मला पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (पू. काका) यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करण्याची सेवा मिळाली. त्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना स्वतःला झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. पू. डॉ. पिंगळेकाकांवर बिंदूदाबन उपाय
आणि मालीश करण्यापूर्वी स्वतःची नकारात्मक मनस्थिती असणे
अ. मला माझ्या सेवा करतांना उत्साह वाटत नव्हता आणि सेवा करतांना काही वेळा सुचायचे नाही. त्यामुळे माझ्याकडील सेवा प्रलंबित होत्या.
आ. सेवा करतांना चुका होऊन त्या चुकांविषयी मला भीती वाटत होती.
इ. त्या वेळी मला माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण वाढले आहे. माझे नामजपात लक्ष लागत नाही आणि मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण वाढले आहे, असे जाणवायचे.
ई. माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती आणि माझ्याकडून भावजागृतीसह व्यष्टी साधनेचे प्रयत्न नीट होत नव्हते. त्यामुळे त्याचा समष्टी साधनेवरही परिणाम होत होता.
२. पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना आलेल्या अनुभूती
२ अ. पहिल्या दिवशी पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना शारीरिक
अन् आध्यात्मिक त्रास होणे; पण प्रार्थना करून सेवा केल्यावर देवच सेवा करवून घेत आहे, असे जाणवणे
मला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी कदाचित् देवानेच पू. काकांवर उपाय करण्याचे नियोजन केले असावे. मला देवाच्या कृपेने पू. काकांना मालीश करण्याची सेवा मिळाली. पू. काकांवर बिंदूदाबन उपाय केल्यावर पहिल्या दिवशी मला हाताच्या बोटांना सूज येणे यासारखे बरेच शारीरिक आणि काही आध्यात्मिक त्रास झाले. तरीही मी देवाला प्रार्थना करून दिवसातून ३ वेळा पू. काकांवर बिंदूदाबन उपाय करत होतो. त्या वेळी मला देवच माझ्याकडून ही सेवा करवून घेत आहे, असे जाणवले.
२ आ. प्रार्थना करून मालीश केल्यानंतर थकवा असतांनाही उत्साह जाणवणे
एका रात्री पू. काकांना मालीश करण्यापूर्वी माझ्याकडून प्रार्थना झाली, देवा, माझी क्षमता नाही. मी काहीच करू शकत नाही. तूच ये आणि सेवा पूर्ण करून घे. मला संतांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करता येऊ दे. या सेवेचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ दे.
त्या रात्री मालीशची सेवा पूर्ण झाल्यावर मला थोडा थकवा जाणवत होता, तरीही माझे मन उत्साही होते. मला झोप लागत नव्हती. मी आनंदात होतो. नंतर देवाने माझ्याकडून भांडी घासण्याची सेवाही उत्साहाने आणि आनंदाने करून घेतली. तेव्हा मला देवाच्या चरणी कृतज्ञता वाटत होती.
३. स्वतःला स्वतःच्या मनाच्या स्थितीत
आणि तोंडवळ्याकडे पाहून जाणवलेले सकारात्मक पालट
याआधी मला कुणी काही सांगत असल्यास माझ्या तोंडवळ्यावर प्रश्नचिन्ह असायचे. मला समोरची व्यक्ती सांगत असलेल्या सूत्रांचे आकलन व्हायचे नाही. त्यामुळे मला फार लक्षपूर्वक ऐकावे लागायचे आणि त्रास व्हायचा; पण पू. काकांवर २ – ३ दिवस बिंदूदाबन उपाय आणि मालीश केल्यावर माझी पूर्ण स्थितीच पालटली. त्या वेळी मला स्वतःच्या मनाच्या स्थितीत पुढील पालट जाणवले.
अ. त्या वेळीही हाताची बोटे दुखायची आणि थकवा असायचा, तरीही मला वेगळा आनंद अनुभवायला मिळत होता.
आ. मला माझ्या तोंडवळ्यात सकारात्मक पालट जाणवत होता.
इ. मला सेवा करतांना उत्साह जाणवून भावजागृतीचे प्रयत्न आपोआप होत होते. त्यामुळे मला आनंद जाणवायचा.
ई. आता माझ्या सेवेत चुका झाल्या, तरी मन शांत असते.
उ. दिवसभर झालेल्या चुकीतून शिकून आणि परिस्थिती स्वीकारून पुढे जाऊया, अशी मनाची स्थिती असते. त्यामुळे ताण येत नाही.
४. पू. डॉ. पिंगळेकाका आणि सहसाधक
यांना श्री. कार्तिक साळुंके यांच्यामध्ये जाणवलेले पालट
४ अ. पू. काकांनी साधकाला स्वतःमध्ये झालेले पालट लिहून
दे, असे सांगणे आणि ते लिहिल्यावर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
पू. काकांनाही माझ्यात पालट जाणवला. त्यांनी मला सांगितले, तू माझ्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करू लागण्याच्या तिसर्या दिवशीच मला तुझ्यात पालट झाल्याचे जाणवत आहे. तुला काय पालट जाणवले ते सांग. तेव्हा मला जाणवत असलेले पालट सांगितल्यावर पू. काकांनी ते लिहून दे, असे सांगितले. आज केवळ त्यांच्याच कृपेने हे सर्व लिहू शकलो. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
४ आ. सहसाधकाने तोंडवळ्याकडे पाहून चांगले वाटत आहे, असे सांगणे
एकदा देहली सेवाकेंद्रात श्री. दिवाकर आगावणे आले होते. त्या वेळी ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, मागच्या वेळच्या तुलनेत तुझ्या तोंडवळ्याकडे पाहून पुष्कळ चांगले वाटत आहे. मला आनंद जाणवत आहे. काय प्रयत्न केलेस ? तेव्हा मी त्यांना सांगितले, माझ्यात हा पालट केवळ पू. डॉ. पिंगळेकाकांवर केलेले बिंदूदाबन उपाय आणि मालीश या सेवांमुळे झाला.
५. कृतज्ञता
मला पू. डॉ. पिंगळेकाकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करण्याची सेवा मिळाली अन् त्या सेवेचा मला सर्व स्तरांवर लाभ झाला, यासाठी मी भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. डॉ. पिंगळेकाका यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. कार्तिक साळुंके, सनातन सेवाकेंद्र, देहली. (८.३.२०१७)
प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात