धर्मशिक्षणाच्या अभावी जन्महिंदूंकडून केली जाणारी अयोग्य आणि हास्यास्पद कृती !
पुणे : वटपौर्णिमा म्हणजे वडाची पूजा करून त्याला सूत गुंडाळून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यांसाठी पत्नी प्रार्थना करते. हे व्रत महिला घेतात; पण येथील नवी सांगवी भागात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी ८ जून या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली. या वेळी अनेक पुरुषांनी हा सण साजरा केला. (हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्यामुळे या व्रताचा उद्देश आणि महत्त्व हिंदूंना समजत नाही. या व्रताला स्त्री-पुरुष समानतेच्या अतिशय उथळ आणि तथाकथित संकल्पनांशी जोडले जाते. शिवस्वरूपरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे ‘आयुष्यातील प्रत्येक कर्माला पतीची साथ मिळावी, यासाठी ईश्वीराची पूजा करणे’ असते. त्यामुळे स्त्रीची आयुष्याची कर्म साधना म्हणून होण्यास त्याचा लाभ होतो. हिंदु धर्मातील या व्यापक धर्मसंकल्पनांचा अभ्यास हिंदूंनी करायला हवा. त्यासाठी हिंदूंना आवश्यक धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या उपक्रमाची माहिती देतांना मानवी हक्क संरक्षणचे अण्णा जोगदंड यांनी सांगितले की,
१. वास्तवात हे व्रत म्हणजे एक मानसशास्त्रीय विधी आहे. (हा मानसशास्त्रीय नसून धार्मिक विधी आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. ज्यामुळे भारतामधील संस्कृती टिकवून समाजाचा समतोल राखला जात आहे. मुळात सारे सणवार हे प्रतिके आहेत. (सणवार प्रतिके वगैरे नसून त्या वेळी केले जाणारे धार्मिक विधी हे मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त असल्यानेे ते एकप्रकारे चैतन्य प्रदान करणारे सत्याचे प्रयोग आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. कायद्याने स्त्री-पुरुष समानता दिली असल्याने पुरुषाने पत्नीच्या आयुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्यात काहीही वावगे नाही. (व्यवहारात आपण अभियंत्याने रुग्णाची शस्त्रक्रिया करावी, असे कधी म्हणतो का ? मग धर्माच्या संदर्भातील निर्णय स्वतःच्या मनाने का पालटले जातात ? धर्मशास्त्रात पालट करण्यासाठीचे अधिकार शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत यांना असतांना अशी कृती करणे, हे स्वतःला त्यांच्यापेक्षा शहाणे समजण्यासारखेच आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
वटपौर्णिमेच्या केकवर सुरी फिरवणे म्हणजे आपत्काळाला दिलेले आमंत्रणच !
८ जून या दिवशी वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि त्याची ७ जन्म साथ मिळावी, यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. वडाच्या झाडाचे पूजन का आणि कसे करावे, त्याचे स्त्रियांना कसे लाभ होतात, याविषयीही धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे; पण आज याच वटपौर्णिमेची टिंगलटवाळी केली जाते.
सध्या सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमेचा केक फिरत आहे. हा केक सिद्ध केला असून त्यावर पूजलेले वडाचे झाड, खाली पडलेली फुले, पूजेचे तबक, त्यात निरांजन, उदबत्त्या, हळद-कुंकू, कलश आणि अन्य पूजेचे साहित्य साकारले आहे. आता हा केक कापला, तर या सर्व प्रकारच्या पूजासाहित्यावर सुरी फिरवली जाईल !
केकवर सुरी फिरवणे, हे अशुभ क्रियेचे प्रतीक आहे. हे एकप्रकारे धर्मविघातक प्रवृत्तीचेच लक्षण आहे. अशा कृतींमुळे धर्मही नष्ट होऊ पहात आहे. हे गंभीर आहे. धर्म नष्ट झाल्यास विनाशच ओढवेल. अशा कृती करून आपणच एकप्रकारे आपत्काळाला आमंत्रण तर देत नाही ना, याचा विचार सर्वांनी करायला हवा.
वटपौर्णिमा ही केक कापून साजरी करण्याची गोष्ट नसून ती धर्मशास्त्रानुसारच करणे आवश्यक आहे. तसे केल्यासच खर्याच अर्थाने पती आणि पत्नी यांना निश्चितच लाभ होईल !