इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठांना श्रीकृष्णाची आनंदभेट !

श्री. नीरज अत्री यांचा सत्कार करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा – चंदीगड येथील ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडी’चे अध्यक्ष आणि ‘ब्रेनवॉश्ड रिपब्लिक’ या पुस्तकाचे लेखक श्री. नीरज अत्री यांनी निरपेक्ष भावाने, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रतीच्या प्रेमापोटी अत्यंत तळमळीने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासद्रोहाविषयी लढा दिला. त्यामुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केली. १५ जूनला सकाळच्या सत्रात श्री. अत्री यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर पू. डॉ. पिंगळे यांनी ही घोषणा केली आणि अधिवेशनस्थळी असलेल्या सर्वांना आनंद झाला. अनेक हिंदुत्वनिष्ठांची भावजागृती झाली. पू. डॉ. पिंगळे म्हणाले की, स्वतः भौतिकशास्त्राचे विद्यार्थी असूनही संसार सांभाळून राष्ट्र आणि धर्म यांवरील प्रेमापोटी श्री. अत्री यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा आणि त्याविषयीचे कर्तेपण नसणे, ही अनुकरणीय गोष्ट आहे. त्यानंतर श्री. अत्री यांचा पुष्पहार घालून आणि भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा आणि त्यांची सध्या चालू असलेली दिशाभूल थांबावी’, असे मला वाटत होते.

श्री. अत्री यांचे सहकारी आणि ‘ब्रेनवॉश्ड रिपब्लिक’ या पुस्तकाचे सहलेखक श्री. मुनीश्‍वर सागर म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हर्षोल्हासित झालो आहोत आणि श्री. अत्री यांच्याविषयीच्या आजच्या सत्कारवृत्तामुळे त्या आनंदात आणखी भर पडली आहे. श्री. अत्री यांना मी जवळून ओळखत असून ते खरेच आध्यात्मिकदृष्ट्या पुढच्या टप्प्यात आहेत

 

सनातन-निर्मित ‘बोधकथा’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथ प्रकाशन करतांना पू. सिरियाक वाले, श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि श्री. मुरली मनोहर शर्मा

सनातन-निर्मित आणि हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘बोधकथा’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन १५ जून या दिवशी अधिवेशनात करण्यात आले. या ग्रंथाचे प्रकाशन ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक पू. सिरियाक वाले, श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांगलादेश येथील ‘मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment