‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.
१. साधना म्हणून तबलावादनाच्या
रीतसर सरावास प्रारंभ करण्यापूर्वीची पार्श्वभूमी
१ अ. साधना करू लागण्यापूर्वी दहा वर्षे तबलावादन
शिकत असणे, त्या वेळी पुष्कळ श्रम घेऊनही हात दुखण्याचा
त्रास होऊन तबला वाजवता न येणे आणि त्यामुळे अठरा वर्षांनंतर
सहसाधिकेला नृत्याच्या सरावात साहाय्य करतांना तबला वाजवता न येणे
वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू करण्यापूर्वी दहा वर्षे मी तबलावादन शिकले होते. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात नृत्य विभागात सेवा करणार्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर यांना प्रतिदिन कथ्थक नृत्याचा सराव करण्यात साहाय्य करण्यासाठी मी जाऊ लागले. सरावाच्या ठिकाणी तबला उपलब्ध होता; पण एकतर मागील अठरा वर्षांत मी तबल्याला स्पर्श केला नव्हता. दुसरे असे की, पूर्वी ज्या वेळी मी तबला शिकत होते, त्या वेळी थोडेसे जरी जलद गतीने वाजवण्याचा प्रयत्न केला, तरी माझा उजवा हात पुष्कळ दुखत असे. हे दुखणे बंद व्हावे आणि मला सहजतेने वाजवता यावे, यासाठी माझे तबल्याचे गुरुजी पं. लक्ष्मणराव कुंटे यांनी पुष्कळ प्रयत्न केले. ते मला विनामूल्य शिकवत आणि बर्याचदा दिवसातून दोन-तीन वेळा माझा वर्ग घेत असत. त्याशिवाय घरी दोन-तीन घंटे मी तबला वाजवण्याचा सराव करत असे. एवढे कष्ट दहा वर्षे घेऊनही माझे हात दुखणे थांबले नाही आणि मला जलद गतीने तबला वाजवता आला नाही. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर मी तबलावादन बंद केले. त्यानंतर मागील वर्षी माझ्या लक्षात आले, ‘अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे माझी प्राणशक्ती बालपणापासून अतिशय अल्प आहे. परिणामी मी हातांनी कोणतेही काम करण्यास प्रारंभ केला की, काही मिनिटांत माझे हात दुखू लागतात. तबलावादनाच्या संदर्भातही असेच घडले असावे आणि मला तबला वाजवता आला नसावा.’ ही सर्व निराशाजनक पार्श्वभूमी मनावर कोरलेली असल्यामुळे सौ. सावित्री यांच्यासह सरावाला गेल्यावर मी तबला न वाजवता केवळ हातावर बोल म्हणत त्यांना साहाय्य करत असे.
१ आ. एके दिवशी सहज तबला वाजवून पाहिल्यावर
आता पूर्वीप्रमाणे हात दुखत नसल्याचे लक्षात येणे आणि आनंद होणे
एकदा काही कारणाने सौ. सावित्री यांना सरावाला येण्यास विलंब झाला. त्यांची वाट पहात असतांना तेथे ठेवलेला तबला वाजवून पहाण्याची मला इच्छा झाली; पण मी त्या विचाराकडे दुर्लक्ष केले. दुसर्या दिवशी पुन्हा तसेच घडले. तेव्हा मात्र मला स्वतःला थांबवता आले नाही आणि मी तबला वाजवण्यास प्रारंभ केला. प्रथम संथ गतीने आणि नंतर थोडे जलद गतीने वाजवण्याचा मी प्रयत्न करू लागले अन् मला आश्चर्याचा धक्का बसला. अठरा वर्षांपूर्वी ज्या गतीने वाजवतांना माझ्या उजव्या हातात कळा येत असत, त्या गतीने त्या दिवशी मला सहज वाजवता येत होते. एवढ्या वर्षांनी वाजवत असल्यामुळे तबल्यातून बोल स्पष्ट निघत नव्हते; पण हात दुखणे अजिबात नव्हते. नंतर सौ. सावित्री आल्यावर त्यांच्यासह तबला वाजवत सराव करून पाहिला. तेव्हाही हात दुखला नाही. त्या वेळी मला आनंद झाला आणि ‘देवाचा याहून मोठा चमत्कार तो काय असणार ?’ असे वाटले.
– कु. सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०१७)