१. सावरकरांनी सागराला उद्देशून हृदयापर्यंत
संवेदना निर्माण करणारे काव्यरूपी मनोगत व्यक्त करणे
‘सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ।’ या काव्यातून सागराला उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘हे सागरा, मी अशा संकटात सापडलो आहे की, आता मी परत माझ्या मातृभूमीला परत जाईन किंवा नाही’, असे वाटते. हे सागरा, तू मला माझ्या मातृभूमीकडे परत ने.’’ सावरकरांच्या काव्यातील या ओळी थेट हृदयापर्यंत जाऊन संवेदना निर्माण करणार्या आहेत, इतका प्रभाव त्यांच्या या काव्यातील शब्दांमध्ये आहे.
२. सावरकरांनी आत्मीयतेने आणि आर्ततेने केलेली प्रार्थना भगवंतरूपी सागराने
स्वीकारणे अन् भगवंताने आश्चर्यकारक लीला घडवून त्यांना मातृभूमीला परत आणणे
भगवंताने म्हटले आहे, ‘मी या विश्वात कणाकणात चैतन्याने भरून आहे.’ हे चैतन्य स्वसंवेद्य आहे. सावरकरांच्या या काव्यातून याची प्रचीती आलेली दिसते. त्यांनी जीव तोडून, मोठ्या आत्मीयतेने आणि आर्ततेने केलेली प्रार्थना सागराने स्वीकारली; म्हणूनच इंग्रज सरकारने त्यांना अंदमान येथील कारागृहात आणले आणि तेथून पुढे रत्नागिरी येथील कारागृहात नेले. अशा प्रकारे त्यांच्या पावलाचा मातृभूमीला स्पर्श झाला. हे सागरामुळे (भगवंताच्या चैतन्यामुळे) झाले. वास्तविक अंदमानातील कारागृहात असतांना त्यांनी किती मरणोन्मुख यातना सहन केल्या होत्या, याविषयी जाणून घेतल्यावर अंगावर शहारे येतात. ‘अशा परिस्थितीतून मनुष्य कसा जिवंत राहू शकतो’, हे एक आश्चर्यच आहे; परंतु भगवंताची ही लीलाच आहे. त्याने स्वा. सावरकरांची हाक ऐकली आणि त्यांना मातृभूमीला परत आणले.
३. सावरकर भगवंताच्या कृपेनेच महान संकटाला तोंड देऊ शकणे
महान संकटाला तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागते, ते सावरकरांमध्ये होते. भगवंताच्या कृपेनेच ते त्या संकटाला तोंड देऊ शकले. हे त्यांचे सामर्थ्य आणि तळमळ यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यात हातभार लागला.
त्यांच्या बलीदानासाठी कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !’
– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.३.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात