श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चैतन्यमय भेटीचे विश्व श्री क्षेत्र महासंस्थानचे श्री. उमेश शर्मा यांनी उत्कट भावरूपाने वर्णन केले. त्याने सर्व धर्माभिमानी चैतन्यतुषारांत भिजले. त्यानंतर बेंगळुरू येथे प्रस्थान करण्यासाठी सभागृहातून बाहेर गेलेले श्री. शर्मा यांना पुन्हा सभागृहात बोलावून आणण्यात आले. पुढील वक्त्यांचे चालू असलेले मार्गदर्शन थांबवून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घोषित केले, श्री. शर्मा यांच्या मनोगताच्या वेळी सर्वांना शांती आणि आनंदाची अनुभूती आली; कारण त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली आहे. त्यांच्यात गुरुदेवांप्रती असलेल्या भावामुळे लवकरच ते संतपदी विराजमान होतील. त्यानंतर झालेल्या सत्काराच्या प्रसंगी श्री. शर्मा यांना भेट दिलेली श्रीकृष्णाची प्रतिमा त्यांनी भावपूर्णपणे डोक्यावर घेतली. त्यानंतर पू. डॉ. पिंगळे यांनी त्यांना दीर्घ आलिंगन दिले, जणू दोघांत असलेल्या उत्कट भावस्वरूप ईश्वरी तत्त्वाचीच भेट झाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात
भोलेनाथ, राम आणि कृष्ण यांचा अपूर्व संगम ! – उमेश शर्मा
१६ जूनला अखिल भारतीय अधिवेशनातील सायंकाळच्या सत्रात श्री. उमेश शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, परात्पर गुरु डॉक्टरांची भेट होण्यापूर्वी मला अंतरातून वाटत होते की, ते एक महान शांतीस्वरूप, चैतन्यस्वरूप, शक्तीस्वरूप, ईश्वरस्वरूप आहेत. त्यांच्या भेटीसाठी आतुर झालो होतो. १५ जूनला त्यांना प्रथमच पहाता, ते राम आणि कृष्ण यांच्यासम लोककल्याणकारी अवतारी महापुरुष असल्याची अनुभूती मला आली. त्यांच्या डोळ्यांत अहिंसास्वरूप, प्रेमस्वरूप, धर्मस्वरूप, सत्यस्वरूप अनुभवता आले. त्यांच्यामध्ये भोलेनाथ, राम आणि कृष्ण यांचा अपूर्व संगम झाला असून तेच परमेश्वरस्वरूप आहेत. त्यामुळेच परात्पर गुरु डॉक्टरांनी ब्रह्मयज्ञ आणि क्षात्रयज्ञ आरंभला आहे. त्यांच्या अद्भूत ज्ञानशक्तीद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. आपण मात्र हिंदु राष्ट्रासाठी धैर्याने प्रयत्नरत राहिले पाहिजे. लक्षात घ्या, धैर्य आहे, तेथेच अमृतत्व आहे. परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा आणि भाव ठेवा. त्यांचे आज्ञापालन करा. साधना करत रहा. क्षणोक्षणी हृदयात गुरुतत्त्व साठवून राष्ट्रकार्यार्थ समर्पित व्हा ! आपल्या सर्वांना प्रेम, शांती आणि स्वर्गानुभूती देणारे हिंदु राष्ट्र मिळावे, याकरता परात्पर गुरु डॉक्टररूपी भगवंतच आपल्यासाठी कार्यरत आहे.
या मार्गदर्शनाच्या वेळी सभागृह सत्त्वकणांनी भारित झाले. सर्वजण शांतपणे श्री. शर्मा यांच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द हृदयात साठवत होते. अनेकांची भावजागृती होत होती, तर हे मनोगत संपूच नये, अशी सर्वांची मनोभावना होती. या वेळी सभागृहाबाहेर वरुणदेवाचा वर्षाव चालू होता, तर सभागृहात श्रीकृष्णाच्या कृपेचा वर्षाव हिंदुत्वनिष्ठ अनुभवत होते.