यासाठी बसल्या, तर चालेल का ?’, असे आम्हाला विचारण्यास सांगणे
स्वामीजींनी त्यांच्या आश्रमातील एका साधिकेला त्यांची भजनांच्या माध्यमातून साधना होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना ‘स्वामीजी आम्हाला संगीत-नृत्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत’, असे समजल्यावर त्यांनी स्वामीजींना ‘मार्गदर्शन ऐकायला बसू शकते का ?’, असे विचारले. त्यावर स्वामीजींनी त्या साधिकेला ‘आम्हाला काही अडचण नाही ना ?’ असे विचारायला सांगितले. खरेतर स्वामीजी हे सांगू शकले असते; परंतु त्यांनी तसे न करता आमची अनुमती घेण्यास त्या साधिकेला सांगितले. यातून त्यांच्यातील नम्रतेचे दर्शन होते.
६ ए. स्वामीजी त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक
व्यक्तीला त्याच्या साधनामार्गानुसार मार्गदर्शन करत असणे
स्वामीजींच्या आश्रमात १० – १५ पूर्णवेळ निवासी साधक आहेत, तसेच त्यांचा देश-विदेशातही शिष्य परिवार आहे. स्वामीजी सगळ्यांना एकाच प्रकारची साधना न सांगता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या साधनामार्गानुसार मार्गदर्शन करतात.
६ ऐ. ‘एक साधे, सब साधे’ या उक्तीप्रमाणे स्वामीजींना
बांधकामापासून ते गायन-वादन या क्षेत्रातील सर्व अवगत असणे
‘एका भगवंताला प्राप्त करून घेतले, तर वेगळे असे काही शिकायची आवश्यकताच रहात नाही’, असे एक वचन आहे. भगवंताच्या कृपेने त्याला सर्व येऊ शकते. स्वामीजींविषयी आम्ही हेच अनुभवले.
६ ओ. आश्रमाच्या बांधकामात सहभागी होणे
स्वामीजींनी आश्रमाच्या बांधकामातही सहभाग घेतला. त्यांनी एक ते दीड किमी अंतरावरून बांधकामासाठीचे साहित्य (वाळू, सिमेंटचे खोके वाहून आणण्याची), स्लॅब घालणे इत्यादी सेवा केली आहे. महिला साधकांनीही ही सेवा केली आहे. हा भाग अरण्यातील असल्याने हे सामान लांबून बांधकामाच्या ठिकाणी आणावे लागायचे, तरी सर्वांनी सेवाभावाने आश्रमाचे बांधकाम पूर्ण केले.
६ औ. स्वामीजींचे मन आणि बुद्धी पूर्णपणे
विश्वमन अन् विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप असल्याचे जाणवणे
स्वामीजींनी आतापर्यंत एकही ग्रंथ वाचला नसूनही ते अनेक श्लोक आणि अध्यात्मविषयक शंकांचे निरसन सहजतेने अन् व्यवहारातील सोपी उदाहरणे देऊन करतात. त्यांचे मन आणि बुद्धी पूर्णपणे विश्वमन अन् विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप झाली असल्याने भगवंतच त्यांच्यासाठी सर्व करतो.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर, कु. तेजल पात्रीकर, डॉ. (कु.) आरती तिवारी आणि श्री. चेतन एम्.एन्
७. शिकायला मिळालेली सूत्रे
७ अ. स्वामीजींची शिकवण्याची तळमळ
७ अ १. तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांची कथा अन् स्वतः बसवलेल्या कृष्ण आणि त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली गोपी राधा यांचे नृत्य यांविषयीची ध्वनीचित्र-चकती दाखवणे
‘रात्री जेवणानंतर स्वामीजींनी आम्हाला ध्वनीचित्र- चकती दाखवण्यास सांगितल्या. एका ध्वनीचित्र-चकतीत तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांची कथा होती. या कथेतून ‘भगवंतासाठी गाणे कसे असते ? तसेच ‘तानसेनच्या गाण्यातील त्याच्या गुरूंचे दैवी सामर्थ्य’ हा भाग विशेषकरून आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आणून दिला. वर्ष २००७ मध्ये स्वामीजींनी जन्माष्टमीच्या वेळी आश्रमातील काही साधिकांचे कृष्ण आणि त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली गोपी राधा यांचे एक भावनृत्य बसवले होते. त्याविषयीची ध्वनीचित्र-चकती आम्हाला दाखवली. त्यातून ‘स्वत:चे अस्तित्व विसरून नृत्यातून भगवंतासाठीची व्याकुळता कशी असावी ?’, हे आम्हाला शिकवले.
७ अ २. स्वामीजींची शिकवण्याची तळमळ
नंतर आश्रमातील भक्तांकडून आम्हाला कळले, ‘कितीतरी वर्षांनी आश्रमात ध्वनीचित्र-चकत्या केवळ आमच्यासाठी दाखवण्यात आल्या.’ त्या वेळी स्वामीजींची ‘आम्हाला शिकवण्याची किती तळमळ आहे !’, हे या प्रसंगातून लक्षात आले.’
– कु. तेजल पात्रीकर, सौ. सावित्री इचलकरंजीकर, डॉ. आरती तिवारी आणि श्री. चेतन एम्.एन्.