वैशाख कृष्ण पक्ष दशमी (२१.५.२०१७) या दिवशी पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची नात सौ. पूर्वा कुलकर्णी आणि सून सौ. ज्योती दाते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. कठीण प्रसंगांवर खंबीरपणे मात करणे
अ. पू. आजीच्या आयुष्यात परिस्थितीचे अनेक चढउतार आले; पण तिने प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले. कुणापुढेही स्वतःचे दुःख मांडले नाही आणि भावनाशील न होता संकटांवर स्थिर राहून मात केली.
आ. कठीण प्रसंगात आजीला सगळ्यांप्रमाणे दुःख होतेच; पण काही वेळानंतर ती सगळे दुःख आणि तणाव दूर लोटून पुष्कळ सकारात्मक होते. तिच्यामुळे सभोवतालचेेही सकारात्मक होतात आणि सर्वांना तिचा आधार वाटतो.
२. नाती जपणे
आजीचे व्यवहारज्ञान अतिशय चांगले आहे. तिने आयुष्यात सगळी नाती अतिशय व्यवस्थित जपली आहेत. ही नाती जपणे सोपे नव्हते; पण तिने निरपेक्ष भावाने सर्वांवर प्रेम करून त्यांना आपलेसे केले. समोरच्याला आहे तसे स्वीकारणे, हा आजीचा सर्वांत मोठा गुण आहे.
३. वेळ आणि पैसा यांचे काटकसरीने नियोजन करणे
तिने प्रत्येक गोष्टीत वेळ आणि पैसा यांचे नियोजन अत्यंत काटकसरीने केले आहे. त्यामुळे अकस्मात् कुठलाही कठीण प्रसंग आला, तरी तिचा त्यावर पर्याय सिद्ध असायचा. याच गुणांमुळे सामान्य आर्थिक परिस्थितीतही तिने तीनही मुलांना भरपूर शिकवून त्यांना स्वावलंबी केले आणि पुण्यात स्वतःचे घरही बांधले.
– सौ. पूर्वा कुलकर्णी (पू. आजींची नात)
४. दिसेल ते कर्तव्य या भावाने वागणे
पू. आजी अत्यंत निरपेक्षपणे आणि दिसेल ते कर्तव्य या भावाने घरातील कामे करतात, उदा. मंडईतून भाजी आणल्यावर तत्परतेने ती निवडून शीतकपाटात ठेवणे, पोहे चाळून ठेवणे इत्यादी.
५. इतरांचा विचार करणे
त्या सतत इतरांसाठी काहीतरी करण्यासाठी प्रयत्नरत असतात. कधी भाजी अल्प आहे, असे लक्षात आले, तर त्या स्वतः जेवणात भाजी घेण्याचे टाळतात आणि घरातल्यांना वाईट वाटू नये; म्हणून आज मला खावेसे वाटत नाही; म्हणून मी लोणचे अन् तुपाशी खाते, असे त्या म्हणतात.
६. इतरांना चुकांची जाणीव करून देणे
एखाद्या प्रसंगात मी अयोग्य वागले वा बोलले, तर त्या लगेच जाणीव करून देतात आणि म्हणतात, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला असे शिकवले आहे का ?
७. श्रद्धा आणि भाव
७ अ. घरात आंबे आणले असूनही परात्पर गुरु डॉ.
आठवले यांनी पाठवलेला आंबा प्रथम खाणार असल्याचे सांगणे
एकदा आमच्या घरी प्रथमच आंबे आणले होते. तेव्हा पू. आजी म्हणाल्या, मला आता आंबे नकोत. त्यांना आंबे फार आवडतात, तरी त्या असे का म्हणत आहेत ?, असा विचार माझ्या मनात आला. मी त्यांना पुन्हा विचारल्यावर त्या म्हणल्या, प्रतीवर्षी मला परात्पर गुरु डॉ. आठवले आंबे पाठवतात. त्यांनी पाठवलेला आंबा मी प्रथम खाईन.
७ आ. घरात कोणताही प्रसंग घडला की, त्या म्हणतात, परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत ना ! तुम्ही श्रद्धा वाढवायला पाहिजे.
८. पू. आजींमध्ये जाणवलेले पालट
अ. पू. आजी आधीच्या तुलनेत अधिक तत्त्वनिष्ठ झाल्या आहेत. त्यांची भावनाशीलता न्यून झाली आहे. त्या चुका स्पष्टपणे सांगतात.
आ. त्यांचे डोळे निर्विचार स्थिती दर्शवतात.
इ. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्या अखंड अनुसंधानात आहेत, असे जाणवते.
ई. त्यांच्यातील प्रेमभाव व्यापक होत चालला आहे, असे जाणवते. त्या सतत इतरांचा विचार करतात.
हे श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेने मला संतांच्या सान्निध्यात रहाण्याची संधी मिळाली आहे. पू. आजींमधील चैतन्याचा लाभ आम्हाला करवून घेता येऊ दे आणि या संधीचे सोने करून घेता येऊ दे, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून), पुणे (मे २०१७)