समाजाला आपत्काळात पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अशा घटना नैसर्गिक असल्याने समाज सतर्क नसतांना अकस्मात् घडत असतात. पूर आणि भूकंप या प्रसंगांना धीराने तोंड देण्यासाठी काय करावे ?
पूर
१. संभाव्य पूर येण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
अ. प्रशासनाच्या वतीने ध्वनीवर्धक, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांवरून देण्यात येत असलेल्या अद्ययावत् संकटकालीन सूचना सतत ऐकत अन् पहात रहाव्यात.
आ. मौल्यवान वस्तू आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. त्यामुळे ती सुरक्षित रहातील किंवा संकटकाळी घरातून निघतांना ती समवेत नेता येतील. त्यामुळे हानी होणार नाही किंवा झालीच, तर न्यूनतम होईल.
इ. प्रथमोपचाराचे साहित्य आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
ई. पुरेसे खाद्यपदार्थ आणि पिण्याचे शुद्ध पाणी उंच अन् सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
उ. तुम्ही पूरक्षेत्राच्या भागात रहात असाल, तर कुटुंबियांसह त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे.
ऊ. घरातील नाल्या (ड्रेनेज पाईप्स) स्वच्छ ठेवाव्यात. (त्या तुंबलेल्या नसाव्यात.)
२. प्रत्यक्ष पूर आल्यावर
अ. विद्युत आणि विद्युत उपकरणे यांच्या सर्व कळा (बटणे) बंद कराव्यात.
आ. एखाद्या उंच ठिकाणी निघून जावे. घराला दुसरा माळा असेल, तर तेथे जावे.
इ. साप किंवा इतर विषारी प्राण्यांवर लक्ष ठेवावे.
ई. पुराचे पाणी पिऊ नये. पावसाच्या धारांचे पाणी एका स्वच्छ भांड्यात गोळा करावे आणि तेच पाणी पिण्यासाठी वापरावे.
उ. वेगाने वहाणारे झरे किंवा पाणी यांतून चालण्याचा, त्यात पोहण्याचा किंवा खेळण्याचा प्रयत्न करू नये.
भूकंप
१. भूकंप झाल्यावर काय करावे ?
अ. लगेच स्वतःचे राहते स्थान सोडून मोकळ्या जागेत जावे.
आ. बहुमजली इमारतीतून खाली येण्यासाठी उद्वाहकाचा (लिफ्टचा) वापर करू नये.
इ. घराबाहेर जाणे शक्य नसेल, तर घरातील काचेची तावदाने असलेल्या खिडक्या, कपाटे, विजेच्या तारा आणि इतर सहज कोसळणारा भाग यांपासून दूर रहावे.
ई. घरातील दणकट पटल (टेबल) किंवा पलंग यांच्याखाली आश्रय घ्यावा. ते उपलब्ध नसल्यास स्वतःच्या हातांनी डोके झाकून खोलीतील कोपरा किंवा छताच्या नाटीच्या (बीमच्या) खाली बसावे.
उ. भूकंपाच्या वेळी अंथरूणावर असाल, तर उशी किंवा गादी यांच्या साहाय्याने स्वतःला झाकून घ्यावे.
ऊ. गॅस आणि वीज यांच्या सर्व कळा (बटणे) बंद कराव्यात.
ए. तुम्ही घराबाहेर असाल, तर इमारती, विजेचे खांब आणि झाडे यांपासून दूर रहावे.
ऐ. रस्त्यावर पळू नये आणि पुलावरून जाऊ नये.
ओ. तुम्ही वाहन चालवत असाल, तर सुरक्षित ठिकाणी थांबावे.